पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब देणार 

पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब देणार 

पुणे - ""समान, अखंड आणि 24 तास पाणीपुरवठा करताना "वॉटर ऑडिट'बाबत भारतीय जनता पक्षाने आग्रही भूमिका घेतली आहे. मागेल त्याला पाणी देताना आम्ही पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेबही जनतेला देणार आहोत,'' अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी दिली. 

पक्ष कार्यालयात आयोजिलेल्या कार्यकर्त्यांच्या अभ्यासगटासमोर ते बोलत होते. ते म्हणाले, ""मुबलक पाणी असल्याने तसेच राजकीय इच्छाशक्ती नसल्याने आपल्याकडे पाण्याचे ऑडिट हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. परंतु, 24 तास पाणी हवे असेल तर त्याच्या हिशेबालाही प्राधान्य द्यावे लागेल. राजकारणाच्या नादात सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने "वॉटर ऑडिट'कडे पूर्णपणे डोळेझाक केली. त्यामुळेच गळतीचे प्रमाण 30 टक्‍क्‍यांवर गेले. अधून-मधून येणारा दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे आपल्याला गळतीची बाब परवडणारी नाही. म्हणूनच अभ्यासपूर्ण भूमिका घेऊन आम्ही मतदारांना सामोरे जात आहोत. मागणी व पुरवठ्याचे संतुलन ठेवायचे असेल तर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब ठेवण्यावाचून पर्याय नाही. म्हणूनच गळती थांबविण्यासाठी आम्ही कठोर होणार आहोत.'' 

बापट म्हणाले, ""असमान पाणीपुरवठ्याची तीन कारणे आहेत. शहराची बशीसारखी असलेली भौगोलिक रचना, जुनाट व जीर्ण वितरण व्यवस्था आणि अपुऱ्या टाक्‍या हे ते तीन मुद्दे आहेत. या तीनही मूलभूत गोष्टींचा अभ्यास करून नव्या व्यवस्थेचा आराखडा भाजपने तयार केला आहे. यात 2047 पर्यंत पुण्याची लोकसंख्या 75 लाखापर्यंत जाईल, असे गृहीत धरून त्या वेळी पुण्याची दररोजची मागणी 1906.26 दशलक्ष लिटर्स असेल, असा अंदाज केला आहे. 50 वर्षानंतरही पुणेकर जनतेला दरडोई 150 लिटर पाणी देण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांची व पुरवठा करणाऱ्या टाक्‍यांची संख्या वाढविणार आहोत. नव्या आराखड्यात सध्याच्या पाणीपुरवठा विभागाची संपूर्ण पुनर्रचना सुचविली आहे. पुणेकरांना 12 मीटर पेक्षा जास्त दाबाने पाणी देताना नैसर्गिक चढउतार, नाले, रेल्वे, कालवे व मुख्य रस्त्यांमुळे आलेल्या मर्यादांचा विचार केला आहे. शहराचे एकूण 141 विभाग तयार करून ते 328 उपविभागांना जोडणार आहोत. हे सर्व विभाग जलवाहिन्यांचे नेटवर्क उभे करतील आणि 16 लाख 18 हजार मीटरचे पाइप नव्याने टाकतील.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com