नियंत्रित मधुमेह, रक्तदाब राखेल मूत्रपिंडाचे आरोग्य 

योगिराज प्रभुणे - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 9 मार्च 2017

पुणे - अवयव दानाबाबत होणाऱ्या जनजागृतीमुळे राज्यातील मूत्रपिंडाची प्रतीक्षा यादी झपाट्याने वाढत आहे. मुंबई आणि पुण्यातील यादी सर्वाधिक असली तरीही त्यातील काही रुग्णांनाच मूत्रपिंड मिळत असल्याची माहिती पुढे येत आहे. मूत्रपिंडाची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. 

मार्चमधील दुसरा गुरुवार जागतिक मूत्रपिंड दिन म्हणून पाळला जातो. मूत्रपिंड विकाराबाबत जनजागृतीचा हा दिवस आहे. त्यानिमित्ताने तज्ज्ञ डॉक्‍टरांनी हा सल्ला दिला. 

येथील लोकमान्य रुग्णालयातील मूत्रपिंडतज्ज्ञ डॉ. सिद्धेश धायगुडे म्हणाले, ""मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेच्या चाचण्या नियमितपणे करणे आवश्‍यक आहे. धातूचे प्रमाण असलेली औषधे अशा रुग्णांनी टाळली पाहिजेत. मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा अवयव मिळण्यासाठी प्रतीक्षा यादीही वाढत आहे.'' मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज लागण्यापूर्वीच रुग्णाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जहॉंगीर रुग्णालयातील मूत्रपिंडतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास अंबिके म्हणाले, ""मूत्रपिंडाचे विकार झालेल्यांपैकी 50 टक्के रुग्ण हे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे असतात. चुकीच्या जीवनशैलीमुळेच या विकाराच्या रुग्णांचे मूत्रपिंड निकामी होते. जीवनशैलीत आमूलाग्र बदल करणे आणि रक्तदाब व मधुमेह नियंत्रण याच दोन मार्गांनी हे रुग्ण मूत्रपिंड विकार दूर ठेवू शकतात.'' 

मधुमेहतज्ज्ञ डॉ. शैलजा काळे म्हणाल्या, ""मधुमेही रुग्णांमध्ये मूत्रपिंडांच्या आजारांचे प्रमाण आपल्या देशात सर्रास आढळते. त्या तुलनेत पाश्‍चात्त्य देशांमधील मधुमेही रुग्णांचे मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण कमी आहे. अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होण्यामागचे प्रमुख कारण आहे. मधुमेहाबरोबरच उच्च रक्तदाब असल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता वेगाने कमी होते. रुग्णाच्या मूत्र तपासणीतून प्रोटिनचे प्रमाण दिसू लागणे ही धोक्‍याची घंटा असते. योग्य औषधोपचार आणि नियंत्रित मधुमेह व उच्च रक्तदाब यातून मूत्रपिंडाची नजीकच्या भविष्यातील गुंतागुंत टाळता येते.'' 

रुग्णांमधील मूत्रपिंडाची काळजी घेण्यासाठी "एबीसी'ची काळजी घ्यावी, असा निष्कर्ष जागतिक स्तरावर "स्टोनो 2' आणि "ऍडव्हान्स' या अभ्यास प्रकल्पातून निघालेला आहे. या प्रकल्पात भारतीय मधुमेहतज्ज्ञांचाही समावेश आहे. मधुमेहाच्या निदानासाठी वापरली जाणारी "एचबीए- 1सी' ही वैद्यकीय चाचणी (ए), रक्तदाब (बी) आणि कोलेस्टेरॉल (सी) हे "एबीसी' नियंत्रित केल्यास मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राखता येते, असेही डॉ. काळे यांनी सांगितले. 

असे असावे "एबीसी' 
- "एचबी ए 1 सी' ः 6.5 पेक्षा कमी 
- उच्च रक्तदाब ः 130 - 80 
- कोलेस्टेरॉल ः 150 

झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटीनिहाय मूत्रपिंड प्रतीक्षा यादी 
मुंबई ..... 3109 
पुणे ...... 478 
नागपूर ... 225 
औरंगाबाद .. 149

Web Title: World kidney day