पुणे शहराच्या कचराप्रश्नी महिन्याभरात सर्वंकष आराखडा - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

पुणे शहराच्या कचरा प्रश्नाबाबत एका महिन्यात सर्वकष आराखडा तयार करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) येथे दिली. फडणवीसांच्या ग्वाहीनंतर ऊरळी आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी कचऱ्याबाबतचे आपले आंदोलन स्थगित करण्याचे जाहीर केले.

पुणे - पुणे शहराच्या कचरा प्रश्नाबाबत एका महिन्यात सर्वकष आराखडा तयार करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) येथे दिली. फडणवीसांच्या ग्वाहीनंतर ऊरळी आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी कचऱ्याबाबतचे आपले आंदोलन स्थगित करण्याचे जाहीर केले.

पुणे शहरातील कचरा आणि उरूळी देवाची व फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी कचरा डेपो विरोधात सुरू केलेल्या आंदोलनाबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीस राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, अँड. वंदना चव्हाण, आमदार विजयकाळे, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुण्याच्या कचरा प्रश्नाबाबत येत्या एक महिन्यात सर्वकष आराखडा तयार करू. त्यासाठी पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावू. त्यामध्ये हा आराखडा सादर करू. त्यानंतर त्याबाबत पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांची मते विचारात घेऊ आणि पुढील कार्यवाहीची दिशा निश्‍चित केली जाईल. ऊरळी आणि फुरसुंगी गावांतील प्रकल्पग्रस्त महापालिकेच्या तात्पुरत्या सेवेत आहेत. त्यांना कायम करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुणे महापालिकेने याबाबत राज्य शासनास प्रस्ताव पाठवून द्यावा. प्रस्ताव पाठविल्यानंतर एक महिन्याच्या आत खास बाब म्हणून मंजुरी देण्यात येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्वाहीनंतर संघर्ष समितीचे प्रमुख अमोल हरपळे आणि तात्या भाडळे यांनी आंदोलन स्थगित करीत असल्याचे बैठकीत जाहीर केले. ऊरळी आणि फुरसुंगी येथील प्रकल्पग्रस्तांना जमीनी परत देण्याबाबतच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रकल्पग्रस्तांना जमीन परत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. ज्या ग्रामस्थांच्या जमिनी संपादीत झाल्या होत्या त्यांना काही प्रमाणात जमीन निश्‍चित परत देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे, अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, आमदार माधुरी मिसाळ, संघर्ष समितीचे नेते अमोल हरपळे, तात्या भाडळे यांनी आपल्या भूमिका बैठकीत मांडल्या. बैठकीत पुणे आयुक्त कुणाल कुमार यांनी कचराप्रश्नाबाबत पुणे महापालिका करीत असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. बैठकीस विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते.