कबड्डीतील ‘अजय’ (नाममुद्रा)

कबड्डीतील ‘अजय’ (नाममुद्रा)

अनुपकुमारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय कबड्डी संघाने इराणचा पराभव करून तिसऱ्यांदा विश्वकरंडकावर नाव कोरले. या वेळी ते सोपे नव्हते; पण अजय ठाकूरने आपले नाव सार्थ करीत भारताची शान राखली. कबड्डीत कधी काळी महाराष्ट्राचे वर्चस्व होते. आता हरियाना व पंजाबचा दरारा आहे; पण हिमाचल प्रदेशमधून आलेल्या अजय ठाकूरने कमाल केली. पराभवाच्या दिशेने झुकलेली संघाची पावले त्याने विजेतेपदाकडे एकहाती वळवली. अजय असल्यामुळे आम्ही पिछाडीवर असलो तरी चिंता नव्हती, हा त्याच्या सहकाऱ्यांचा विश्‍वासच खूप काही सांगणारा होता.

‘हिमाचल कुमार’ या टोपणनावाने ओळखले जाणारे छोटू राम ठाकूर हे हिमाचल प्रदेशातील नावाजलेले मल्ल. भारताकडून कुस्ती खेळण्याचे त्यांचे स्वप्न होते; परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही; पण त्यांच्या सुपुत्राने त्यांचा वारसा सांभाळला. ‘वन मॅन आर्मी’प्रमाणे तो लढला. या स्पर्धेसाठी निवड झाल्यानंतर आपण विजेतेपदानेच परतू, असा शब्द त्याने वडिलांना दिला होता होता. तो त्याने पूर्ण करून दाखवला.

हे त्याचे पहिले राष्ट्रीय यश नाही. चीनमध्ये झालेल्या आशियाई इन्डोअर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी कामगिरी केली होती. देशासाठी अभिमानास्पद असे पदक जिंकल्यानंतर छोटू राम यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. आतातर ‘पुत्र व्हावा ऐसा’ अशीच भावना त्यांना मनात तयार होईल. वडील मल्ल आणि काका जलाल ठाकूर हेसुद्धा राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणजेच घरात खेळाचे वातावरण. त्यामुळे अजयची पावले लहानपणीच पाळण्यात दिसली नसती तर नवल नव्हते; पण लहानपणी घेतलेली मेहनत आत्ता त्याला दिग्गजांमध्ये स्थान देत आहे. तरुणपणी त्याने क्रीडा प्राधिकरणात (साई) कबड्डीचे शास्त्रशुद्ध धडे गिरवले. म्हणजेच गुणवत्तेला मेहनतीची जोड दिली. कबड्डीपटूंची नावे आता क्रिकेटपटूंप्रमाणे ओळखीची झाली आहेत. या ग्लॅमरध्ये चमकणाऱ्या खेळाडूंची यादी कमी जास्त होत राहील किंवा पुढचा मोसम सुरू झाला की मागचे विससले जाईल; पण विश्वकरंडकाच्या या हिऱ्याचे तेज कायमस्वरूपी चमकत राहील.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com