...आली समीप घटिका! (ढिंग टांग!)

Ali Sampit Ghatika - Dhing Tang
Ali Sampit Ghatika - Dhing Tang

बेटा : (अत्यंत उत्साहाने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (कपाळ चोळत) हं!
बेटा : (सळसळत्या उत्साहात) बऱ्याच दिवसांनी मी आज आपल्या अकबर रोडच्या ऑफिसात गेलो होतो! म्हटलं, एक रोड शो अकबर रोडवर काढू!!
मम्मामॅडम : (कपाळ आणखी चोळत) हं!
बेटा : (उत्साहाचा झरा कंटिन्यू...) नुसता गेलोच नाही, तर तिथं एक जबर्दस्त मीटिंगही घेतली! धमाल आली, मम्मा!
मम्मामॅडम : (किंचित कण्हत) हं!
बेटा : (धम्माल किस्सा सांगत) ऐक ना, मी अकबर रोडच्या ऑफिसात गेलो, तर दरवाजातच मनमोहन अंकल उभे होते. मला बघून ते काहीतरी पुटपुटले. मला संशय आला. मी त्यांना तिथल्या तिथे विचारलं, "माझ्याबद्दल आत्ता काय म्हणालात?' तर त्यांनी मान डोलावली. मी पुन्हा विचारलं, तर काही बोलले नाहीत. करुणपणाने अँटनी अंकलकडे पाहात राहिले. अँटनी अंकलनी सांगितलं की ते तुम्हाला "गुड मॉर्निंग' करताहेत, येवढंच! हाहा!!
मम्मामॅडम : (कपाळाला बाम लावत) हं!
बेटा : (उजळ चेहऱ्यानं) अँटनी अंकल म्हणाले की आपले अध्यक्ष आज काही मीटिंगला येणार नाहीत! त्यांची तब्बेत बरी नाही, तेव्हा तुम्हीच घ्या आता चार्ज! मी म्हटलं ओक्‍के!! टाका खाटा, बसू मीटिंगला!! हाहा!!
मम्मामॅडम : (डोळे मिटून) हं!
बेटा : (किंचित काळजीने) काही होतंय का तुला? यह क्‍या हाल बना रख्खा है, कुछ लेती क्‍यूं नहीं?
मम्मामॅडम : (नकारार्थी मान हलवत) काहीही झालेलं नाही मला बेटा! मी अगदी ठीक आहे...
बेटा : (एकदम आठवून) तूच अध्यक्ष आहेस ना? मग तू का नाही आलीस मीटिंगला?
मम्मामॅडम : (एक पॉज घेत) मनमोहन अंकलनी तुला गुड मॉर्निंग करावं म्हणून! अरे, जरा डोकं दुखत होतं, एवढंच!
बेटा : (उत्साहाचा धबधबा चालूच...) अँटनी अंकल म्हणाले, की तुम्ही अध्यक्ष व्हावं ही आपल्या करोडो कार्यकर्त्यांची इच्छा आहे! आपण सध्याच्या अध्यक्षांना गळ घालून तुमचा राज्याभिषेक करून टाकू! म्हंजे पुढे आपला विजय सोप्पा होईल! मी म्हटलं, करोडो कार्यकर्त्यांना जर असं वाटत असेल तर मी कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार आहे!!
मम्मामॅडम : (दचकून डोळे उघडून) करोडो कार्यकर्ते?
बेटा : (मान जोराजोराने हलवत) येस...यू हर्ड राइट! करोडोच!!
मम्मामॅडम : (खोल आवाजात) गेल्या पाच निवडणुकीत हे करोडो कार्यकर्ते कुठे गेले होते?
बेटा : (न उमजून) गॉड नोज! पण एक मात्र खरं, की आता प्रियांकादीदीला बोलावण्याची गरज नाही! पार्टीत मला आता जाम डिमांड आहे! करोडो कार्यकर्ते माझी मागणी करताहेत, शिवाय-
मम्मामॅडम : (पुन्हा कपाळ चोळत) शिवाय काय?
बेटा : (आत्मविश्‍वासाने) खुद्द मनमोहन अंकलनी मला सगळ्यांसमोर गुड मॉर्निंग केलं! दॅट मीन्स इव्हन ही सपोर्टस मी!! हो की नाही?
मम्मामॅडम : (संयमानं) तू आता सीरिअसली घे हं सगळं! खूप मोठी जबाबदारी पार पाडायची आहे तुला! असं खाटेवर बसून चालायचं नाही आता!! तुझा राज्याभिषेक ही आता फक्‍त एक फॉर्म्यालिटी आहे!
बेटा : (हातावर मूठ आपटत) रॉंग! खाटेमुळेच तर मला मिळालाय हा सपोर्ट!
मम्मामॅडम : (आणखी संयमानं) "असेल माझा हरी तर देईल खाटेवरी' ही म्हण भारतात सगळ्यांना लागू पडत नाही, बेटा! यू आर लकी!! प्रियांकादीदीचं म्हणत असशील तर-
बेटा : (घाईघाईने)... मी तयार आहे मम्मा! एनी डे!! पण मला एक सांग, हे सगळं कधी होईल?
मम्मामॅडम : (समजूत घालत) लौकरच! एनी टाइम!!.. का रे?
बेटा : (विचारपूर्वक) आय वॉज थिंकिंग...विपश्‍यनेला मी राज्याभिषेकापूर्वी जावं की राज्याभिषेकानंतर?
मम्मामॅडम : (खोल आवाजात) ओह गॉड...माझी बामची बाटली कुठाय?
-ब्रिटिश नंदी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com