ऊर्जा आणि उत्साह घेऊन तरुणाई प्रचार मोहिमेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

पुणे - सोशल मीडियावर उमेदवारांची सेल्फी पोस्ट करणारी, प्रचार मोहिमेत घोषणा देणारी, पथनाट्यातून उमेदवारांचा प्रचार करणारी अन्‌ उमेदवारांच्या प्रचारपत्रकांचे वाटप करणारी तरुणाई सध्या प्रचार मोहिमेत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सळसळता उत्साह आणि नवी ऊर्जा घेऊन तरुणाई उमेदवारांच्या प्रचार मोहिमेत उतरली आहे. सोशल मीडिया असो वा प्रचार रॅलीचे प्रतिनिधित्व करणारे तरुण कार्यकर्ते ठिकठिकाणी दिसून येत आहेत. 

पुणे - सोशल मीडियावर उमेदवारांची सेल्फी पोस्ट करणारी, प्रचार मोहिमेत घोषणा देणारी, पथनाट्यातून उमेदवारांचा प्रचार करणारी अन्‌ उमेदवारांच्या प्रचारपत्रकांचे वाटप करणारी तरुणाई सध्या प्रचार मोहिमेत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सळसळता उत्साह आणि नवी ऊर्जा घेऊन तरुणाई उमेदवारांच्या प्रचार मोहिमेत उतरली आहे. सोशल मीडिया असो वा प्रचार रॅलीचे प्रतिनिधित्व करणारे तरुण कार्यकर्ते ठिकठिकाणी दिसून येत आहेत. 

महापालिका निवडणुकीत उमेदवारांचा अर्ज भरण्यापासून ते प्रचार मोहिमेच्या सुरवातीपासून प्रत्येक गोष्टीत तरुणांचा मोठा सहभाग आहे. प्रचार रॅली, भेटीगाठी, प्रचार पत्रकांचे वाटप, घरोघरी जाऊन केलेला प्रचार, उमेदवारांची छोटी-मोठी कामे तरुण कार्यकर्ते हाताळत आहेत. महाविद्यालयीन तरुणाईला "पार्टटाइम' काम मिळाल्यामुळे सोशल मीडिया हाताळण्यापासून ते पथनाट्य सादर करण्यापर्यंतची कामे ते करत आहेत. सोशल मीडिया हाताळणाऱ्या एजन्सींनी तरुणांना कामे दिली आहेत. व्हिडिओ क्‍लिप्स, डॉक्‍युमेंटरी, पक्षांचे टायटल सॉंग बनविण्यापासून ते फेसबुक, ट्विवर, व्हॉट्‌स ऍप, इंस्टाग्राम ते हाताळत आहेत. यात महाविद्यालयीन तरुणाईसह नोकरदार तरुणाईही मागे नाही. प्रचार मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल तरुण-तरुणींना आर्थिक मोबदलाही मिळत आहे. 

यंदाच्या निवडणुकीत तरुणांचा सहभाग प्रत्येक कामात दिसत आहे. सोशल मीडियावर अपडेट अपलोड करण्यापासून ते त्यांच्या प्रचारातील छायाचित्रे टिपण्यापर्यंत कामे ते करत आहेत. आपल्या पक्षाच्या आणि लाडक्‍या उमेदवाराच्या प्रचारात तरुण कार्यकर्ते उत्साहात सहभागी होत आहेत. 

याबाबत आकाश शिंदे म्हणाले, ""मी उमेदवाराच्या प्रचारात सोशल मीडियाची कामे हाताळत आहे. त्यांचे फेसबुकवरील आणि व्हॉट्‌सऍपवरील अपडेट्‌स मी करतो. माझ्यासोबत चार ते पाच जण अशी कामे करत असून, दररोज किमान पाच ते सहा तास हे काम करावे लागते.'' 

प्रत्येक क्षेत्रातील तरुणांचा सहभाग 
उमेदवारांसोबत तासन्‌ तास फिरणारे तरुण कार्यकर्ते प्रत्येक प्रभागात दिसून येतील. पक्षाचा झेंडा, चिन्ह आणि उपरणे असा पेहराव करत घोषणा देत कार्यकर्ते उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होत आहेत. प्रचार मोहिमेची तयारी, मांडव उभारणी, कार्यकर्त्यांना जेवणाचे वाटप, प्रचार फलक तयार करून घेणे अशा कामांसाठी सध्या तरुण कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. प्रत्येक सभा, रॅली, कार्यक्रम आणि भेटीगाठींचे वेळापत्रकही त्यांनी तयार केले असून, त्यानुसार उमेदवाराचा प्रचार केला जात आहे. कार्य अहवाल तयार करण्यापासून ते उमेदवारांचे फोटोशूट करण्यापर्यंतची छोटी-मोठी कामे हे कार्यकर्ते हाताळत आहेत. प्रचारात प्रत्येक क्षेत्रातील तरुण-तरुणींचा सहभाग दिसतो. डॉक्‍टरपासून ते कलाकारांपर्यंत प्रत्येकजण प्रचारात भाग घेत आहे.

Web Title: Youth promotion campaign