अगतिकाची उपरती

Agatikachi Uparati Pune Editorial Edition
Agatikachi Uparati Pune Editorial Edition

पवित्र रमजानच्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या महिन्यात रक्‍तपात नको म्हणून परवा जम्मू-काश्‍मीरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी दहशतवाद्यांशी शस्त्रसंधी करण्याचा प्रस्ताव संमत केला. हा प्रस्ताव म्हणजे अप्रत्यक्ष युद्ध पुकारलेल्या पाकसमर्थित दहशतवादासमोर शरणागती स्वीकारल्यासारखे होईल, अशी टीका सुरू आहे. ..अन्‌ नेमके याचवेळी नोव्हेंबर 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या सहभागाची, त्या कृत्याला पाकिस्तानी लष्कर, "आयएसआय' या गुप्तचर संघटनेच्या पाठबळाची कबुली त्या देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणाऱ्या नवाज शरीफ यांनी दिली आहे; परंतु या उपरतीमागची कारणे खोलात जाऊन पाहिल्यास कोणत्याही बाबतीत त्या देशावर किती विश्‍वास ठेवावा, हा प्रश्‍नच आहे.

शरीफ यांनी "डॉन' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमुळे त्या देशात अचानक सत्यवचनाची "पहाट' उगविली आहे की काय, असा कुणाला प्रश्‍न पडेल; पण तसे अजिबात नाही. अडगळीत जाण्याच्या धास्तीतून केलेला हा एक लक्ष वेधण्याचा प्रयत्न असू शकतो. 

राजकीय पुनर्वसनाच्या प्रयत्नांतील नेते शक्‍यतो कडव्या राष्ट्रवादाचा आधार घेतात. पाकिस्तानबाबतही अनुभव असा आहे की, तिथला एखादा नेता राजकीयदृष्ट्या अडचणीत आला की तो भारतविरोधी भूमिका घेतो, त्यातून लोकप्रियता तसेच लष्कर व दहशतवादी संघटनांचा पाठिंबा मिळवायचा प्रयत्न करतो. नवाज शरीफ यांनी नेमकी उलटी भूमिका घेतली आहे.

आत्मपरीक्षणाचा सूर लावला आहे. त्यांच्या मुलाखतीतील वेगळेपण आहे ते एवढेच. फारतर असे म्हणता येईल, की भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्यातील परस्परसंबंध आणि चीन, रशियाच्या तिन्ही देशांसंदर्भातील भूमिकेचा विचार करता शरीफ यांची कबुली बऱ्यापैकी वस्तुस्थितीच्या जवळ जाते. दहशतवाद्यांचे आश्रयदाते नसल्याचे पटवून देताना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तान वारंवार आपणच दहशतवादाचे बळी आहोत, असे सांगत आला आहे. हा युक्‍तिवाद जगाने कधीच मान्य केला नाही.

तालिबानच्या रक्‍तपातात न्हाऊन निघालेल्या अफगाणिस्तानचा तसाच युक्‍तिवाद मान्य होतो आणि पाकिस्तान मात्र जगात एकटा का पडतो, याची वस्तुनिष्ठ कारणमीमांसा म्हणून शरीफ यांच्या कबुलीकडे पाहावे लागेल. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शेकडो निरपराध व्यक्ती मृत्युमुखी पडल्या, जखमी झाल्या. 

पोलिस दलातील काही धाडसी अधिकारी बळी पडले. अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले. त्याचे पाकिस्तानचे नागरिकत्व सिद्ध झाले. तेव्हा, "लष्कर-ए-तोयबा' ही दहशतवादी संघटना व सूत्रधार जकीउर रहमान लखवीमार्फत हल्ल्याच्या कारस्थानाची सूत्रे पाकिस्तानने हलविल्याचे स्पष्ट झाले.

यासंबंधी ढीगभर पुरावे सादर करून भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला. तेथील राज्यकर्ते आणि लष्कराने मात्र कानावर हात ठेवत खोटेपणाची हद्द गाठली. लखवी जामिनावर सुटला. रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयातला खटला मुद्दामहून रेंगाळत ठेवला गेला. या प्रकारांमुळे पाकिस्तानची जगभर आणखी नाचक्की झाली. 

शरीफ यांनी नेमक्‍या त्या मुद्यावर बोट ठवले आहे आणि चीन व रशियाच्या अध्यक्षांसह इतरही जागतिक नेत्यांकडून पाकिस्तानला दहशतवादाच्या प्रश्‍नावर कशा कानपिचक्‍या मिळतात, याचीही कबुली दिली आहे; पण ही उपरती शरीफ यांना आत्ताच का झाली, हा खरा प्रश्‍न आहे. या पश्‍चात्तापाची कारणे पाकिस्तानातील सध्याच्या एकूण राजकीय स्थितीत आहेत. नवाज शरीफ यांनी लष्कर, आयएसआय, दहशतवादांच्या टोळ्या यांच्या समांतर सरकारांकडे बोट दाखविले आहे.

त्यांच्या वर्चस्वामुळे आणि मनमानीमुळे लोकनियुक्त सरकार अडचणीत येते; मात्र आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर टीकेला, आक्षेपांना तोंड द्यावे लागते ते लोकनियुक्त सरकारच्या प्रतिनिधींना, असा त्यांचा युक्‍तिवाद आहे; पण ही शरीफ यांची पश्‍चातबुद्धी आहे. ते प्रामाणिक असते तर तीन वर्षे पंतप्रधान असताना त्यांनी भारताच्या मागणीनुसार तपासात सहकार्य केले असते. 

अंतर्गत राजकारणात शरीफ सध्या विस्थापित आहेत. पनामा पेपर्स घोटाळ्यातल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधानपद सोडावे लागले. गेल्या एप्रिलमध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आयुष्यभर सार्वजनिक पद सांभाळण्यावर बंदी घातली. शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगच्या ताब्यात देशाची सत्ता असली, शाहीद खकान अब्बासी पंतप्रधानपदी असले तरी सध्या ती सगळी मंडळी अस्तित्वाची लढाई लढत आहेत.

परिणामी, या कबुलीमुळे नवाज शरीफ आणखी अडचणीत येण्याचीच शक्‍यता अधिक. त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका सुरू आहे. "पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' पक्षाचे अध्यक्ष, माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी, गैरमार्गाने मिळविलेली अब्जावधी डॉलरची संपत्ती वाचविण्यासाठी शरीफ हे नरेंद्र मोदींची भाषा बोलत असल्याची टीका केली. थोडक्‍यात, शरीफ यांच्या कबुलीने भारताच्या दाव्यांना जगभर बळ मिळेल, हे खरे असले तरी पाकपुरस्कृत दहशतवादाची समस्या सुटण्यात काही मदत होईल, अशी शक्‍यता नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com