उद्योगनगरीचा महापौर कोण?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

भाजपचे दहा नगरसेवक दावेदार; जोरदार रस्सीखेच, नेत्यांची मनधरणी सुरू

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेचे महापौरपद ओबीसी गटासाठी राखीव आहे. भाजपकडून या गटातील २४ उमेदवार निवडून आले असून, त्यातील दहा जण दावेदार आहेत. त्यामुळे महापौरपद कोणाला मिळणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे दहा नगरसेवक दावेदार; जोरदार रस्सीखेच, नेत्यांची मनधरणी सुरू

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेचे महापौरपद ओबीसी गटासाठी राखीव आहे. भाजपकडून या गटातील २४ उमेदवार निवडून आले असून, त्यातील दहा जण दावेदार आहेत. त्यामुळे महापौरपद कोणाला मिळणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी- चिंचवड शहरात ओबीसी गटासाठी एकूण ३५ जागा राखीव आहेत. त्यापैकी १८ जागा महिलांसाठी, तर १७ जागा पुरुष गटासाठी आहेत. महापौरपद हे ओबीसीसाठी राखीव असले तरी, महिलाही हे पद भूषवू शकते. मात्र, महिलेला महापौरपदी संधी देण्याची शक्‍यता कमी आहे. महापालिकेवर भाजपची सत्ता आली असून, याच पक्षाचा महापौर होणार, हे निश्‍चित आहे. भाजपकडून महापौरपदासाठी दहा जण पात्र आहेत. त्यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. हे पद आपल्यालाच मिळावे व आपण या पदासाठी कसे योग्य आहोत, हे नेत्यांसमोर सादर करण्यासाठी चढाओढ लागली आहे.

फिरता रंगमंच, की...
भाजपतील महापौरपदाचे सर्वच दावेदार हे एकमेकाला वरचढ आहेत. त्यामुळे महापौर निवडतानाही भाजपचा कस लागणार आहे. प्रत्येकाला एक वर्ष पद देऊन हे पद फिरता रंगमंच ठेवणार की राष्ट्रवादीप्रमाणे पाच वर्षांत दोघांना अडीच वर्षांची संधी देणार?, याकडेही शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. यामुळे भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान कोणाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

महापौरपदाचे दावेदार
चिंचवड मतदार संघ

    सुरेश भोईर     प्रभाग १८
    नामदेव ढाके     प्रभाग १७
    शत्रुघ्न काटे     प्रभाग २८
    शशिकांत कदम     प्रभाग २९
    तुषार कामठे     प्रभाग २६

पिंपरी मतदार संघ
    संदीप वाघेरे     प्रभाग २१
 
भोसरी मतदार संघ
    नितीन काळजे     प्रभाग ३
    सागर गवळी    प्रभाग ५
    संतोष लोंढे    प्रभाग ७
    केशव घोळवे    प्रभाग १०

भाजपचा मी जुना चेहरा असून, पक्षाची ओळख आहे. २० वर्षांपासून पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. दिग्गजांना पाडून सर्व पॅनेल निवडून आणले आहे. ही कामगारनगरी आहे. एका कामगाराला संधी दिल्यास राज्यात व देशात चांगले नाव जाईल.
- नामदेव ढाके 

आमचा भाग ग्रामीण आहे. गेल्या २० वर्षांत एकदाही समाविष्ट गावाला कोणत्याही मोठ्या पदाची संधी मिळालेली नाही. कोणत्याही निवडणुकीत आमच्या गावची मते निर्णायक ठरतात. आमचा गाव शेती प्रधान असून, मी स्वतः शेतकरी आहे. यामुळे मला संधी देतील, अशी अपेक्षा आहे.
- नितीन काळजे 

संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून सर्वाधिक मताधिक्‍य घेऊन निवडून आलो आहे. मी पदवीधर असून, आमच्या घराण्याला आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. आजपर्यंत चिंचवडगावातून एकही पुरुष महापौर झालेला नाही. यामुळे महापौरपदासाठी मला संधी देतील, अशी अपेक्षा आहे.
- सुरेश भोईर

पिंपळे-सौदागर परिसरात विकासकामे करून जनतेमध्ये विश्‍वास निर्माण केला आहे. या जोरावरच मला मोठ्या मताधिक्‍याने निवडून दिले. १९९२ मध्ये अप्पासाहेब काटे यांना महापौरपद मिळाले होते. त्यानंतर कोणतेही मोठे पद पिंपळे-सौदागरला मिळालेले नाही. यामुळे येथील नागरिकांच्या महापौरपदाबाबत अपेक्षा आहे.
- शत्रुघ्न काटे

गेली पाच टर्म म्हणजे १९९७ पासून आपल्या घरात नगरसेवकपद आहे. मी स्वतः तीनदा नगरसेवक झालो आहे. यामुळे कामाचा चांगला अनुभव आहे. याशिवाय मी मूळ ओबीसी असून, मला पद दिल्यास ओबीसींना न्याय दिल्यासारखे होईल.
- संतोष लोंढे

Web Title: who is the mayor pimpri-chinchwad