गृहनिर्माण सोसायट्यांत टॅंकरच्या वाऱ्या

गृहनिर्माण सोसायट्यांत टॅंकरच्या वाऱ्या

पिंपरी - महापालिकेच्या तिजोरीत कररूपाने सर्वाधिक महसूल जमा करणाऱ्या पिंपळे सौदागरमधील नागरिकांना उन्हाळ्याच्या तोंडावरच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या महिनाभरात तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असून, येथील बहुतांश हाउसिंग सोसायट्यांमधील टॅंकरच्या वाऱ्याही वाढल्याचे चित्र आहे. अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये दिवसाला तब्बल २०-२२ टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी सोसायट्यांना दिवसाकाठी दहा ते १५ हजार रुपये खर्च येत आहे. पाणीटंचाईमुळे संतप्त असलेल्या या सोसायट्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे महिनाभरापासून सोसायटीधारकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्याबाबत ‘ब’ प्रभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मेंटनन्सव्यतिरिक्त टॅंकरवर होणाऱ्या अव्वाच्या सव्वा खर्चामुळे सोसायटीधारकांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे. शेकडो सदनिका असलेल्या सोसायट्यांना या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. रोजच्या गरजेपेक्षा ५० ते ६० टक्के कमी पाणीपुरवठा होत असल्याचे सोसायट्यांचे म्हणणे आहे. 

पिंपळे सौदागरमधील कुणाल आयकॉन सोसायटीमध्ये ८५० सदनिका; तर ४० रो-हाउस आहेत. 

येथील लोकसंख्या चार हजारांच्या आसपास आहे. उन्हाळा वगळता अन्य दिवसांत महापालिकेकडून दिवसाला तीन लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. पुरवठा आणि गरज यांची सांगड घालत विंधनविहिरी; तसेच ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या माध्यमातून केलेल्या पाणी संचयनातून गरज भागविली जाते. तथापि, फेब्रुवारी ते मार्चदरम्यान विंधनविहिरी सुकू लागतात. त्यामुळे टॅंकर बोलविण्याशिवाय पर्यायच राहात नाही. गेल्या काही दिवसांत महापालिकेकडून केवळ दीड ते दोन लाख लिटर पाणीपुरवठा होत असल्याने उर्वरित चार ते पाच लाख लिटर पाण्याची सोय टॅंकरमार्फत करावी लागते. त्यासाठी दिवसाला २० ते २२ टॅंकर बोलवावे लागत असून, एका टॅंकरसाठी ६०० ते सातशे रुपये याप्रमाणे दिवसाला १२ ते १५ हजारांचा बोजा सोसायटीवर पडत आहे. 

याबाबत सोसायटीचे अध्यक्ष अशोक शिंदे म्हणाले, ‘‘पिंपळे सौदागरमध्ये बहुतांश सोसायट्यांमध्ये निवृत्त ज्येष्ठ नागरिक राहातात. त्यांना मिळकतकर, सोसायटी मेंटेनन्स आणि टॅंकर असा मोठा आर्थिक भार उचलावा लागतो. निवृत्तिवेतनावर ते विसंबून असल्याने त्यांना हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. शिवाय, अन्य रहिवासीही नाराजी व्यक्त करत असल्याने महापालिकेने लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा करावा.’’ 
कुणाल आयकॉनप्रमाणेच रोझ वूड, प्लॅनेट मिलेनियम, दीपमाला, रोझलॅंड आदी सोसायट्यांमधीलही हीच अवस्था आहे. टॅंकरच्या फेऱ्यांमुळे प्रत्येक कुटुंबावर महिन्याला तीन हजार रुपयांचा अतिरिक्त भार येत असल्याचे अनिल देवरे यांनी सांगितले. पाण्याचा दाब कमी असल्याचे त्यांनी सांगितले.

तांत्रिक अडचणींची शक्‍यता
पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर म्हणाले, ‘‘पवना धरणातून दिवसाला ४६५ दशलक्ष घनमीटर पाणी उचलले जाते. अद्याप त्यात कोणतीही कपात केली नाही. फेब्रुवारी, मार्चमध्ये विंधनविहिरी आटू लागल्याने पाण्याच्या मागणीत वाढ होऊन समस्या उद्‌भवते. स्थानिक पातळीवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानेही पाण्याच्या दाबावर परिणाम होतो. पिंपळे सौदागरमध्येही अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे, याचा तपास करावा लागेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com