बुद्धी दे गणनायका..!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पारंपरिक उत्सवाचे सात्त्विक, सर्जनशील अन्‌ प्रेरक स्वरूप टिकावे, सभ्यतेचा रंग टिकावा, ह्यासाठी कसून प्रयत्न करणाऱ्या संस्थांना, मंडळांना बळ द्यायला हवे. काही ठिकाणी जर अपप्रवृत्ती शिरत असतील तर त्या दूर करण्यासाठी सर्वच घटकांची साथ हवी.

‘त्वंज्ञानमयो विज्ञानमयोऽऽसि...’ अशा शब्दांत ज्याचे वर्णन अथर्वशीर्षात केले जाते, त्या बुद्धिदात्या गणेशाच्या सार्वजनिक उत्सवात बुद्धिगम्य असे काही राहिलेले नाही,अशी खंत व्यक्‍त केली जाते. त्यामुळेच ह्या पारंपरिक उत्सवाचे सात्त्विक, सर्जनशील अन्‌ प्रेरक स्वरूप टिकावे, सभ्यतेचा रंग टिकावा, ह्यासाठी कसून प्रयत्न करणाऱ्या संस्थांना, मंडळांना बळ द्यायला हवे. हा प्रवाह अधिक जोमदार कसा बनेल, यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प यंदाच्या गणेशोत्सवात करायला हवा. अशा चांगल्या आणि विधायक प्रयत्नांचा गौरव होतो आणि प्रतिष्ठा मिळते, असे वातावरण समाजात निर्माण करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कालौघात सार्वजनिक गणेशोत्सवाचा हेतू आणि स्वरूप पूर्णत: पालटले आहे, हे खरेच. एकीकडे उत्सवाच्या निमित्ताने अनेक चांगले उपक्रम पार पडताना दिसताहेत. कित्येक मंडळे आलेल्या निधीचा सामाजिक कार्यासाठी आवर्जून उपयोग करताना दिसतात. देखाव्याद्वारे सामाजिक प्रश्‍न हाताळणाऱ्या आणि प्रबोधनाचा प्रयत्न करणाऱ्या मंडळांची संख्याही वाढताना दिसते हे खरेच; परंतु दुसरेही चित्र काही ठिकाणी दिसते आणि त्या बाबतीत आत्मपरीक्षणाची गरज आहे. गणेशोत्सवाच्या मांडवातला पुढाऱ्यांचा बिलंदर वावर, कोट्यानुकोटीचे पल्ले ओलांडणाऱ्या व्यवहारांमधले घोळ, उत्सवाला आलेले तद्दन व्यावसायिक स्वरूप, डीजेच्या दणदणाटी चक्रात अडकलेला विघ्नहर्ता, मिरवणुकांमधली धुंदी, ध्वनिप्रदूषणाचा विळखा अशा समस्याही अलीकडे तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. दुर्दैवाने ज्यांनी या सगळ्याचे नियमन करायचे, तेदेखील याच दणदणाणाटात आपला आवाज मिसळू लागले आहेत आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उमटणारा विवेकाचा स्वर तर सरकारलाही सहन होत नाही की काय, असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

एकूणच हा उत्सव अशा अनेक गोष्टींमुळे पूर्वीची रया घालविणार की काय, असा प्रश्‍न समोर आला आहे. स्थानिक पातळीवर मुला-मुलींच्या कलागुणांना बहर येण्यासाठी कार्यक्रमांची रेलचेल आणि त्यातून अनुभवाला येणारे सांस्कृतिक वातावरण यांचे अस्तर आता विरू लागले असेल तर ते कशामुळे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. सामाजिक एकोप्याच्या हेतूने सुरू झालेला हा गणपती उत्सव आता कोणत्या वळणावर नेऊन ठेवणार आहोत, याचा शांतपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे. बऱ्याच ठिकाणी गणेशोत्सवाच्या मांडवात रात्रभर चालणारे पत्त्यांचे फड यंदाच्या उत्सवाच्या सुरवातीलाच चर्चेचा विषय झाले. वास्तविक असे फड जमविले जातात, हे काही लपून राहिलेलेच नव्हते; परंतु मांडवात जागरण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पत्ते पिसले तर एवढे काय बिघडले? असा जाहीर सवाल जेव्हा पुढारीच करू लागतात, तेव्हा मात्र मती गुंग होते. औरंगाबादच्या शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे ह्यासारख्यांनी ‘पत्ते खेळू द्यावेत’ अशी जाहीर भूमिका घेणे, अनाकलनीय आहेच; पण निंदनीयदेखील मानले पाहिजे. सार्वजनिक गणेशोत्सवाला केवळ राजकीय हेतू तडीला नेण्याचे साधन मानण्यातून ही विचारसरणी तयार होत असावी. वास्तविक ह्या मांडवात आपण गणेशाची सुंदर मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करतो. षोडशोपचारे पूजा-अर्चना करतो. एकप्रकारे ते आठ-दहा दिवसांपुरते का होईना, पण भगवंताचे देऊळच असते. जिथे जाताना भाविकांनी पायातील चपलासुद्धा काढून ठेवाव्यात, अशी अपेक्षा असते. त्या देवळात पत्ते खेळावेत, असे कुणी सुज्ञ म्हणेल का? एरवी, देवदिकांच्या विटंबनेने संतप्त होणारे हेच तथाकथित संस्कृतिरक्षक नेते पैसे लावून भर मांडवात पत्ते पिसण्याला विटंबना मानत नाहीत, हे कसे? कार्यकर्त्याच्या तीन पत्तीकडे पोलिसांनी जरा काणाडोळा करावा, कारण रात्रभर जागताना कार्यकर्त्यांनी मग करावयाचे तरी काय? हा अजब युक्‍तिवादच मुळात अनाठायी आहे. ‘सार्वजनिक गणपती बसवण्याची कुणावर सक्‍ती नसते. जागरणे डोईजड होत असतील तर उत्सवाच्या फंदात पडूच नये. नोटाबंदीनंतर मंडळाची वर्गणी रोडावलेली असल्याने मांडवात पत्त्यांचा डाव मांडणाऱ्यांनी त्यातून मिळालेले पैसे मंडळाच्या दानपेटीत टाकावेत’, ही सूचना वरकरणी तार्किक वाटली, तरी ती अनेक वाईट प्रवृत्तींना खतपाणी घालणारी ठरेल, हे कोणीही सांगेल. गणेशोत्सवातील अपप्रवृत्तींची वजाबाकी करण्याऐवजी बेरीजच करणारे हे पुढारपण कसल्या हेतूने चालले आहे, हे सुज्ञास सांगणे न लगे! गेली अनेक वर्षे हे प्रकार होत आहेत, आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालक त्याकडे जमेल तितकी डोळेझाक करतात. परंतु, ह्या प्रवृत्तींना उघड राजमान्यता आणि लोकमान्यता मिळावी, हे कोणालाही मान्य होण्यासारखे नाहीच. ज्या प्रवृत्तींचा नाश होण्यासाठी सद्‌बुद्धी मिळावी, असे साकडे देवाला  घालायचे, त्याचेच जाहीर समर्थन करावयाचे, ही वैचारिक दिवाळखोरी आहे. त्यामुळे अशांना सद्‌बुद्धी देण्याची प्रार्थना गणनायकाकडे करूया.