ऍडव्हान्टेज हिलरी क्‍लिंटन!

भारतकुमार राऊत
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

आपल्याला प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे, सगळ्यांना बरोबर नेत आपण कारभार करू शकू, हे ठसविण्याचा हिलरी क्‍लिंटन यांचा प्रयत्न होता. त्याच जोरावर चर्चेत त्यांनी ट्रम्प यांना निष्प्रभ केले. मात्र, अध्यक्षीय निवडणुकीतील चुरस अद्यापही तेवढीच तीव्र आहे. 

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या लढाईला तोंड फुटले आहे. सोमवारी झालेल्या अध्यक्षीय उमेदवारांच्या जाहीर चर्चेत या होऊ घातलेल्या नाटकाची पहिली घंटा वाजली. आठ नोव्हेंबरला मतदान होईपर्यंत प्रचाराची पातळी किती खालावणार आहे, याची झलक चर्चेत दिसली. ती सुन्न करणारी आहे. डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्‍लिंटन व रिपब्लिकनचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेतून विचारांचे नवनीत बाहेर येण्याऐवजी वैयक्तिक व कडवट टीकेचा चिखलच उडत राहिला. त्यामुळे साऱ्यांचेच कपडे बरबटले व तोंडे काळी झाली. इतके मात्र खरे की, चर्चेच्या पहिल्या फेरीत हिलरी यांनी बाजी मारली. ही आघाडी त्यांनी पुढील सहा आठवडे टिकवली, तर अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळेल. 

ट्रम्प स्वत: धनाढ्य उद्योगपती असले, तरी अध्यक्षपदाच्या लढतीच्या उडी घेईपर्यंत राजकीय वर्तुळात त्यांचे नाव फारसे कुणाला ठाऊक नव्हते. पक्षातही त्यांना फारसा पाठिंबा नाही. प्रचंड आर्थिक ताकदीच्या जोरावर ते लढतीत आहेत. हिलरी मात्र ‘फर्स्ट लेडी‘ म्हणून व्हाइट हाउसमध्ये आठ वर्षे राहिल्या आहेत. नंतर सिनेटर व परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांना अनुभव मिळाला. त्या शिदोरीवरच पहिल्या फेरीत त्यांनी ट्रम्प यांच्यावर सहज मात केली. 

अर्थात, याचा अर्थ हिलरींचा अध्यक्ष बनण्याचा मार्ग खुला झाला असा नाही. भारताप्रमाणेच अमेरिकेतही शेवटच्या दिवसांत कोण किती रक्कम खर्च करून जनतेचे डोळे दिपवून बाजी मारतो, यावर बरेच अवलंबून असते. 2008 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीचे बराक ओबामा पहिल्यांदा विजयी झाले, तेव्हाच्या पहिल्या जाहीर चर्चेत रिपब्लिकन सेनेटर जॉन मॅक्केन यांच्यासमोर ओबामा अगदीच फिके पडले होते. पहिले कृष्णवर्णीय म्हणून ओबामा बचावात्मक भूमिकेत होते, तर मॅक्केन ‘वॉर हिरो‘ असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व जनतेच्या मनात ठसलेले होते; पण ओबामांनी स्वत:ला लगेच सावरले व पुढील फेऱ्यांमध्ये लोकप्रियतेच्या मतदानात ते मॅक्केनच्या पुढे गेले. तसाच प्रयत्न यापुढील काळात ट्रम्प करणारच नाहीत, याची खात्री नाही. मात्र, आज तरी स्थिती ‘ऍडव्हान्टेज हिलरी‘ अशीच आहे. 

