अडवा आणि जिरवा (ढिंग टांग )

अडवा आणि जिरवा (ढिंग टांग )

फेसबुकावरच्या ‘आबा कावत्यात’च्या चालीवर सांगायचं झालं, तर ‘ताई चिडल्यात’. लय म्हंजे लईच कावल्यात. ‘आमंत्रण आले जरी सिंगापुरी, परिषदेत सहभागी न होणार परि’ असं बाणेदार (की पाणीदार?) ट्विट त्यांनी केलंय.

ताई जेवढ्या चिडतात, तेवढे नानासाहेब खुश होतात. मनातल्या मनात (खदखदून) हसतात. त्याच खुशीत, तसंच हसत त्यांनी चोख ट्विटोत्तर दिलंय. ते म्हणतात- ‘परिषदेला लावणे हजेरी तुमची मजबुरी, आहात ना ज्येष्ठ प्रतिनिधी या सरकारी?’ (टिवटिवाटच्या खेळातले मुरब्बी खेळाडू सांप्रत दोनच- दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र!)

आमच्या ताई म्हणजे बाबांच्या लाडक्‍या कन्या. प्रत्येक सभेत, प्रत्येक भाषणात ताई ‘बाबा, माझे बाबा’ असा जप करतात, गहिवरून जातात. ते ऐकल्या-पाहिल्यावर वाटतं, ठाण्याच्या सावळाराम पाटलांनी ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला...’ हे गीत लताबाईंसाठी नाही, तर ताईंसाठीच लिहिलंय!

ताई म्हणजे बहुजनांची तलवार; ताई म्हणजे परळीच्या तारणहार; ताई बीडसाठी आधार; ताई मराठवाड्याची मदार. (इथे आम्हाला क्षमा करण्याची दानत दानवे पाटील दाखवावी, अशी विनंती!) ताई म्हणजे बरंच काही, सांगावं किती सरत नाही! धनूभौंच्या (कधी काळच्या) लाडक्‍या बहिणाबाई. आताच्या दोडक्‍या. तर ते असो. सध्याच्या रामायणात महाभारताचे परळी पर्व नको.

ताई म्हणजे लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्री. (पण आले श्रेष्ठींच्या मना आणि मुख्यमंत्री झाले नाना!) लोकांच्या मनात काय आहे, हे त्यांना कळलं. पण दिल्लीच्या आणि मुंबईच्या मनात काय, हेच त्यांना नाही ना वळलं. अडचण तिथंच आहे खरी.

‘तुज कळते परि ना वळते,’ अशी अवस्था असल्यामुळंच मध्यंतरी चिक्की गाजली. धनूभौंसह विरोधकांनी चघळली. पार चोथा झाल्यावर ‘चिक्की; कुणी ना खाल्ली पक्की’ अशी ‘क्‍लीन चिट’ मिळाली. त्यानंतर उद्‌भवले ‘सेल्फी’चे प्रकरण. ‘सेल्फी विथ डॉटर’चा आदेश दिल्लीतून आला असता, ताईंनी ‘सेल्फी विथ (थोडेसे) वॉटर’चा प्रयोग केला. तो दुष्काळदेशी गाजला-वाजला. जलसंधारण करीत असताही तोंडचे पाणी पळण्याची वेळ या ‘सेल्फी’ने आणली. तदनंतरही ताई ‘दक्ष’ झाल्याचे पाहायला मिळाले नाही. धनूभौविरुद्ध कारवाई व्हावी, म्हणून त्या आग्रही राहिल्या. धर्माचा भाऊ महादेवरावांना कॅबिनेट देण्याचा हट्टाग्रह त्यांनी धरिला. ताईहट्टच ते. काही प्रमाणात झालेही पूर्ण.

सांप्रत दिल्लीच्या नि मुंबईच्या राजकारणात सुसंगती आढळून येते. (मतीचा कलंक झडण्यास मात्र वेळ लागेल, असे दिसते.) विस्ताराची पंगत जेऊ घातल्यानंतर दिल्लीतले नरेंद्र आफ्रिकेत गेले. इकडे देवेंद्रही पंगतीत वाढल्यावर हात झटकून रशियाला रवाना झाले. जाता जाता त्यांनी गंमतच केली. घरचाच कॅट असल्यामुळे तो मनसोक्त पिसला. काही पत्ते इकडचे तिकडे केले आणि ‘सिक्वेन्स’ दावला!

कडक उन्हाळ्यात जिवाची काहिली होत असताना जलसंधारणाची तळी राखली. रोजगाराची हमी देखली. आता तळी भरत आली आणि चाखण्याची जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे. हे ‘राम’! कोणालाही संताप यावा नि ट्विट करावे, अशीच ही परिस्थिती नव्हे काय?

जलसंधारण काय किंवा जलयुक्त शिवार काय. ‘अडवा आणि जिरवा’ त्याचा मूलमंत्र. काँग्रेसजनांना हा मंत्र आणि त्याचं तंत्र चांगलंच कळलं होतं. तोच मंत्र ‘काँग्रेसमुक्त भारतात’ही वापरला जातोय. तेवढ्याच खुबीनं. जलसंधारण काढून घेऊन अडवायची आणि जिरवायची, म्हणजे काही आधुनिक उच्च वैद्यकीय शास्त्रात गणले जाणारे इंजेक्‍शन नव्हे. आपल्या महान संस्कृतीतील गौरवास्पद आयुर्वेदात सांगितलेली ‘मात्रा’ फक्त चाटविलेली आहे. एक-दोनच वळसे घेऊन. त्यातून संबंधितांची दृष्टी सुधारून नानांच्या खुर्चीवरून ढळेल, एवढीच माफक अपेक्षा. हा कोणाला सांस्कृतिक ‘विनोद’ वाटल्यास खैर नाही. ‘नजर ना हटी, दुर्घटना घटी’ एवढे मग निश्‍चित! तशी नजर लावणाऱ्यांचा ‘नाथाभाऊ’ करण्यास दिल्लीत श्री समर्थ आहेतच. हवी तर करा ‘शहा’निशा!

तूर्तास ‘रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू, मंत्रिपद वाचलं म्हणून तरी हसू’ असं बडबडगीत गायला हरकत नाही. आम्हा दोघांचा एकच ध्यास, शालेय शिक्षणातून ग्रामविकास!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com