कूल जारचे पाणी किती शुद्ध?

Water-Jar
Water-Jar

पुणे - पुण्यात छोट्या-मोठ्या व्यावसायिक, व्यापाऱ्यांकडे दररोज हजारो लिटर ‘कूल’ पाणी पुरविले जाते; पण हे पाणी कितपत शुद्ध आहे, स्वच्छ आहे हे ओळखण्यासाठी ना या व्यापाऱ्यांकडे कोणती यंत्रणा आहे, ना सरकारकडे. तब्बल सोळा ते सतरा कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या आणि सुमारे दहा हजार लोकांना रोजगार देणारी ही व्यवस्था ‘अनियंत्रितच’ आहे. 

सध्या मंगल कार्यालयांपासून ते कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत ‘कूल जार’मधून पाणी पुरवठा होतो. रोजच्या रोज लाखो पुणेकर हे पाणी पितात. टेम्पोमध्ये ‘कूल जार’ भरून त्याची वाहतूक करतानाचे चित्र आपण दररोज रस्त्यांवर बघतो; पण हे पाणी कुठे भरतात, ते कसे भरतात, त्याची गुणवत्ता काय, या प्रश्‍नाचे उत्तर सध्या सरकारमधील कोणत्याच यंत्रणेकडे नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  

बाटली बंद पाणीपुरवठा करणारी शहरात एक यंत्रणा आहे. तसेच, ‘कूल जार’मध्ये रोजच्या रोज पाणी पोचविणारी दुसरी व्यवस्था आहे. पाण्याचे जार मंगल कार्यालये, कार्पोरेट ऑफिस तसेच, छोट्या दुकानांमधून रोज भरून पोचवण्याची सुविधा

हे व्यावसायिक देतात. रिकामे जार घ्यायचे आणि त्या जागी पाण्याने भरलेले जार ठेवायचे, अशी ही व्यवस्था आहे. यापैकी बाटली बंद पाणीपुरवठा करणाऱ्या कंपन्यांची अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) नोंदणी आहे. त्यासाठी ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड’चा (बीआयएस) क्रमांक त्यावर असतो. हे जार पारदर्शक असतात. मात्र, ‘कूल जार’ पारदर्शक नसतात. त्यामध्ये भरणाऱ्या पाण्याच्या व्यवसायाची नोंद नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

आम्हालाही नोंदणी करायची आहे; पण ती कुठे करायची, याची माहिती कोणत्याच सरकारी यंत्रणेकडे नाही. कूल जारच्या व्यवसायातून हजारो हातांना काम मिळाले आहे. त्यामुळे आमच्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता द्यावी, अशी अपेक्षा यातील व्यावसायिकांनी केली. 

नागरिकांना शुद्ध पेयजल पुरविणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. कूल जारमधून विक्री होणारे पाणी पॅकेज ड्रिंकिंग वॉटरमध्ये येत नाही. त्यामुळे त्यावर ‘एफडीए’ला नियंत्रण ठेवता येत नाही
- शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग. 

का होत नाही नोंद?
अन्न सुरक्षा व मानके कायद्यामध्ये फक्त बाटली बंद पाण्याचा समावेश केला आहे.
 त्यामुळे सील बंद बाटलीतून विक्री होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्ता राखण्यापर्यंतच ‘एफडीए’वर जबाबदारी आली आहे. ‘कूल जार’मधून पुरवठा होणारे पाणी हे कायद्याच्या दृष्टीने ‘लूज वॉटर’ आहे. त्याची नोंदणी ‘एफडीए’मध्ये होत 
नाही. 

शहरात ‘कूल जार’ची उलाढाल
 दिवसभरात किमान पंधरा ते वीस हजार ‘कूल जार’ विक्रीचा प्राथमिक अंदाज
 एका जारची किंमत ३० रुपये
 या आधारे शहरात ‘लूज वॉटर’ची वार्षिक उलाढाल सोळा ते सतरा कोटी रुपये.

(स्रोत - यातील व्यावसायिक)

कूल जारची नोंदणी नसल्याने त्यातील पाणी सुरक्षितच आहे, याची हमी देता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याचा धोका आहे. ही बाब सरकारी यंत्रणांकडे वेळोवेळी पोचविली आहे.
विजयसिंह डुबल, अध्यक्ष, महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन. 

बाटली बंद पाण्याची उलाढाल
160 - नोंदणीकृत पाणी उत्पादक
80 हजार जार दिवसभरातील विक्री
50 रुपये एका जारची किंमत 
50 कोटी वार्षिक उलाढाल 

आपल्या सूचना फेसबुक आणि ट्विटरवर मांडा #PuneCoolJar हॅशटॅगवर
ई- मेल करा webeditor@esakal.com वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com