वन्यप्राणी हल्ल्याच्या भरपाईत वाढ

Leopard
Leopard

शेटफळगढे - वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी किंवा पशुधनाची हानी झाल्यास दिल्या जाणाऱ्या सरकारी अर्थसाह्यात वन विभागाने नुकतीच वाढ केली आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ९ जुलै रोजी विधानसभेत पुरवणी मागणीच्या चर्चेवेळी यासंदर्भातील अर्थसाह्यात वाढ करण्याची वनमंत्र्यांनी घोषणा केली होती. या घोषणेनुसार सरकारने ११ जुलैला घेतलेल्या निर्णयाच्या आधारे या नव्या अर्थसाह्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार मनुष्यहानीच्या बाबतीत जर वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे यांच्या हल्ल्यामुळे संबंधित व्यक्ती मृत झाल्यास दहा लाख, व्यक्तीस कायमचे अपंग आल्यास ५ लाख, व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाल्यास १ लाख २५ हजार, व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषध उपचारासाठी येणारा खर्च किंवा खासगी रुग्णालयात उपचार करणे अत्यावश्‍यक असल्यास २० हजार रुपये खर्च सरकारच्या वतीने दिला जाणार आहे. तसेच, पशुधनाच्या बाबतीत या वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ४० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती पशुधनाच्या मालकाला दिली जाणार आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभाव किमतीच्या ७५ किंवा १० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती संबंधित मालकाला दिली जाणार आहे. 

वन्य प्राण्याच्या हल्ल्यात गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायमचे अपंगत्व आल्यास बाजारभाव किमतीच्या ५० टक्के किंवा १२ हजार यापैकी जी रक्कम कमी आहे ती दिली जाणार आहे. तर, पशुधन जखमी झाल्यास त्यावर औषध उपचार शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात करण्याच्या सूचनाही या निर्णयाच्या आधारे देण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करणे शक्‍य नसल्यास बाजारभावाच्या २५ टक्के किंवा ४ हजार यापैकी जी कमी रक्कम असेल ती पशुधन मालकाला दिली जाणार आहे.

सात लाख रुपयांची मुदत ठेव
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना दिल्या जाणाऱ्या १० लाखांच्या अर्थसाह्याच्या रकमेपैकी ३ लाख रुपयांचा धनादेश तत्काळ वारसांना दिला जाणार आहे. उर्वरित ७ लाखांची रक्कम ही वारसांच्या नावे राष्ट्रीयीकृत बॅंकेत मुदत ठेवी म्हणून ठेवली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com