चर्चेच्या प्रारंभी एकमेकांना शुभेच्छा देण्याचे प्राथमिक उपचार झाले खरे, पण लगेचच दोघांनीही तलवारी बाहेर काढल्या व खडाखडी सुरू झाली. अमेरिका हा आर्थिक, राजकीय व लष्करी क्षेत्रात सर्वात बलवान देश मानला जात असला, तरी इतर अनेक समस्यांबरोबरच तरुणांना चांगल्या अर्थाजनाच्या संधींची कमतरता आहे. या विषयावर फारशी चर्चा झालीच नाही. ट्रम्प यांच्या आर्थिक व्यवहारांच्या सध्या चर्चेत असलेल्या प्रश्‍नावरच हिलरींनी तोफ डागली. ‘तुम्ही तुमचे व तुमच्या कंपन्यांचे ताळेबंद केव्हा जाहीर करणार?‘ या हिलरी यांच्या वैयक्तिक पण बिनतोड दिसणाऱ्या प्रश्‍नावर स्वत:ला सावरत ट्रम्पनी उत्तर दिले की, अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या ई-मेल आपल्या खासगी सर्व्हरवरून पाठवण्याबाबतचे समाधानकारक स्पष्टीकरण हिलरी देतील, त्यानंतर मीही माझे ताळेबंद जाहीर करीन! ‘या चर्चेची पूर्वतयारी करून हिलरी आल्या आहेत,‘ असे ट्रम्प हसत हसत म्हणाले, त्यावर हिलरी उसळल्या. ‘‘होय, मी पूर्वतयारी केली आहे; आजच्या चर्चेची व नंतर अमेरिकन अध्यक्षपदाची खुर्ची सांभाळण्याचीसुद्धा.. ‘, असे ठणकावून त्यांनी प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. या उलट हिलरी यांच्या शारीरिक क्षमतेवर शंका घेऊन अध्यक्षपदाची जबाबदारी पुढील चार वर्षे सांभाळण्यास त्या असमर्थ आहेत, असा आरोप ट्रम्प यांनी केला, तेव्हा सेक्रेटरी ऑफ स्टेट असताना आपण किती दौरे केले व किती तास विविध व्यासपीठांवर प्रदीर्घ भाषणे केली, यांची जंत्रीच हिलरींनी दिली. अशा तऱ्हेचा खासगी व वैयक्तिक स्वरूपाचा वाद अपेक्षित नव्हता. पुढील चर्चेची पातळी मात्र त्यामुळे ध्यानात आली. 

मुस्लिम जनतेबाबतची आपली कडवट व ठाम मते ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा जाहीर केलेली आहेत. हिलरींनी यापूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहारांचा कारभार सांभाळलेला असल्याने त्यांचे या विषयावरील मत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांनी जागतिक दहशतवादाचा विषय उपस्थित केला. या विषयावर आम्ही आखाती देशातील मित्रांसमवेत चर्चा करत आहोत. यापैकी बहुसंख्य देश मुस्लिम-बहुल आहेत, हे स्पष्ट करतानाच हिलरींनी ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा मुसलमानांचा अपमान केलेला आहे, हेही पुन्हा एकदा रेकॉर्डवर आणले. या वक्तव्याचा व त्यातून उद्भवणाऱ्या वादांचा परिणाम देशाच्या पुढील परराष्ट्रनीतीवर होणार, हे निश्‍चित. क्‍लिंटन दाम्पत्याच्या खासगी प्रतिष्ठानांमध्ये जमा होणारा निधी व त्यांचा विनियोग, यावर तीन महिन्यांपूर्वीच हिलरींचे डेमोक्रॅटिक पार्टीतील प्रतिस्पर्धी बेनी सॅंडर्स्ट यांनी आरोपांची राळ उडवली होती. त्याचा साधा उल्लेखही ट्रम्प यांनी केला नाही. कदाचित चर्चेच्या पुढील फेऱ्यांसाठी ट्रम्प यांनी हा दारूगोळा राखून ठेवला असावा. 

प्रसिद्ध राजकीय विवेचक लेस्टर हॉल्ट यांनी चर्चेचे सूत्रसंचालन केले. हिलरी बोलत असताना ट्रम्प यांनी वारंवार अडथळे आणल्याने अनेकवार त्यांना गप्प बसवण्याचे काम हॉल्ट यांना करावे लागले. पहिल्या अर्ध्या तासात ट्रम्प यांनी 25 वेळा हिलरींच्या बोलण्यात अडथळे आणले, शिवाय वेगवेगळे हावभाव करत ते लक्ष खेचण्याचा प्रयत्न करीत होते; पण त्यामुळे त्यांचीच बाजू लंगडी होत गेली. चर्चा संपल्यानंतर हिलरींना भेटण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाली, तर ट्रम्प मात्र केवळ आपले कुटुंबीय व पक्षाच्या प्रसिद्धी प्रमुखांच्या टीमबरोबर उभे राहिले. 

थोडक्‍यात, लढाईला सुरवात तर झालेली आहे; पुढे काय होते, ते पाहणे औत्सुक्‍याचे असेल. 

 

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार आहेत)