नेहमीच याव्यात निवडणुका!

नेहमीच याव्यात निवडणुका!

वाघोली - निवडणुका आल्या अन्‌ विकासकामांना जणू पाय फुटल्याचा भास वाघोलीकरांना झाला. खिशातील लाखो रुपये खर्चून इच्छुकांनी विकासकामांचा सपाटा लावला आहे. यामुळे झोपडपट्ट्यांतील रस्त्यांचेही काँक्रिटीकरण झाले आहे, तर रस्ते विद्युत दिव्यांच्या प्रकाशाने उजळले आहेत. याशिवाय महावितरणच्या विद्युत समस्यांवरही तोडगा निघू लागला आहे. यामुळे निवडणुका दरवर्षी झाल्या पाहिजेत, असे शब्द मतदारांच्या तोंडून निघाले नाहीत तरच नवल!

मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पॅनेलमधील इच्छुकांनी वर्षभरापासून सुरवात केली आहे. यासाठी स्पेशल रेल्वे व बसद्वारे यात्राही घडविण्यात आल्या. मात्र, मतदारांवर छाप पाडण्यासाठी खिशातील पैसे काढून विकासकामांचा सपाटा सुरू झाला. वर्षानुवर्षे न सुटलेला रस्त्याचा प्रश्न सोडवून त्याचे काँक्रिटीकरण झाले. पावसामुळे दुरवस्था झालेल्या अनेक रस्त्यांची दुरुस्ती झाली. झोपडपट्टी परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले. अनेक रस्त्यांना दिव्यांची झळाळी मिळाली. बोअरवेल घेऊन पाण्याच्या समस्यांवर तोडगा काढण्यात आला. गटारे बंदिस्त करण्याचे काम झाले. उच्च दाबाची विद्युतवाहिनी बसविण्यासाठी स्वतःची जागाही देण्यात आली. नागरिकांच्या सोयीसाठी बसथांबे उभारले. अशी अनेक विकासकामे इच्छुकांनी स्वखर्चातून केली आहेत. निवडणुका जवळ आल्याने ही विकासकामे केली आहेत, हे मतदारांना माहीत असले, तरी त्यांची सोय झाल्याने ते त्यांना मनापासून धन्यवाद देत आहेत. उद्या मत कोणाच्या पारड्यात पडेल, हे निकालानंतर समजणार असले, तरी आज झालेल्या विकासकामांनी मतदार मात्र खूष आहेत. 

स्वखर्चातून झालेली विकासकामे
 रस्त्याची कामे : शांती पार्क, शिवतेज पार्क, ऑक्‍सी अल्टीमा रस्ता, काळुबाईनगर, बाजारतळ मैदानाजवळील वसाहत. 
 याठिकाणी दिवे बसले : अनसूया पार्क, दुबेनगर, शांती पार्क, मदर मेरी सोसायटी, आनंदनगर, संभाजीनगर, बाईफ रोड, सुयोग सोसायटी, नवीन भाडळे वस्ती, डोमखेल रोड, केसनंद रोड ते दुबेनगर, गणेशनगर.
 बसशेड उभारले : पानमळा, केसनंद फाटा
 हॅलोजन दिवे व खांबांची व्यवस्था : सिद्धी पार्क सोसायटी, गणेशनगर, बजरंग तरुण मंडळ, काळूबाईनगर
 बजरंग तरुण मंडळ येथे बोअरवेल घेऊन मोटार बसविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com