कामांची प्रगती थेट कळणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालयात ‘इलेक्‍ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड’ची सुविधा 
पुणे - शहरातील विकास कामांची माहिती देणारे आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेणारे ‘इलेक्‍ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड’ महापालिकेच्या मुख्य इमारतीत आणि क्षेत्रीय कार्यालयांत लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांनाही शहरातील विकास कामांच्या प्रगतीचा आढावा दर आठवड्याला मिळू शकेल. 

मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालयात ‘इलेक्‍ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड’ची सुविधा 
पुणे - शहरातील विकास कामांची माहिती देणारे आणि त्यांच्या प्रगतीचा आढावा घेणारे ‘इलेक्‍ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड’ महापालिकेच्या मुख्य इमारतीत आणि क्षेत्रीय कार्यालयांत लावण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांनाही शहरातील विकास कामांच्या प्रगतीचा आढावा दर आठवड्याला मिळू शकेल. 

महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ही योजना अर्थसंकल्पात मांडली आहे. शहरात अनेक प्रकारची विकास कामे विविध खात्यांमार्फत सुरू असतात. त्याची एकत्रित माहिती नागरिकांना मिळत नाही. तसेच एखादा प्रकल्प किंवा योजनेचा कालावधी किती आहे, त्यातील अटी आणि शर्ती काय आहेत, किती रकमेचे काम आहे, ठेकेदार कोण आहे आदींची माहिती या इलेक्‍ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डद्वारे नागरिकांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात दर १५ दिवसांनी आणि त्यानंतर दर आठवड्याला विकास कामांच्या प्रगतीचा आढावा नागरिकांना मिळणार आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. या योजनेसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  

निर्वाण रथ मोफत देण्याची योजना
महापालिकेच्या सर्व स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठीचे साहित्य गरजूंना मोफत पुरविले जाणार आहे. याच धर्तीवर मृत व्यक्तीचे पार्थिव स्मशानभूमीपर्यंत अंत्यविधीसाठी नेण्यासाठी निर्वाण रथ मोफत देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यासाठी नव्या चार गाड्या घेण्यात येणार असून त्यासाठी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

समुद्री जैवविविधता केंद्र 
जगभरातील सात समुद्र, तेथील विविध जलचर, तापमान आदी अनेक बाबींची माहिती करून देण्यासाठी शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य समुद्री जैवविविधता केंद्र उभारण्यात येणार आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना समुद्री जैववैविध्याबद्दल माहिती मिळेल आणि पुणे शहरात एक नवीन पर्यटन केंद्र विकसित होईल, अशी अपेक्षा असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. या केंद्रासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  

देणग्यांची रक्कम घटविली 
महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या इतर संस्थांच्या देणग्यांच्या रकमेत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी घट केली आहे.

महापालिकेच्या वतीने इतर संस्थांना या पूर्वी २६ लाख ४२ हजार रुपयांच्या देणग्या देण्यात येत होत्या. मात्र, पुढील वर्षासाठी स्थायी समितीने ११ लाख ६० हजार रुपयांच्याच देणग्यांना मंजुरी दिली आहे.

Web Title: Work progress will be learned directly