‘जिम’ला जाण्याचा तरुणाईचा फंडा

‘जिम’ला जाण्याचा तरुणाईचा फंडा

पुणे - दोन महिन्यांच्या सुटीत काय करावे, हा प्रश्‍न किरणला पडला अन्‌ त्याने ‘जिम’ला जायला सुरवात केली. उन्हाळ्यामुळे थोडासा त्रास झाला. पण, वर्कआउट आणि डाएटच्या नियोजनामुळे तो दररोज दोन तास ‘जिम’ला जात आहे. हा आहे उन्हाळ्याच्या सुटीत महाविद्यालयीन तरुणाईचा ‘जिमिंग’ ट्रेंड. उन्हाळ्याला पुणेकर त्रासले असताना ‘जिम’ला जाण्याचा तरुणाईचा फंडा अनेकांना कळलेला नाही. पण, उन्हाळ्यात वर्कआउट आणि डाएटचे योग्य नियोजन ट्रेनर करून देत असल्यामुळे तंदुरुस्तीसाठी तरुणाईची पाऊल ‘जिम’कडे वळत आहेत. परीक्षेच्या व्यापातून दमलेल्या तरुण-तरुणींना ‘जिम’मुळे सकारात्मक ऊर्जा मिळत आहे.

जिममध्ये जाऊन उन्हाळ्यात वर्कआउट करणे आरोग्यासाठी घातक असल्याचा लोकांचा समज आहे. घाम फुटणे, कमी भूक लागणे आणि त्वचेला उद्‌भवणाऱ्या त्रासामुळे अनेकांना ‘जिम’ला जावे की नको, असा प्रश्‍न पडतो. पण, त्याउलट आता महाविद्यालयीन तरुणाईने फिटनेसची गरज ओळखून आपला मोर्चा ‘जिम’कडे वळवला आहे. दुपारी जिमला जाण्यापेक्षा उन्हाळ्यात सकाळी व सायंकाळी दोन तास वर्कआउट करण्यासह योग्य डाएट घेतल्यामुळे तरुणांना त्याचा त्रास होत नसल्याचे जिम ट्रेनर सांगतात. तीन महिन्यांचे खास लाइट वेट वर्कआउट पॅकेज त्यांना दिले जात असून, त्यासाठी दोन हजार रुपयांच्या पुढे शुल्क आकारले जात आहे. नियमितपणे येणाऱ्या तरुण-तरुणींसह दहावी व अकरावीतील विद्यार्थीही ‘जिम’ला जात आहेत. 

याबाबत जिम ट्रेनर नाझीर खान म्हणाले, ‘‘उन्हाळ्यात घाम फुटतो, कमी भूक लागते, वर्कआउटला अधिक मेहनत लागते म्हणून जिम का करावी, हा लोकांचा गैरसमज असतो. त्यामुळे कमी लोक जिमला येतात. नियमित जिमला येणारे वर्कआउटसाठी येतात. पण, आता हा गैरसमज टाळून उन्हाळ्यातही जिममध्ये येणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या चांगली आहे.’’

ट्रेनर रोहिणी पोटे म्हणाल्या, ‘‘जिमला येणाऱ्या तरुणींचे प्रमाण वाढत आहे. वर्कआउट करण्याबरोबर झुंबा डान्स, ॲरोबिक्‍स आणि योगाही त्या करतात. उन्हाळ्यात जिम नको हे साफ चुकीचे आहे. त्याउलट जिममध्ये शरीरासाठी योग्य डाएटचे नियोजन दिले जाते आणि वर्कआउटही त्यानुसारच घेतला जातो. त्यामुळे त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत नाही.’’ 

शाकाहारी पदार्थांचा समावेश
उन्हाळ्यात तरुण- तरुणींना लाइट वेट वर्कआउट करण्याची सक्ती केली जात आहे. पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश केला आहे. मांसाहारी पदार्थांना यात स्थान नसून शाकाहारी पदार्थांचा समावेश केला आहे. जिम करणाऱ्यांना अधिकाधिक पाणी पिण्यासाठी सांगितले जाते. विविध प्रकारचे सरबत, फळे यांचाही त्यात समावेश आहे.

उन्हाळ्यात जिममध्ये वर्कआउट केल्यामुळे वजन कमी होते हे खरे आहे. पण, त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत नाही. त्याउलट योग्य वर्कआउट आणि डाएटमुळे त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. उन्हाळ्यात वर्कआउट करताना सहसा हेवी वेट वर्कआउट केला जात नाही. बॉडीबिल्डर आणि फिटनेस ट्रेनरही उन्हाळ्यात हेवी वेट वर्कआउट करत नाही. 
- भूषण कोकरे, जिम ट्रेनर

दोन महिन्यांपासून मी जिमला जात आहे. वर्कआउटमुळे थोडा थकवा जाणवतो. पण, त्याशिवाय दिवस जात नाही. मी सायंकाळी सात वाजता जिमला जातो. माझे अनेक मित्रही जिमला जात आहेत. योग्य वर्कआउट व डाएटचे वेळापत्रक ट्रेनरने दिल्यामुळे कोणताही त्रास होत नाही. उलट, वर्कआउट केल्यामुळे चांगले वाटते.
- सोमेश्‍वर जाधव, युवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com