ब्यूटी पार्लरवर वॉच

Beauty-Parlour
Beauty-Parlour

पुणे - ब्यूटी पार्लरमध्ये गेल्यानंतर तेथील सौंदर्य प्रसाधनांच्या गुणवत्तेबद्दल तुमच्या मनात शंका असते का, या प्रश्‍नाचे ६० टक्के स्त्रियांनी ‘हो’ असे उत्तर दिले आहे. पण, तुमच्या मनातील ही शंका आता लवकरच दूर होणार आहे. कारण, आता सौंदर्य प्रसाधनांची विक्रीही औषधाप्रमाणेच बिलावर करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक ब्यूटी पार्लरची नोंदणी अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे. 

ब्यूटी पार्लरचा कोर्स करून त्या आधारावर ही पार्लर सुरू होतात. त्यातही मोजक्‍याच ब्यूटी पार्लरची नोंदणी शॉप ॲक्‍टनुसार झालेली असते. उर्वरित बहुतांश ब्यूटी पार्लर कुठेही नोंदणी न करता सुरू झालेली असतात. ब्यूटी पार्लरमधून मोठ्या प्रमाणात सौंदर्य प्रसाधनांची खरेदी विक्री होते. त्यांच्या गुणवत्तेबद्दल विक्रेता आणि खरेदी करणारा या दोघांनाही हमी नसते, अशी माहिती शहरातील सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यांशी बोलण्यातून मिळाली. त्यामुळे या सौंदर्य प्रसाधनांचा प्रत्यक्षात वापर करणाऱ्या महिलांचा या बाबतचा अनुभव जाणून घेतला. त्यासाठी ‘ब्यूटी पार्लरमधील सौंदर्य प्रसाधनांच्या गुणवत्तेबद्दल तुमच्या मनात शंका असते का,’ हा प्रश्‍न सुमारे शंभर स्त्रियांना विचारण्यात आला. त्यावर साठ टक्के महिलांनी ‘हो’ हे उत्तर दिले.  
नामांकित कंपनीच्या नावाखाली काही इतर सौंदर्य प्रसाधनांची विक्री होते. त्याला ब्यूटी पार्लरमधून मोठ्या प्रमाणात मागणी असते. या दोन्ही किमतीमध्ये खूप मोठी तफावत असते, असे निरीक्षणही सौंदर्य प्रसाधनाच्या डिलरने नोंदविले.

बाजारात मिळणारी सर्व सौंदर्य प्रसाधने त्वचेच्या सौंदर्यासाठी योग्य असतातच असे नाही. त्याची विक्रीची किंमत योग्य आहे का, याची खात्री नसते. सौंदर्य प्रसाधनाच्या उत्पादनासाठी एफडीएच्या परवानगीची गरज असते. पण, त्याची वितरण आणि विक्री करताना त्यासाठी बिलाची सक्ती नसते. 

सरकार कशी देणार गुणवत्तेची हमी?
बिलाच्या आधारावर सौंदर्य प्रसाधनांचे वितरण आणि विक्री करण्याची व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे बनावट सौंदर्य प्रसाधने सहजासहजी उपलब्ध होणार नाहीत. ब्यूटी पार्लरची एफडीएकडे नोंदणी करण्याची तरतूद प्रस्तावात आहे. त्यामुळे उत्पादनांचा दर्जा राहील, असा विश्‍वास एफडीएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सौंदर्य प्रसाधने घेताना हे करा
 किंमत आणि गुणवत्ता याची तुलना करा
     दुकानांमधूनच खरेदी करा
    सौंदर्य प्रसाधनात वापरलेले घटक पहा

सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीसाठी सध्या कोणत्याही बिलाची गरज नाही. त्यामुळे औषधाप्रमाणे त्याच्या खरेदी विक्रीची तपासणी करता येत नाही.
- विद्याधर जावडेकर, सहायक आयुक्त, एफडीए, पुणे विभाग

फेअरनेस क्रिम मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्यात स्टिरॉइड असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातून त्वचा पातळ होऊन संवेदनशील होते. बरीच वर्षे सातत्याने स्टिरॉइडचा वापर केल्याने त्वचेतील रोगप्रतिकारशक्तीही कमी झालेली असते. त्यातून रुग्णांना ‘फंगल इन्फेक्‍शन’ होते. स्टिरॉइडच्या वापरामुळे हा जंतूसंसर्ग बरा होण्यासाठी तीन महिने लागतात. 
- डॉ. धनश्री भिडे, त्वचारोग तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com