मनाच्या भूमीवरील युद्धाचे तंत्र

अजेय लेले (सामरिक विश्‍लेषक)
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

भारत-चीन सीमेवर डोकलामच्या मुद्द्यावरून तणावाची स्थिती आहे, तर तिकडे उत्तर कोरियामुळेही अशाच प्रकारचा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सध्या मानसशास्त्रीय युद्धधोरणावर चर्चा होताना दिसते. काय आहे हे मानसशास्त्रीय युद्धतंत्र?

भूतानमधील डोकलामवर नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असलेला चीन या प्रकरणी भारताबरोबर मानसिक खेळ खेळत असल्याचे काही विश्‍लेषकांचे मत आहे. अशाच प्रकारच्या घटना उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यादरम्यान सुरू आहेत. परस्परांवर शाब्दिक हल्ले चढवत अमेरिका आणि उत्तर कोरिया एकमेकांना वारंवार धमक्‍या आणि इशारे देताना दिसत आहेत. हादेखील मानसशास्त्रीय युद्धाचाच भाग आहे. तात्त्विकदृष्ट्या मानसशास्त्रीय युद्ध ही संकल्पना नेमकी काय आहे, त्याची सुरवात नेमकी कशी झाली किंवा मागच्या काही वर्षांमध्ये ही संकल्पना जाणीवपूर्वक निर्माण केली गेली का? युद्धाचा हा प्रकार 21व्या शतकात कितपत प्रस्तुत वाटतो, असे प्रश्‍न या संदर्भात उपस्थित होतात.

सामान्यपणे, प्रोपोगंडा (विशिष्ट मतांचा प्रसार), धमक्‍या आणि इतर मानसिक तंत्रे वापरून विरोधकाला नामोहरण करणे, भरकटविणे, मनोधैर्य खच्ची करणे किंवा विरोधकाचे विचार, वर्तणुकीवर प्रभाव टाकणे आदींचा मानसशास्त्रीय युद्धामध्ये समावेश होतो. यात प्रतिस्पर्ध्याची मते, भावना, दृष्टिकोन आणि वर्तणुकीवर प्रभाव टाकण्याच्या मुख्यत्वे उद्देश असतो. मानसशास्त्रीय युद्धाप्रमाणेच युद्धाची अनेक अत्याधुनिक तंत्रे सध्या अस्तित्वात आहेत. प्रोपोगंडा ऑपरेशन्स, माहिती युद्ध, प्राणघातक नसलेले प्रमाणविरहित डावपेच किंवा आकलन व्यवस्थापन अशा अनेक आधुनिक युद्धतंत्रांचा सध्या वापर करण्यात येतो. या विविध तंत्रांची मानसशास्त्रीय युद्धाच्या संकल्पनेत सरमिसळ करून वापर केल्याची अनेक उदाहरणे आढळून येतात. उदाहरणार्थ, विरोधकाच्या लष्करी डावपेचांवर प्रभाव टाकण्यासाठी "माहिती युद्धा'चा परिणामकारक वापर केला जातो. या संकल्पनांवर अमेरिकेत मागील अनेक वर्षांपासून अनेक "थिंक-टॅंक'कडून संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाचा वापर करून शत्रूला गुंतवून ठेवण्यासाठीची धोरणे व व्यूहरचना तयार करण्यात येते. धोरणकर्ते आणि लष्करी नेतृत्वाला अशा संशोधनाची मदत होते. युद्धात मानसशास्त्रातील अनेक बाबींचा वापर केला जातो. शत्रूच्या मानसशास्त्रीय वर्तनाच्या आकृतिबंधांचा, कच्च्या दुव्यांचा, मर्मस्थानांचा अभ्यास करण्यात येतो आणि त्या माध्यमातून शत्रूच्या विरोधात नेमका काय "प्रोपोगंडा' राबवायचा हे ठरविण्यात येते, त्यासाठी कशा प्रकारच्या संवादमाध्यमांची निवड करावी, हे अगोदरच निश्‍चित करता येते.

मानसशास्त्रीय युद्धाचे मुळातील स्वरूप हे अहिंसक आहे. शत्रूपासून कुठल्या प्रकारचा धोका आहे हे शोधून त्यानुसार मानसशास्त्रीय युद्धाचा कशा प्रकारे वापर करायचा, याचा निर्णय देश किवा लष्करी नेतृत्वाकडून घेण्यात येतो. युद्धातील डावपेचांच्या टप्प्यावर लष्कराच्या मुख्य कारवाईला मदत म्हणून किंवा शत्रुपक्षाला गोंधळात टाकण्यासाठी मानसशास्त्रीय युद्धनीतीचा वापर करण्यात येतो. मानसशास्त्रीय युद्धाच्या संकल्पनेचा वापर महाभारतामध्ये करण्यात आला होता. अत्यंत कुशल धनुर्धर अशा द्रोणांनी शस्त्र खाली टाकावीत, म्हणून त्याचा पुत्र अश्वथामा हा मारला गेला असल्याचा भास निर्माण केला गेला. भीमाने अश्वथामा नावाचा हत्ती मारला होता, मात्र नक्की हत्ती मारला की माणूस याबाबत आपल्याला खात्री नाही, असे सांगत युधिष्ठिराने आचार्य द्रोणाचार्यांच्या मनात गोंधळ निर्माण केला होता. (नरोवा कुंजरोवा). मानसिकदृष्ट्या नामोहरम करून त्यांच्यावर मात करण्याचाच हा डाव होता.

