सनदशीर मार्गाने शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत लढा- वासुदेव काळे

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 22 एप्रिल 2018

पश्चिम महाराष्ट्रातील शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत पश्चिम महाराष्ट्र धरणग्रस्त संघटनेचा लढा सुरु राहील अशी ग्वाही पश्चिम महाराष्ट्र प्रकल्प व धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली.   

भिगवण : जिल्ह्यासह राज्यातील प्रकल्पग्रस्त मागील पन्नास वर्षापासुन न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मोबदला न मिळणे, दाखले न मिळणे, पर्यायी जमिनी न मिळणे अशा स्वरुपाचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जवळपास सारखेच आहेत. एकटयाने लढल्यामुळे दोन पिढया संपल्या तरीही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजुनही कायम आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेवटच्या धरणग्रस्तास न्याय मिळेपर्यंत पश्चिम महाराष्ट्र धरणग्रस्त संघटनेचा लढा सुरु राहील अशी ग्वाही पश्चिम महाराष्ट्र प्रकल्प व धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली.   

पश्चिम महाराष्ट्र प्रकल्प व धरणग्रस्त संघटनेच्या वतीने प्रकल्प व धरणग्रस्त संवाद परिषदेचे आयोजन येथील मल्लीनाथ मठामध्ये करण्यात आले होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ प्रकल्पग्रस्त शेतकरी जगन्नाथ कडु पाटील होते तर उजनी प्रकल्पग्रस्त संघटनेचे प्रमुख तुकाराम सरडे, भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मारुती वणवे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अशोक शिंदे, शहाजी जाधव, केशव जगताप, गजानन जगताप, अशोक गायकवाड, नानासाहेब पवार उपस्थित होते. 

श्री. काळे पुढे म्हणाले, यापुर्वी धरणग्रस्तांचा वापर केवळ निवडणुकीच्या तोंडावर प्रश्न सोडविण्याचे गाजर दाखविण्यासाठी केला गेला यापुढे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अभ्यासपुर्ण व सनदशीर मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करु. यावेळी बोलताना तुकाराम सरडे म्हणाले, धरणग्रस्त त्याच्याकडील जमीन, घर व मालमत्ता गेल्यामुळे दुबळा झाला. असंघटित प्रकल्पग्रस्तांची शासकीय पातळीवर प्रतारणा झाली. दलालांकडुनही फसवणुक झाली. शासनाने मंजुर केलेल्या अनेक बाबी अधिकाऱ्यांच्या बेफिरीमुळे व प्रशिक्षणाच्या अभावामुळे मिळाल्या नाहीत. येळवंडे धरणग्रस्तांनी त्यांच्या हक्कासाठी दिलेला लढा हा राज्यामध्ये आदर्श आहे. यापुढील काळांमध्ये येळवंडे धरणग्रस्तांचा आदर्श पुढे ठेवून प्रकल्पग्रस्तांनी लढा उभारण्याची आवश्यकता आहे.    

प्रवीण लोंढे, राजेश राऊत, तुकाराम अवचर, संदीप लगड, रामराजे शिंदे, सुहास गलांडे, हनुमंत कन्हेरकर आदींसह शेतकऱ्यांनी आपल्या अडचणींचा व प्रश्नांचा पाढा वाचला. प्रास्ताविक मारुती वणवे यांनी केले सुत्रसंचालन मनोज फडतरे यांनी केले तर आभार विकास काळे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन राजेश राऊत, बाळासाहेब ढमे, राजेंद्र जमदाडे, दिनेश मारणे यांनी केले.

धरण बांधिते माझे मरण कांडिते 
राज्यातील सर्वाधिक प्रकल्प हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची संख्याही येथे मोठी आहे. प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुर्नवर्सन न झाल्यामुळे पन्नास वर्ष उलटली तरीही प्रश्न कायम आहेत. व्यक्तीगत व संघटनात्मक पातळीवरुन लढुनही न्याय मिळाला नसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. कोणास जमिनीचा मोबदला मिळाला नव्हता तर कोणाला पर्यायी जागा मिळाली नव्हती, कोणाला दाखला मिळाला नव्हता असे अनेक प्रश्न संवाद परिषदेच्या निमित्ताने चर्चिले गेले. परिषदेच्या निमित्ताने प्रज्ञा दया पवार यांचे कवितेतील बाई मी धरण बांधिते, माझे मरण कांडिते या ओळींचाच प्रत्यय क्षणोक्षणी आला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: western Maharashtra dam projects compensation issue