युतीची शक्‍यता मावळली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

इच्छुकांच्या दोन्ही याद्या तयार ठेवण्याचे उद्धव ठाकरेंचे शहर पदाधिकाऱ्यांना आदेश
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती होण्याची शक्‍यता मावळत चालली आहे. आजवर दोन्ही बाजूंनी स्थानिक पातळीवर सुरू असलेली युतीची चर्चा भाजपतील वरिष्ठांनी आदेश दिल्याने अचानक थांबविण्यात आली. दरम्यान, मंगळवारी (ता.18) सकाळी मुंबईत "मातोश्री'वर झालेल्या बैठकीत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही "इच्छुकांच्या दोन्ही याद्या (युती झाली तर आणि नाही झाली तर...) तयार ठेवा', असे आदेश शहर पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी युती आवश्‍यक असल्याचे भाजपने केलेल्या सर्वेक्षणातून लक्षात आले. त्यानुसार युतीसाठी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी पहिले पाऊल उचलले. त्यांनी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांची भेट घेऊन चर्चा केली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊन नंतर ही चर्चा पुढे वरिष्ठ पातळीवर पोचली. भाजपने या कामासाठी शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन वरिष्ठांकडे स्वतंत्र जबाबदारी सोपविली होती. मात्र, मुंबईतील शिवसेना आणि भाजपमधील कुरबूर पाहून गेल्या आठवड्यात भाजपच्या वरिष्ठांनी "चर्चा थांबवा', असे आदेश दिले. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या भाजपप्रवेशाची पहिली अट "युती नको' अशी होती. तीसुद्धा भाजपने मान्य केल्याने, युती जवळपास फिसकटली आहे.

शहर शिवसेनेच्या निवडणूक तयारीबाबत आज सकाळी ठाकरे यांनी "मातोश्री'वर स्वतंत्र बैठक बोलावली होती. त्या वेळी संपर्कनेते डॉ. अमोल कोल्हे, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे आणि महापालिकेतील गटनेत्या सुलभा उबाळे उपस्थित होत्या. शिवसेनेच्या व्यूहरचनेबाबत सुमारे तासभर चर्चा झाली. युती झाली तर किती पॅनेल येतील, किती जागांची खात्री आहे, याची माहिती ठाकरे यांनी घेतली. निवडणुकीची जबाबदारी आढळराव, बारणे यांच्यासह कोल्हे यांच्याकडे असेल. खासदार देसाई आणि राऊत यांनाही विशेष लक्ष घालण्याचे आदेश त्यांनी दिले. चर्चेअंती युती झाली नाही; तर 128 जागांवर लढण्याची तयारी पाहिजे. त्यासाठी संभाव्य सर्व इच्छुकांची नावे तयार ठेवा, असेही ठाकरे यांनी बजावले. आमदार महेश लांडगे यांच्या संभाव्य भाजपप्रवेशावरही साधकबाधक चर्चा या वेळी झाली.

बाबर यांच्या प्रवेशाबाबत उद्धव ठाकरे अनुकूल
माजी खासदार गजानन बाबर यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचा विषय या बैठकीत छेडण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्यासह सुभाष देसाई, संजय राऊत त्याबाबत सकारात्मक होते. चाळीस वर्षे संघटनेत काम केलेल्या बाबर यांचा निवडणुकीत फायदा होईल, असा युक्तिवाद झाला. त्यामुळे स्वतः ठाकरे त्यासाठी तयार होते; परंतु बाबर यांचा प्रवेश झाल्यास पुन्हा गटबाजी वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात आल्याने निर्णय होऊ शकला नाही.