जिवलग

आनंद अंतरकर
सोमवार, 2 जानेवारी 2017

मुंबईतली आमची पाच नंबर चाळ चारमजली होती. तिचा जिना लाकडी होता. या जिन्यात कलात्मकता काहीच नव्हती. नुसता सरळसोट घसरगुंडीसारखा आकार. झिजत चाललेल्या पायऱ्या आणि पावलं टाकताना होणारा धब्ब आवाज.

जिन्यांविषयी मला अपरंपार कौतुक आणि कुतूहल आहे. विशेषतः कुठलाही लाकडी जिना पाहिला की मला माझं चाळीतलं बालपण आठवतं.

मुंबईतली आमची पाच नंबर चाळ चारमजली होती. तिचा जिना लाकडी होता. या जिन्यात कलात्मकता काहीच नव्हती. नुसता सरळसोट घसरगुंडीसारखा आकार. झिजत चाललेल्या पायऱ्या आणि पावलं टाकताना होणारा धब्ब आवाज. लहानपणी आम्हा मित्रांचा बराचसा मुक्काम या जिन्यावर आणि जिन्याखाली असायचा. शेजारच्या राजाभाऊ काण्यांचं कोळशाचं चार फूट बाय चार फूट आकाराचं पसरट लाकडी खोकं जिन्याखाली कायम वस्तीला असे. ही जागा म्हणजे विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण झालेला एक उबदार आणि मनमिळाऊ निवारा होता. सुखाविषयी फार मोठ्या अपेक्षा नसल्या की माणूस किती समाधानी राहतो. सुख हे आपलं आपणच मिळवायचं असतं नि मानायचं असतं.

या जिन्याखालच्या ‘कॉटेज’मध्ये माझा दिवसाचा बराच काळ मुक्काम असे. त्या कार्बनी वातावरणातच आमचा शुद्ध ऑक्‍सिजन लपलेला होता. याच अर्धउजेडी जागी बसून मी माझा तुटपुंजा नि उनाड अभ्यास केला. इथंच कोळशाच्या खोक्‍याला टेकून मी ‘अरुण वाचनमाले’तले धडे नि कविता वाचल्या, पाटीवर गणितं सोडवली. रंगीबेरंगी पतंगांना कण्या बांधल्या. वर्गाच्या हस्तलिखित मासिकातला मजकूर लिहिला. चित्रं काढली. मित्रांसमवेत पत्त्यांचे डाव मी याच जिन्यातळी मांडले. खऱ्या अर्थानं ते माझे अतीव सुखाचे दिवस होते. वाचून न संपणाऱ्या पुस्तकासारखे. बालपण म्हणजे एका अर्थानं ईश्‍वरानंच माणसाला वाटलेले क्षण; आणि या विश्‍वाचं अंगण हे त्यानं लहानग्यांना दिलेलं आंदण आणि आमचं अंगण म्हणजे काय, तर हा जिन्याखालचा निरागस कोपरा.
काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध लेखक शं. ना. नवरे माझ्याकडे जेवायला आले होते. जेवण झाल्यावर शं. ना. कौतुकानं घरभर फिरून सारी रचना पाहत होते. लहान लहान गोष्टीचं त्यांना अप्रूप वाटत होतं. बोलता - बोलता आम्ही जिन्याजवळ आलो. शं. ना. पहिल्या पायरीपाशी थबकले नि मुग्ध होऊन जिन्याच्या पायऱ्यांकडे एकटक पाहू लागले. या पायऱ्यांसाठी मी जाड दोन इंची सागवानी लाकूड वापरलं होतं. लोखंडी उभ्या गजाचं रेलिंग आणि त्यावर हाताच्या आधारासाठी कातीव लाकडी पट्टी. 

‘‘चला, गच्चीवर जाऊ.’’ मी सुचवलं.
‘‘चला. मला आवडेल या जिन्यावरून वर चढायला.’’

आम्ही लॅंडिंगवर आलो. तिथल्या एका पायरीवर छोटा अभिराम बसून होता. जिन्यावरून चढा-उतरायचा खेळ त्याला नुकताच फार आवडू लागला होता. ते पाहून शं. ना. उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘हा जिना तर जीव लावणारा झालाच आहे, पण या छोट्या मुलाच्या बसण्यामुळे तुमचा जिना अधिक जिवंत नि लाघवी झाला आहे.’’
माझ्याकडे इंटिरिअर डिझाइनसाठी जमवलेली अनेक जाडजूड विदेशी पुस्तकं आहेत. त्यात जिन्यांचे शेकडो फॅन्सी नमुने छापलेले आहेत. पण मुंबईतला, माझ्या शैशवातला तो जिवलग जिना त्यात कुठून असणार?