मद्यविक्री दुकानांबाबत पुनर्मोजणी

मद्यविक्री दुकानांबाबत पुनर्मोजणी

पाचशे मीटरच्या बाहेर असल्याचे काही विक्रेत्यांचे म्हणणे; अधिकाऱ्यांकडून पाहणी

पुणे - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगतच्या पाचशे मीटरच्या आत मद्यविक्रीला बंदी करण्यात आली; परंतु अनेक व्यावसायिकांनी त्यांची दुकाने पाचशे मीटरच्या बाहेर असल्याचे; तसेच संबंधित रस्ते महामार्ग नसल्याचे आक्षेप नोंदवले आहेत. त्याची शहानिशा करण्यासाठी; तसेच पुनर्मोजणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करायला मंगळवारपासून 
सुरवात केली आहे. 

देशभरामध्ये राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील महामार्गांवरील मद्यविक्री तातडीने बंद करण्यात आली आहे. २ हजार ५०० पैकी जवळपास सोळाशे दुकाने बंद करण्यात आली असल्याने राज्य सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तातडीने मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली. अनेक दुकानदारांनी या कारवाईवर आक्षेप घेत आपली दुकाने पाचशे मीटरच्या बाहेर असल्याचे सांगायला सुरवात केली होती. काही ठिकाणी त्यामधून वादाचेही प्रसंग उद्भवू लागल्याने उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी विक्रेत्यांना त्यांचे आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले होते. 

कारवाईच्या गडबडीत मोजणीमध्ये चूक झाली असेल, तर विक्रेत्यावर अन्याय व्हायला नको. चुकून ५०० मीटरच्या आतील नोंद झाली असेल तर कागदपत्रांसह निवेदन सादर करण्यासही सांगण्यात आले होते. अनेक विक्रेत्यांनी त्यांच्याकडील कागदपत्रांसह आपले आक्षेप नोंदवले. या आक्षेपांनुसार उत्पादन शुल्क विभाग; तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या आणि मोठ्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी सुरू केली आहे. मोजणी योग्य आहे का, हे पुनर्मोजणी करून तपासण्यात येत आहे; तसेच जे व्यावसायिक त्यांचे दुकान ५०० मीटरच्या बाहेर हलवण्यास तयार आहेत, त्यांना परवाने देण्याचेही काम सुरू केले आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अहवालही मागवण्यात आला आहे. जी दुकाने खरोखरीच ५०० मीटरच्या बाहेर असल्यास ती पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पुणे शहरातील विविध ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली. विशेषतः जुना बाजार परिसर आणि हॉटेल ल मेरिडियनच्या परिसराची पाहणी करण्यात आली. ल मेरिडियन हॉटेल राज्य महामार्गावरच असल्याचे पाहणीमधून स्पष्ट झाले असून, जुना बाजार ते ससून हा रस्ता जुना विशेष राज्य महामार्गच असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना दिली.

वालचंदनगरमध्ये दिलासा नाही

वालचंदनगरमधून जात असलेल्या राज्य महामार्गातील काही भाग औद्योगिक खासगी मालकीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, हा रस्ता कोणाच्याही मालकीचा असला, तरी तो राज्य महामार्ग म्हणूनच शासकीय स्तरावर घोषित झालेला असल्यामुळे तेथेही दुकानदारांना दिलासा मिळणार नाही. मुळशी तालुक्‍यातील एक रस्ता राज्य महामार्ग आहे. मात्र, हा रस्ता अर्धवटच झालेला आहे. त्या रस्त्याबाबतची कागदपत्रे आणि माहितीच उपलब्ध होत नाही. अर्धवट असलेला हा रस्ता पुढे तयारच झालेला नाही. जिथपर्यंत रस्ता झालेला आहे, तेथपर्यंत बंदी करून त्यापुढील भागात दुकाने सुरू ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली असून, त्यावरही विचारविनिमय सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com