पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी बारामती तालुक्याची प्रतिष्ठा पणाला

विजय मोरे
सोमवार, 9 एप्रिल 2018

राज्यातील 75 तालुक्यातील 4 हजार 30 गावे 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे.

उंडवडी - राज्यात यंदा 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' ही तिसरी 45 दिवसांची स्पर्धा 8 एप्रिलपासून सुरु झाली असून 22 मेला संपणार आहे. या स्पर्धेत बारामती तालुक्यातील 33 गावांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बक्षीस बारामती तालुक्यातील गावानांच मिळावे, यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, प्रशासन तसेच सर्वच विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांसह सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या स्पर्धेत राज्याच्या नकाशावर बारामतीचं बाजी मारणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. या स्पर्धेत राज्यस्तरीय पहिले बक्षीस 75 लाख, दुसरे 50 लाख, तिसरे बक्षीस 40 लाख तर चौथे तालुकास्तरीय 10 लाख रुपये ठेवण्यात आले आहे. 

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेले नेते व केंद्रीय माजी कृषीमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळे बारामतीला राजकीय पंढरी मानले जाते. त्यामुळे राज्यातील पहिले, दुसरे किंवा तिसरे बक्षीस बारामती तालुक्यात आणण्यासाठी सर्वानीच ताकत लावली आहे. 

राज्यातील 75 तालुक्यातील 4 हजार 30 गावे या स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. या स्पर्धेत पाणी बचतीचे विविध उपक्रम, घरातून वाया जाणाऱ्या पाण्यासाठी शोष खड्डे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गावाने रोपवाटिका तयार करुन लोकसंख्येंच्या दुप्पट वृक्षारोपण, जलसंधारणाच्या विविध कामासाठी श्रमदान व लोकसहभागातून यंत्राने विविध कामे, गावाचे माती परिक्षण, काडी पेटी मुक्त शिवार, गावाचे पाण्याचे बजेट, नापेड प्रकल्प, माथा ते पायथा या तंत्राने जलसंधारणाची विविध कामे आदी कामे गुणवत्तापूर्ण करायची आहेत.
Water Foundation

पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत भाग घेतलेली बारामती तालुक्यातील 33 गावे पुढीलप्रमाणे
वढाणे, सुपा, काळखैरवाडी, बऱ्हाणपूर, नेपतवळण, भिलारवाडी, पळशी, मासळवाडी, दंडवाडी, आंबी बुद्रुक, काऱ्हाटी, खराडेवाडी, निंबोडी, उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, कटफळ, मूर्टी, कऱ्हावागज, वाकी, सोरटेवाडी, कन्हेरी, सावंतवाडी गोजुबावी, पानसरेवाडी, लोणी भापकर, जळगाव सुपे, पारवडी, अंजनगाव, गाडीखेल, कांबळेश्वर, शिरवली, सदोबाचीवाडी या गावांचा समावेश आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Water Foundation Satyamev Jayate Water Cup competition