अकरावीचे ऑनलाइन अर्ज 25 पासून 

अकरावीचे ऑनलाइन अर्ज 25 पासून 

पुणे - अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी अर्जाचा पहिला भाग 25 मेपासून भरता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यंदापासून अर्जाचे दोन्ही भाग भरण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शाळेवर टाकण्यात आली आहे. आरक्षणासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे अधिकारही शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्याने यंदाची प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सुलभ होणार आहे. 

गेल्या वर्षी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांना अर्ज भरताना त्यांची वैयक्तिक माहिती आणि गुणांचा तपशील हा विभागीय बोर्डाकडून घेतला जात होता. त्यामुळे हा मजकूर विद्यार्थ्यांना भरावा लागत नव्हता. यंदा राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी पुणे जिल्ह्याबाहेरील असला, तरी त्याची माहिती अर्जात आपोआप भरली जाणार आहे. 

माध्यमिक शाळा अर्ज भरणार 
विद्यार्थी ज्या माध्यमिक शाळेत शिकत आहेत, त्या शाळेनेच अकरावी प्रवेशाचे अर्ज भरायचे आहेत. आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांच्या आवश्‍यक कागदपत्रांची तपासणी करून अर्ज मान्य (अप्रूव्ह) करून घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केंद्रांवर जावे लागत होते. यंदा ते अर्ज मान्य करण्याची जबाबदारी शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या माध्यमिक शाळेमध्येच त्यांचे अर्ज मान्य होणार आहेत. 

पुस्तिकाही 25 मे पासून 
विद्यार्थ्याला अर्ज भरण्यासाठी लॉग इन आणि आयडी विकत घ्यावा लागणार आहे. त्याचे कीट विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतूनच मिळेल. ते घेतल्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या मदतीने ऑनलाइन अर्ज भरला जाणार आहे. त्याची सुरवात 25 मेपासून होईल. लॉग इन व आयडीचे कीट आणि माहिती पुस्तिका याच दिवसापासून मिळण्यास सुरवात होईल. दहावीचा निकाल लागण्यापूर्वी अर्जाचा केवळ भाग एक भरता येईल. 

बाह्य विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रे 
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केंद्रावर जाण्याची गरज नाही. परंतु, ही दोन शहरे वगळता अन्य गावे, अन्य जिल्हे आणि परराज्यातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या प्रक्रियेसाठी नऊ विभागीय मार्गदर्शन केंद्रांवर जावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी त्यांचा अर्ज मान्य (अप्रूव्ह) करून दिला जाईल. 

यंदा अर्जासाठी उशीर 
- गेल्यावर्षी दोन मेपासून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका वितरित करून अर्जाचा भाग एक भरण्यास सुरवात झाली होती. त्यास यंदा विलंब होत आहे. याबाबत सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ""यंदा विलंबाने प्रक्रिया सुरू होत असली, तरी दहावीच्या निकालानंतरही अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना दहा दिवस दिले जाणार आहेत. हा कालावधी पुरेसा आहे. माहिती पुस्तिका 25 मेपासून वितरित केल्या जाणार असल्या, तरी काही दिवस आधी प्रवेशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जातील.'' 

पुस्तिकेची किंमत वाढली 
गेल्यावर्षी शंभर रुपयांना मिळणारी माहिती पुस्तिका आता दीडशे रुपयांना विकत घ्यावी लागणार आहे. तसेच, यंदा केवळ विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे शुल्क माहिती पुस्तिकेत असेल. अनुदानित शाळांचे शुल्क निश्‍चित करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षण आयुक्तांची समिती स्थापन केली आहे. त्यांच्या अहवालानंतर या महाविद्यालयांचे शुल्क प्रवेशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे राऊत यांनी सांगितले. 

अनुदानित की विनाअनुदानित? 
ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनुदानित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे की विनाअनुदानित, हे ठरविता येणार आहे. अर्ज भरताना अनुदानित आणि विनाअनुदानित असे दोन पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येतील. अनेकदा अर्ज भरल्यानंतर विनाअनुदानित महाविद्यालयात प्रवेश नको होता, अशी तक्रार विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात होती. नव्या पर्यायामुळे अशी तक्रार आता करता येणार नाही. 

अकरावीच्या जागा वाढल्या 
तपशील गेल्यावर्षी यंदा 
कनिष्ठ महाविद्यालये 243 267 

एकूण जागा 79,665 94,580 

वाढलेल्या जागा 6885 7030 
(एमसीव्हीसी) इतर महाविद्यालये 

प्रवेशाचे संकेतस्थळ : http://pune.11thadmission.net 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com