पुणे: होळकर जलशुद्धीकरण यंत्रणा बिगाऱ्याच्या हाती

wadgaon
wadgaon

पुणे : पुर्व पुण्याच्या लाखो लोकसंख्येला पाणी पुरवठा करणाऱ्या होळकर पाणी पुरवठा केंद्राची जलशुध्दीकरण यंत्रणा आणि पाणी तपासणी प्रयोगशाळा कोण्या तज्ञ व्यक्तीच्या हातात आहे असा जर आपला समज असेल तर तो काढून टाका. कारण या केंद्रावर ही सगळी कामे ठेकेदाराचा बीगारी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांनी शनिवारी (14) उघडकीस आणला.

येथे जलशुद्धीकरणाच्या सोळा यंत्रांपैकी दहा यंत्र बंद असून काहींच्या विद्युत मोटारीच जागेवरून गायब आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाच्या या प्रकाराला जबाबदार अधिकारी मात्र ठेकेदारावर कारवाई करण्याऐवजी त्याच्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठी आटापीटा करीत असल्याचे शनिवारी दिसून आले. 

विश्रांतवाडी, कळस, धानोरी, विदयानगर, विमाननगर भागात अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक नागरिक आजारी पडत आहेत. या पार्श्वभुमिवर धानोरी प्रभाग एकच्या नगरसेविका रेखा टिंगरे, राष्ट्रवादी युवती उपाध्यक्षा कोमल टिंगरे, कमल फाउंडेशनचे चंद्रकांत टिंगरे यांनी सकाळ'सोबत या जलशुद्धीकरण केंद्राची पाहाणी केली. त्यावेळी येथे सुरू असलेला सावळा गोंधळ समोर आला. 

नविन होळकर जलशुद्धीकरण केंद्राला वारज्यातून बंद पाईपने पाणी पुरवठा केला जातो. धरणातून आलेले पाणी सुरूवातीला मोठ्या टाक्यांमधून सोळा यंत्रांच्या सहाय्याने ढवळून त्यात द्रवरूप तूरटी टाकली जाते. त्यामुळे पाण्यातील अशुद्धता व गाळ तळाला जमते. मात्र या टप्यातील दहा यंत्रच बंद आहेत. त्यामुळे पुर्ण क्षमतेने पाणी शुद्ध न होता तसेच पुढे शुद्धीकरण वाफ्यांकडे जाते. येथील सगळ्या वॉलव्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. येथे रोज लाखो लीटर पाणी वाया जाते आहे. 

शेवटी संपवेलकडे पाणी जाताना त्यात क्लोरीन मिसलळे जाते. येथे शुध्दीकरण केलेल्या पाण्याचे नमुने याच केंद्रातील प्रयोगशाळेत तपासले जातात. त्यात जर काही दोष असेल तर जलशुद्धीकरण यंत्रणेतून तो तात्काळ दुर केला जातो. यासाठी पाणी तपासणी प्रयोगशाळेत पात्रताधारक रसायन तज्ञ या पाण्याच्या सहा ते सात तपासण्या करतो.  त्यानंतर पुन्हा ते पाणी पर्वतीतील पालिकेच्या पाणी तपासणी प्रयोगशाळेत पाठवले जाते. तेथून आलेल्या अहवालानुसार तात्काळ पाण्यातील अशुद्धता दुर करण्यासाठी कार्यवाही करणे अपेक्षीत असते. 

मात्र येथील प्रयोगशाळेत रसायन (केमीस्ट) तज्ञ नसल्याने हे काम येथील दहावी शिक्षण झालेले ठेकेदाराचे कर्मचारी करीत आहेत. हेच बिगारी पाण्यात क्लोरीन टाकण्याचे कामही करीत आहेत. याविषयी विचारल्यावर अधिकाऱ्यांनी सारवासरव करीत प्रयोगशाळा तज्ञ सुट्टीवर असल्याचे सांगितले. संबंधित प्रयोगशाळा तज्ञाशी संपर्क केल्यावर त्याने नोकरी सोडल्याची माहिती दिली. तर या केंद्रावर ठेकेदाराचा कोणीही केंद्र निरीक्षक उपस्थित नव्हता. तसेच पाणी पुरवठा विभागाचे कोणीही अधिकारी दोन दिवस येथे फिरकले नसल्याची माहिती मिळाली.   

पालिकेच्या शेऱ्याकडे दुर्लक्ष -
पाणी ढवळून त्यातील गाळ बाजुला करणाऱ्या यंत्रणेतील सोळा पैकी दहा यंत्र बंद असल्याने पाणी स्वच्छ होत नाही. पाण्याचा गढुळपणा जास्त असल्याचा आणि क्लोरीन योग्य प्रमाणात मिसळले जात नसल्याचा अहवाल पर्वती पाणी तपासणी प्रयोगशाळेने दिला असून तसा शेरा तपासणी रजीस्टरवर लिहीला आहे.  त्याकडे ठेकेदार व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते आहे.

पाण्याच्या चाचण्या बंद ?
पावसाळ्यात पाण्यातील गढूळपणा तपासण्याचे काम दर तासाला करून तशा पद्धतीने द्रवरूप तूरटीची मात्रा वापरली जाते. त्यानंतर शुद्ध झालेल्या पाण्याच्या पुन्हा सहा तपासण्या केल्या जातात. मात्र या क्रेंद्रारवर हे काम करणारा तज्ञच नसल्याने गेले दोन दिवस हे काम करणे बंद आहे. 

पाण्याच्या कोणत्या चाचण्या करणे बंधनकारक ः गढुळपणा, क्लोरीनचे प्रमाण, पीएच चे प्रमाण, जडपणा, अल्कलाईनीटी, क्लोराईड चाचणी.  

अधिकाऱ्यांची सारवासारव
पाणी तपासणी प्रयोगशाळा तज्ञ या केंद्रावर दहा दिवसांपासून नाही. दुसऱ्या तज्ञाची नेमणुक ठेकेदार करणार आहे. पाणी ढवळणाऱ्या मोटारी दुरूस्तीला दिल्या आहेत. या जलशुद्धीकरण केंद्रावरील ठेकेदाराचा निरीक्षक आज रजेवर गेला आहे. - शशिकांत ब्राह्मणकर ( सहाय्यक अभियंता, पाणी पुरवठा विभाग)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com