पाणीकपात कशासाठी? कोणासाठी?

पाणीकपात कशासाठी? कोणासाठी?

नागरिकांच्या तक्रारी; जादा पाणीपुरवठा करीत असल्याचा प्रशासनाचा दावा

पिंपरी - पिंपरी-चिंचवडला पुढील तीन महिने पाणीपुरवठा करता येईल, इतका पाणीसाठा पवना धरणामध्ये शिल्लक असताना, ऐन उन्हाळ्यात महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन नागरिकांना वेठीस धरले आहे. या पद्धतीने नागरिकांना जादा पाणीपुरवठा करीत असल्याचा दावा महापालिकेचे अधिकारी करीत आहेत. मात्र, अनेक भागात लोकांच्या तक्रारी वाढल्या असून, त्यांना पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरवर विसंबून राहावे लागत आहे.

जलसंपदा विभाग पिंपरी-चिंचवडला नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यास तयार असतानाही महापालिका प्रशासनाने मेमध्ये दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला. लोकांच्या तक्रारीनंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत दोन दिवसांत फेरविचार करण्याचे आश्‍वासन गेल्या आठवड्यात दिले, तर पाणीपुरवठा एकदिवसाआड केला जाईल, अशी ठाम भूमिका महापौर नितीन काळजे यांनी घेतली.

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागी भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर, हा निर्णय झाल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

पाणीकपातीचा अनाकलनीय निर्णय 
निम्म्या शहराला दिवसाआड जादा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दररोज ६० एमएलडी पाणीबचत केल्याने आठवड्याला एक दिवसाचे पाणी वाचेल. यंदा पुरेसा पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र, पाऊस उशिरा येईल, असा अंदाज बांधून ऑगस्टमधील दहा दिवसांचे पाणी शिल्लक ठेवण्यासाठी रणरणत्या मेमध्ये २५ टक्के पाणीकपातीचा महापालिकेने घेतलेला निर्णय अनाकलनीय आहे.

अशी आहे वस्तुस्थिती
पवना धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा : २.८१ अब्ज घनफूट (टीएमसी)
पिंपरी- चिंचवडला दरवर्षी लागणारे पाणी : ६ टीएमसी (दरमहा ०.५० टीएमसी पाणी पुरेसे)
जलसंपदा विभागाच्या मते : धरणातील पाणीसाठा १५ जुलैपर्यंत वापरावा लागतो. सर्वांना मागणीइतके पाणी देऊनही १५ जुलैपर्यंत यंदा धरणात ०.९१ टीएमसी पाणी शिल्लक राहील
धरणातील अचल साठा : १.१० टीएमसी. पैकी अर्धा टीएमसी म्हणजे पिंपरी- चिंचवडला महिनाभर पुरेल एवढे पाणी
आजची स्थिती : पावसाळा संपण्याच्या काळापर्यंतचा पाणीसाठा धरणात उपलब्ध
पाणीकपातीपूर्वीचे शहरातील प्रमाण : महापालिका दररोज ४६० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरवीत होते 
पाणीकपातीनंतरचे प्रमाण : ३८० ते ४०० एमएलडी

निर्णय पालिकेचा - मठकरी

पवना धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, जलसंपदा विभागाने पाणीकपात करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेला कळविलेले नाही, असे जलसंपदा विभागाच्या पवना धरणाचे उपविभागीय अधिकारी नानासाहेब मठकरी यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. 

मठकरी म्हणाले, ‘‘सर्व पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा केल्यानंतरही १५ जुलैला धरणामध्ये ०.९१ टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी शिल्लक राहील. त्यामुळे पिंपरी-चिंचवडला जुलैअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. अचल साठ्यातील पाणी वापरण्याचे ठरल्यास ऑगस्टमध्येही पाणी पुरविता येईल. त्यामुळे पाणीकपात करण्याची सूचना आम्ही महापालिकेला केलेली नाही.’’

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, ‘‘पाणीकपात करण्यास जलसंपदा विभागाने आम्हाला कळविलेले नाही. सुरक्षिततेच्या उद्देशाने आम्हीच २५ टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. सध्या ४७० एमएलडीऐवजी ३८० ते ४०० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी देतो. त्यामुळे तशी १५ टक्केच कपात लागू केली. निम्म्या शहराला दररोज जादा पाणी दिल्याने उंच भागात राहणाऱ्या लोकांनाही पुरेसे पाणी मिळते आहे. त्यांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत.’’

पाणीटंचाईमुळे चिखलीकर हैराण

चिखली - पाणीपुरवठा वितरणातील त्रुटी, अनधिकृत बांधकामांसाठी नागरिकांकडून वापरले जाणारे पिण्याचे पाणी आणि महापालिकेतर्फे सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा यामुळे चिखली परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी आहे. 

शहरात मेच्या सुरवातीपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे रहिवासी दोन दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करून ठेवतात. परंतु, चिखली परिसरात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याचाच वापर बांधकामासाठी केला जात आहे. बांधकामे करणारे नागरिक पहाटेच इलेक्‍ट्रिक पंप लावून पाण्याचा उपसा करतात. परिणामी इतर रहिवाशांच्या नळजोडाला पाणी येत नाही. एक हंडा भरण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटे वेळ लागतो. अनेकांना पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. 
माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे म्हणाले, ‘‘पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा.’’ पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल कांबळे म्हणाले, ‘‘पाणीपुरवठाबाबतच्या तक्रारी त्वरित सोडविल्या जातील. पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. परंतु, तशा तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com