रशियामध्ये भारताचा झेंडा उंचावणारा यंग जर्नालिस्ट रुद्रेश

rudresh.jpg
rudresh.jpg

पौड रस्ता : फुटबॉल फॉर फ्रेंडशिप या संस्थेच्या वतीने यंग जर्नालिस्ट म्हणून अवघ्या बारा वर्षीय रुद्रेश चंद्रकांत गौडनोर याची निवड झाली. रुद्रेश हा पुणे महापालिकेच्या पंडित दीनदयाळ विद्यालयात आठवीला शिकतो. निवड झालेल्या जगभरातील तेरा विद्यार्थ्यांपैकी भारताचे प्रतिनिधित्व करणारा रुद्रेश हा एकमेव. तो नुकताच मास्कोला जाऊन आला. तेथे रशियाविरुद्ध सौदी अरेबिया यांच्यातील रोमांचक फुटबॉल सामना पाहण्याचे भाग्य त्याला मिळाले.

रुद्रेशचे वडील चंद्रकांत गौडनोर हे सुतार दवाखान्याजवळ भाजीविक्री करतात, तर आई घरकाम करते. गरिबीतून वर येण्यासाठी धडपडत असलेल्या रुद्रेशच्या पालकांना स्वप्नातही कधी परदेशवारीचा विचार आला नव्हता; पण त्यांच्या मुलाचे भाग्य उजळले आणि तो चक्क फिफा करंडक पाहून आला. रुद्रेश मास्कोला जात असल्याचे वृत्त यापूर्वीच "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. मास्कोला जाऊन आलेल्या रुद्रेशने त्याला आलेल्या अनुभवांबद्दल "सकाळ'शी चर्चा केली. 

कोथरूड बुल्स या संघामध्ये मी फुटबॉल खेळतो. फुटबॉल फॉर फ्रेंडशिप संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचा भाग असलेल्या उपक्रमात पत्रकार (यंग जर्नालिस्ट) म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. जेव्हा स्टेडियममध्ये प्रवेश केला तेव्हा 80 हजार प्रेक्षक पाहून मी आवकच झालो. मॅच सुरू झाली तेव्हा मी रशियाला सपोर्ट करत होतो. ही मॅच रशियाने पाच-शून्य अशा फरकाने जिंकली; पण सौदी अरेबियाने शेवटच्या क्षणापर्यंत दिलेली टक्कर व बाजी मारण्यासाठी केलेले प्रयत्न मला निश्‍चितच प्रशंसनीय वाटले. 

फुटबॉल स्पर्धेशिवाय रशियात फिरणेही माझ्यासाठी अविस्मरणीय होते. मॉस्कोत डॉल्फिन शो आणि सी लायन शोने माझ्या डोळ्यांचे पारणे फेडले. विमान प्रवास, हॉटेलमधील राहणे, रशियातील थंडी, तेथील लोकांची बोलीभाषा, राहणीमान हे सर्वच माझ्यासाठी नवे आणि उत्सुकता वाढवणारे होते. वर्ल्डकपमध्ये भारताचा खेळाडू म्हणून उतरायला मला नक्कीच आवडेल, असे तो म्हणाला. 

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खूप गुणवत्ता आहे. आमच्या शाळा कोणत्याही खासगी शाळांपेक्षा कमी नाहीत. पालकांनी याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. 
- एलिझाबेथ काकडे, मुख्याध्यापिका, पंडित दीनदयाळ शाळा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com