कुंडली काय सांगतेय हो माझी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

उमेदवार ज्योतिषांच्या दारात; मतदानाच्या पूर्वसंध्येला वाढली धाकधूक
पुणे - निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर ‘आपण निवडून येऊ का’ अशी धाकधूक मनात सतत असते. प्रत्यक्ष मतदानाचा क्षण जवळ आल्यामुळे ही धाकधूक आणखीनच वाढली असून मतमोजणीच्या दिवसापर्यंत ती कायम राहणार आहे. अशा वातावरणात थोडासा दिलासा मिळावा म्हणून बरेच उमेदवार ज्योतिषांची भेट घेऊन त्यांना आपला ‘हात’ दाखवताना दिसत आहेत.

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार मतदारांच्या दारात, हे चित्र आपण गेले काही दिवस पाहत होतो. आता प्रचाराचा टप्पा संपला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार हातात कुंडली घेऊन आणि मनात ‘मी निवडून येईन का’ हा प्रश्‍न घेऊन ज्योतिषांच्या दारात पाहायला मिळत आहेत. मात्र, ज्योतिषांनी सांगितलेले भविष्य खरे ठरणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.

ज्योतिषी सिद्धेश्‍वर मारटकर, विजयकुमार स्वामी म्हणाले, ‘‘प्रचाराची मोहीम संपली असून उद्या (ता. २१) पुण्यात मतदान होईल. या दरम्यान मनात धाकधूक वाढत असते. त्यामुळे उमेदवार आमच्याकडे येतात. बऱ्याच उमेदवारांचे कुटुंबीयही त्यांची कुंडली घेऊन येत आहेत. ‘विजयाची शक्‍यता आहे का’, असा प्रश्‍न ते विचारतात. कुंडली नसली तरी प्रश्‍नकुंडली तयार करून आम्ही भविष्य सांगू शकतो; पण भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता बऱ्याच उमेदवारांमध्ये दिसत आहे.’’
 
पक्षांतर्गत स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे तिकीटवाटपाच्या आधी ‘पक्ष आम्हाला तिकीट देईल का’, असा प्रश्‍न इच्छुक आम्हाला विचारत होते. तिकीट मिळाल्यामुळे ‘आता निवडून येऊ ना’ असा प्रश्‍न ते विचारत आहेत. यात सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. निवडून येणार का, हे सांगण्यासाठी विरोधकांची कुंडली पाहणे हेही तितकेच गरजेचे असते.
- विजय जकातदार, ज्योतिषी