मनसेच्या प्रचारात युवकांचा मोठा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

पुणे - विविध क्षेत्रांतील काम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून केलेले सातत्यपूर्ण उपक्रम अशी पार्श्‍वभूमी असलेल्या अक्षता जयराज लांडगे यांनी पर्वती- नवी पेठ प्रभागात युवा, महिला मतदारांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करीत घरोघरी संपर्कावर प्रचारात भर दिला आहे. युवकांचा सहभाग हे त्यांच्या प्रचाराचे वैशिष्ट्य ठरले असून, मनसेच्या माध्यमातून आतापर्यंत केलेले काम हाच प्रचाराचा मुद्दा राहणार असल्याचे लांडगे यांनी सांगितले. 

महिला, युवक मतदारांच्या मोठ्या उपस्थितीत अक्षता लांडगे यांच्या प्रचाराला प्रारंभ झाला. ‘इंजिन’ हे निवडणूक चिन्ह मिरवत, मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांचा जयघोष करीत प्रचारफेरीतून मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. अक्षता यांचे दीर सचिन आणि पती जयराज लांडगे यांनी मागील महापालिका निवडणूक लढवली होती. त्यांनी विधानसभा निवडणूकदेखील मनसेकडून लढवली होती. अक्षता लांडगे यांनी सर्व सामाजिक कार्यांत जयराज यांना साथ दिली. पर्वती परिसरातील संमिश्र लोकसंख्या असलेल्या प्रभागात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय उपक्रमांद्वारे त्यांनी घरोघरी संपर्क प्रस्थापित केला आहे.

‘आम्ही दोन हजार तरुणांसाठी नोकरी महोत्सव, महिलांसाठी जेनेरिक मेडिसीनचे दुकान, १५०० महिलांसाठी दुचाकी प्रशिक्षण असे यशस्वी उपक्रम आयोजित केले. २७ हजार अनाथ मुलांना एक टक्का आरक्षण धोरणांतर्गत लाभ मिळवून दिला,’ असे लांडगे यांनी सांगितले. महापालिकेच्या माध्यमातून पर्वती- नवी पेठ प्रभागातील दुर्लक्षित प्रश्न सोडविणे, हा प्रभाग प्रगतिपथावर नेऊन स्मार्ट बनविणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मूलभूत सुविधा मिळवून देणे, सर्वांगीण विकास करणे, आरोग्य- वाहतूक- सार्वजनिक सुरक्षा, सुरळीत आणि स्वच्छ पाणीपुरवठा, शिक्षण, वनीकरण असे मतदारांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित सर्व प्रश्‍न आम्ही सोडवणार आहोत, असेही लांडगे यांनी प्रचारादरम्यान सांगितले.