कैद्यांची सुरक्षितता पुन्हा ऐरणीवर

Yerwada-Jail
Yerwada-Jail

येरवडा - येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अनिल कोल्हे या कैद्याने बुधवारी झाडावरून बराकीवर चढून उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांना पकडून आत्महत्या केली. त्यामुळे येथील कैद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे पोलिसांनी वेळोवेळी सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे कारागृह प्रशासनाने लक्ष द्यावे, असे लेखी अहवाल दिले आहेत. मात्र कारागृह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. 

शहर पोलिसांकडून दरवर्षी कारागृहाचे ‘सुरक्षा ऑडिट’ होत असते. यात आवारातील विशेषत: बराकींच्या शेजारील झाडे, विजेची उपकरणे, विजेच्या वाहिन्यांची स्थिती, सीमाभिंतीची उंची, अग्निशमन उपकरणांची उपलब्धता, मोबाईल जॅमर ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपर्यंतचे मुद्दे असतात. दरवर्षी हेच मुद्दे घेऊन पाहणी होते. त्यावर उपाययोजना करण्यास सांगितले जाते. 

मात्र दरवर्षी परिस्थिती ‘जैसे थे’च असते. विजेचे खांब का काढले नाहीत या प्रश्‍नावर पाठपुरावा सुरू असल्याचे उत्तर कारागृहाचे तयार असते. मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेसा निधी यावर गृह विभाग आणि राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत असल्याचे कारागृह प्रशासनाचे म्हणणे असते. मात्र वारंवार होणाऱ्या कैद्यांच्या आत्महत्यांमुळे ‘सुरक्षा ऑडिट’कडे दुलर्क्ष केल्याचे दिसून येते.

कारागृहात मोठ्या प्रमाणात दगड, गोटे आहेत. त्यामुळे आतापर्यंत कैद्यांमध्ये दगडाने मारहाणीच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही कैद्यांनी पायजाम्याच्या नाडीने आत्महत्या केली. शरद मोहळने दहशतवादाच्या आरोपाखालील कैदी कतिल सिद्दिकीचा नाडीने गळा आवळून खून केल्याची घटना याच कारागृहात घडली आहे. बराकीशेजारी असलेल्या मोठ्या झाडांच्या फांद्या तोडण्याची सूचना पोलिसांनी ‘सुरक्षा ऑडिट’मध्ये कारागृह प्रशासनाला केली होती. मात्र कारागृह प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे अनिल कोल्हेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 

उत्तुंग भिंती ओलांडून केले होते पलायन!
येरवडा मध्यवर्ती कारागृह देशातील सर्वांत सुरक्षित कारागृह समजले जाते. मात्र सहा वर्षांपूर्वी रामा पवार या कैद्याने लोखंडी सळया एकत्र करून कारागृहाच्या दोन उत्तुंग भिंती ओलांडून पलायन केले होते. येरवडा कारागृहाच्या इतिहासातील ही एकमेव घटना ठरली होती.  

‘सुरक्षा ऑडिट’मध्ये सांगितलेल्या उपाययोजनांची पूर्तता करीत असतो. अनिल कोल्हे या कैद्याने आत्महत्या केल्याच्या ठिकाणी अद्याप भेट दिली नाही. त्यामुळे नेमके कारण सांगता येत नाही.
- स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्‍चिम महाराष्ट्र विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com