"ती'च्या कर्तृत्वाला सुरमयी सलाम! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

कोथरूड - कोथरूड परिसरातील नवनिर्वाचित नगरसेविका आणि पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून, आनंदी ज्येष्ठ नागरिक संघाने त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच "ती'ची गाणी या मैफलीतून स्त्रीशक्तीला सलाम केला. 

कोथरूड - कोथरूड परिसरातील नवनिर्वाचित नगरसेविका आणि पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून, आनंदी ज्येष्ठ नागरिक संघाने त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच "ती'ची गाणी या मैफलीतून स्त्रीशक्तीला सलाम केला. 

आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते नगरसेविका आणि महिलांचा सत्कार करण्यात आला. यात माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, वासंती जाधव, अल्पना वरपे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, हर्षाली माथवड, वृषाली चौधरी, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, छाया मारणे या नगरसेविका, तर विद्या भडाळे, शीतल फाले, मीनाक्षी थत्ते, मंजिरी मराठे, चैत्राली अभ्यंकर या कर्तृत्ववान महिलांचा समावेश होता. तत्पूर्वी गोल्डन मेमरीज प्रस्तुत "ती'ची गाणी ही महिलांवरील गाण्यांची मैफल झाली. 

कुलकर्णी म्हणाल्या, ""महिलांनी कोणत्याही अडचणींवर मात करण्याची कला अंगीकृत करून सार्वजनिक कामात सहभाग घेतला पाहिजे. सत्कारार्थी कर्तृत्ववान महिलांच्या यशाचा मार्ग लक्षात घेऊन आपल्या जीवनचक्रात बदल करण्याचा प्रयत्न इतरांनी करावा. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अडचणी अवश्‍य सांगाव्यात. त्या सोडविण्यात येतील.'' 

विद्या टेमकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम बेडकीहाळ यांनी सूत्रसंचालन केले. अच्युत कुलकर्णी, उदय रेणूकर, शैलजा कुलकर्णी, देवयानी भोकरे आदी उपस्थित होते. 

"ती'च्या परंपरेला सलाम... 
बहिणाबाईंपासून संत जनाबाई या स्त्री परंपरेला स्वरांद्वारे गायक चैत्राली अभ्यंकर यांनी मानवंदना दिली. त्यानंतर कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील मैत्रीचा पदर उलगडला. "संथ वाहते कृष्णामाई' हे गाणे सादर करून रवींद्र शाळू यांनी नदीचे महत्त्व मांडले. तसेच "ती'च्या "त्याच्या'कडून असलेल्या अपेक्षा निवेदिका स्नेहल दामले यांनी आपल्या खुमासदार शैलीद्वारे उलगडल्या. अचूक शब्दफेक आणि सोप्या मांडणीने त्यांनी तुडुंब भरलेल्या सभागृहातील "ती'च्या भावनेला हात घातला. तत्पूर्वी सुवर्णा कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. हेमंत वाळुंजकर, प्रसन्न बाम, राजेंद्र हसबनीस, अमृता ठाकूरदेसाई आणि आदित्य आपटे यांनी त्यांना साथसंगत केली.