या युद्धतंत्राचा वापर प्रामुख्याने तीन पद्धतींनी केला जातो. डावपेचात्मक, धोरणात्मक आणि एकत्रितपणे. कमी कालावधीच्या युद्धांच्या वेळी डावपेचात्मक पद्धतीने, तर मोठ्या युद्धांच्या वेळी गरजेनुसार धोरणात्मक पद्धतीने हे तंत्र वापरतात. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठीही सरकारी किंवा लष्करी नेतृत्वाकडून एकत्रितपणे या युद्धतंत्राचा वापर होतो. शत्रूची लढण्याची क्षमता घटविण्यासाठी आणि नैतिक खच्चीकरण करण्यासाठी ही सर्व तंत्रे फायदेशीर ठरतात. शत्रूची ताकद अधिक असतानाही त्यावर वरचढ ठरण्यासाठीचे बळ लष्करी संस्थांना याद्वारे मिळते.

अगदी अलीकडच्या काळात, 1991च्या आखाती युद्धाच्या वेळी आणि लागोपाठच्या पश्‍चिम आशियातील लष्करी कारवायांमध्ये मानसशास्त्रीय युद्धतंत्रांचा (पीएसवायओपी) यशस्वीरीत्या उपयोग करण्यात आला होता. माहितीचा विस्फोट व संवाद, तसेच माहिती तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे (आणि आता इंटरनेटमुळेही) मानसशास्त्रीय युद्धधोरणाला नवा आयाम प्राप्त झाला आहे. यात "मल्टिमीडिया'चा वापर मोठ्या प्रमाणात होतो. रेडिओ, टीव्ही प्रक्षेपण, छापील मजकूर, लाउडस्पीकर्स ते सोशल मीडियातील विविध प्रकारच्या पर्यायांचा वापर माहितीचा प्रसार करण्यासाठी किंवा चुकीची माहिती पसरविण्यासाठी केला जातो. सध्या व्हॉट्‌सऍप किंवा यू-ट्यूबसारख्या माध्यमांचा सरकारी संस्थांबरोबरच दहशतवादी संघटनांकडूनही वापर केला जातो. फेरफार केलेली (डॉक्‍टर्ड) छायाचित्रे, व्हिडिओ प्रसारित करण्याचे सोपे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे मानसशास्त्रीय युद्धतंत्राची व्याप्ती वाढली आहे.

विशिष्ट माहिती स्वीकारण्याचा किंवा नकार देण्याचा पर्याय तंत्रज्ञानाने आज उपलब्ध करून दिला आहे. याच तंत्राचा वापर करून स्थानिक किंवा परदेशी प्रेक्षकांच्या भावना, प्रेरणा आणि तर्कशक्तीवर प्रभाव टाकणे शक्‍य झाले आहे. इंटरनेटमुळे अनेक गोष्टींवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकण्यास मदत होते आहे. मानसशास्त्रीय युद्ध ही जुनीच संकल्पना असली, तरी तिच्या अंमलबजावणीच्या पद्धतींवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मानसशास्त्रीय युद्धतंत्राचे स्वरूप आणि मनांवर प्रभाव टाकण्याची त्याची क्षमता लष्करासह उद्योगजगताबरोबरच (ब्रॅंड इमेज) राजकारण्यांनाही खुणावते आहे.

मानसशास्त्रीय युद्धाचे वर्णन युद्धाशिवायच्या लष्करी मोहिमा असे केले जाते. आवश्‍यक त्या गरजांनुसार आंतरराष्ट्रीय सुरक्षा पर्यावरणाला (अल्प किंवा पूर्णपणे) हवा तसा आकार देण्यात मानसशास्त्रीय युद्धतंत्राचे मोठे योगदान आहे. हे तंत्र वापरण्याची नवी आणि वेगवान साधने 21व्या शतकाने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे मानसशास्त्रीय युद्धमोहिमांचे स्वरूप व चेहरामोहरा मोठ्या प्रमाणात बदलताना दिसतो आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा विस्फोट झाल्याच्या सध्याच्या काळात स्वरूप बदलले असले, तरी मानसशास्त्रीय युद्धाचा आत्मा मात्र कायम राहिला आहे आणि तो म्हणजे शत्रूची दिशाभूल करणे किंवा त्याच्या मनात दहशत निर्माण करणे.
(अनुवाद ः अशोक जावळे)