डोक्यावरील हंडा उतरविण्याऐवजी ठेवण्यासाठी चढाओढ

water-crisi
water-crisi

जुन्नर - ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी शासकीय पातळीवरून गेली अनेक वर्षे प्रयत्न होताना दिसत आहेत. काही ठिकाणी त्याला यश मिळाले आहे. जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र पाणी टंचाईच्या निमित्ताने नेमके उलट चित्र दिसत आहे. येथे महिलांच्या डोक्यावर हंडा ठेवत असताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत असल्याने चर्चेचा विषय बनले आहेत.

तालुक्याच्या पूर्व व पश्चिम आदिवासी भागात, तसेच दुर्गम वाड्यावस्त्यांवर 'मे'च्या अखेरीस पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने बसू लागल्या आहेत. ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे टँकरचे प्रस्ताव दाखल केले. परंतु, टॅंकर मंजुरी व उपलब्धता यात बरेच दिवस गेले. या तहानलेल्या गावासाठी जुन्नर तालुका रहिवासी संघ, पुणे व येथील अतुल बेनके युवा मंचाच्या वतीने बुधवार ता.23 पासून एका टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली. या नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी गुरुवारी ता.24 रोजी आमदार शरद सोनवणे व जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी स्वखर्चाने एक टँकरने पाणी पुरवठा करण्यास समारंभपूर्वक सुरुवात केली. 

सुखाची गोष्ट म्हणजे टँकरच्या चढाओढीत तहानलेल्या जनतेला, पाळीव प्राण्यांना पाणी मिळू लागले. ही समाधानाची बाब आहे. याचबरोबर शासकीय टॅंकर उपलब्ध झाल्याने 5 गावे 67 वाड्यात 4 टॅंकर व एक ट्रॅक्टरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणी टंचाईला मे च्या तिसऱ्या आठवड्यात तोंड द्यावे लागले आहे. भर उन्हात अनवाणी पायांनी पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली असताना लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांच्यात मात्र टँकर पुरविण्याची चाललेली चढाओढ पाहताना ही गावे टँकरमुक्त कशी करता येतील याचा विचार होत नसल्याबद्दल खेद व्यक्त होत आहे. आपल्या फोटोचे फ्लेक्स लावलेल्या टॅंकर पाठोपाठ टंचाईच्या गावात जाऊन तेथे पाणी देत असताना, महिलांच्या डोक्यावर पाण्याचे भरलेले हंडे उचलून देत असतानाचे फोटो काढून ते सोशल मीडियावर प्रसिध्द करण्यात देखील स्पर्धा असल्याचे चित्र गेले दोन दिवस दिसत आहे. 

पाच धरणे असलेल्या जुन्नर तालुक्यात भेडसावणारी पाणी टंचाई हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. यावर मात करण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे. पश्चिम आदिवासी भागात सर्वाधिक पाऊस पडतो पाणी वाहून जाते ते जमिनीत मुरविणेसाठी उपाययोजना हाती घेणे, माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बुडीत बंधाऱ्याच्या प्रलंबित कामास गती देणे, कमी पावसाच्या पूर्व भागात जलसंधारणाची कामे हाती घेणे, खडकातील पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढविणे अशी ठोस कामे व्हावीत अशी येथील जनतेची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com