प्रभाग हद्द बदलण्याचा डाव?

मंगेश कोळपकर
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

आरक्षण न बदलता मतदारांच्या "पॉकेट्‌स'साठी सर्वांचीच फिल्डिंग !

आरक्षण न बदलता मतदारांच्या "पॉकेट्‌स'साठी सर्वांचीच फिल्डिंग !
पुणे - निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभागरचना शुक्रवारी जाहीर होणार असली, तरी शहरातील 13 प्रभागांतील हद्द बदलण्यासाठी राजकीय वर्तुळात उलथापालथ सुरू आहे. आपल्याला सोईस्कर अशी प्रभागरचना केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षावर झाला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसबरोबरच भाजपच्याही आमदारांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण वेगवेगळी "फिल्डिंग' लावत आहेत. नात्या-गोत्याचे राजकारण जपण्यासाठी प्रभागरचनेत अनुकूल बदल व्हावा, आरक्षण न बदलता मतदारांच्या "पॉकेट्‌स'ची अदलाबदल व्हावी, यासाठी गेल्या आठ दिवसांपासून प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळाचा कानोसा घेतल्यावर आढळून आले.

शनिवार पेठ- सदाशिव पेठ (प्रभाग 15), कसबा पेठ- सोमवार पेठ (प्र. 16), रास्ता पेठ- रविवार पेठ (प्र. 17), खडकमाळ आळी- महात्मा फुले पेठ (प्र. 18), रामटेकडी- सय्यदनगर (प्र. 25), नवी पेठ- पर्वती (प्र. 29), जनता वसाहत- दत्तवाडी (प्र. 30), कर्वेनगर (प्र. 31), वारजे माळवाडी (प्र. 32), वडगाव धायरी- सनसिटी (प्र. 33), वडगाव बुद्रुक- हिंगणे खुर्द (प्र. 34), राजीव गांधी उद्यान- बालाजीनगर (प्र. 38), आंबेगाव, दत्तनगर- कात्रज गावठाण (प्र. 40) या प्रभागांमध्ये बदल व्हावेत, यासाठी गेल्या 8-10 दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भाजपचे काही आमदार, महापालिकेतील पदाधिकारी, कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी; तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसचे काही पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. प्रभागातील एखादे "पॉकेट' बदलून प्रभागातील आरक्षणाच्या सोडतीला धक्का न लावता, 6-8 हजार लोकसंख्येचा भाग कमी-जास्त करणे, विधानसभा मतदारसंघाची हद्द राजकीय सोयीसाठी जोपासणे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मंत्री-मुख्यमंत्री आणि काही अधिकाऱ्यांकडे राजकीय कार्यकर्त्यांची ये-जा वाढली आहे.

सिंहगड रस्त्यावरील वडगाव धायरी प्रभागाला सनसिटी परिसर जोडण्याचा प्रस्ताव आहे, तर अभिरुची परिसर वडगाव बुद्रुक प्रभागाला जोडावा आदी बदलांसाठी तब्बल 1200 हरकती नोंदविल्या होत्या. त्यातील 500 हरकतींची सुनावणी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रभागांत बदल होईल, अशी दाट शक्‍यता आहे. तसेच प्रभाग 29-30च्या हद्दीत बदल होऊन "कसबा', "पर्वती' मतदारसंघानुसार प्रभाग "क्‍लीअर' होतील का, यासाठी काही माननीयांचे प्रयत्न सुरू आहेत. कसबा गणपती परिसर प्रभाग 16 ऐवजी 15 जोडण्याचा, तर रास्ता पेठ, केईएम प्रभाग 16 ला जोडला जावा, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत. माई मंगेशकर हॉस्पिटलचा परिसर कर्वेनगर प्रभागातून वगळावा, तर गोखलेनगरऐवजी चतुःशृंगी परिसर प्रभाग 14 ला जोडावा, असाही प्रयत्न सुरू आहे. महापौर प्रशांत जगताप यांच्याही प्रभागात बदल होण्याची शक्‍यता आहे, तर प्रभाग 38 आणि 40 मध्ये असलेले पक्षातील नातेगोते, हितसंबंध मोडून काढण्यासाठी प्रभागरचनेत बदल व्हावा, यासाठी स्थानिक मंडळी प्रयत्नशील आहेत. आपण केलेले प्रयत्न "सार्थकी' लागणार का, याबाबत इच्छुकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

बदलांची माहिती वेबसाइटवर
प्रभागरचनेतील बदलाचे तपशील शुक्रवारी जाहीर होणार आहेत; परंतु त्या दिवशी कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय सुटी आहे; परंतु निवडणूक आयोगाकडून आलेल्या बदलांचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर त्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती महापालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी दिली. महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात बदल झालेल्या प्रभागांचे तपशील आणि नकाशे लावणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: ward structure area changes planning