आई हरवली! (पहाटपावलं )

ananda anterkar
ananda anterkar

माझ्या कुठल्याच वस्तूला कोणी हात लावलेलं मला आवडत नाही. अगदी छोट्या छोट्या वस्तूंपासून पुस्तकांपर्यंत सगळ्याच वस्तूंसाठी मी खूप "पझेसिव्ह' आहे. वस्तू हरवल्या की मी बेचैन होतो. एकदा माझ्या मित्रानं कॅमेरा मागितला. आठ दिवसांनंतर त्यानं कॅमरा परत केला, पाहतो तर त्याची लेन्सकॅप गायब! मित्राला त्याविषयी विचारणार, तेवढ्यात तो पाठ वळवून पसार झाला. मी नुसता चडफडत राहिलो. 
साधं पेनचं टोपण हरवलं, तरी माझं त्या पेनवरचं मन उडून जातं. मग ते पेन निराशेनं फेकून द्यायचं. परवाचीच गोष्ट. स्वामी परमहंस योगानंद यांचं "ऑटोबायग्राफी ऑफ अ योगी' हे पुस्तक वाचत होतो. पुस्तकाबरोबर छानसा बुकमार्क होता. थोडं थोडं वाचन होत असल्यामुळे पानांच्या मध्ये खूण घालून ठेवली होती. पण ती खूणच घरी कुठेतरी गळफटली होती. पृष्ठ क्रमांक आठवत नव्हता. जिवाची तगमग झाली आणि मग दुसऱ्या दिवशी संपलंच वाचन. स्वामी योगानंदांशी जमत आलेलं माझं नातं अकस्मातपणे संपलं. तुमच्या अंतःकरणाची मृतिका कितीही सुपीक आणि सर्जनशील असली, तरी काही नाती अकालीच मृत होतात, हेच तर त्या पानावर योगानंदांना सांगायचं नसेल? 
सुमारे पासष्ट वर्षांपूर्वीची मुंबईतली गोष्ट. माझं वय आठेक वर्षे. चौकात उभं राहून, येणाऱ्या जाणाऱ्या ट्राम्स निरखणं हा माझा छंद होता. "सिटी स्टोअर्स' नावाचं एक मोठं दुकान गिरगावात होतं. अनेक आकर्षक वस्तूंनी भरलेलं. स्टेशनरी, कटलरी, क्रोकरी, शालोपयोगी वस्तू, लॅंपशेड्‌स, खेळणी, सायकली, पेंडलच्या मोटारी, आकाशकंदिलाचे रंगीत कागद, देवादिकांच्या मूर्ती... काय म्हणाल ते! 
असाच एकदा आईचा हात धरून "सिटी स्टोअर्स'मध्ये गेलो. आईला भरतकामाचं साहित्य घ्यायचं होतं. ती दुकानभर फिरत होती, वस्तू बघत होती. मीही इकडे तिकडे बघत होतो. थोड्याच वेळात मला कंटाळा आला. मी दुकानाच्या पायऱ्या उतरलो आणि फुटपाथवरून ट्राम्सची वर्दळ न्याहाळू लागलो. 
काही वेळानं दुकानात गेलो, तर आई दिसेना. मी जाम घाबरलो. एव्हाना दुकानातील गर्दी वाढलेली. त्या गर्दीत आई हरवली असेल अशी शंकाही आली नाही. इकडे तिकडे जाऊन पाहिलं. आई दिसेना म्हणून रडवेला झालो. एकटाच खाली येऊन रडत राहिलो आणि अखेर आईच्या वियोगानं मुसमुसत, धडधडत्या काळजानं घरी आलो. अण्णा कामात होते. त्यांना रडतरडत व्याकुळ स्वरात वार्ता दिली, ""अण्णा, आपली आई हरवली!... दुकानातून ती निघून गेली... आई कुठे गेली असेल हो? आता ती घरी कशी येणार?'' आणि मी ढसाढसा रडू लागलो. 
अण्णा काही क्षण शांत राहिले आणि माझ्या डोक्‍यावरून हात फिरवत, मुलाचा आईविषयीचा कळवळा समजून घेत सांत्वनादाखल म्हणाले, ""अरे वेड्या, आई कशी हरवेल? ती नाही, तू हरवलास! ती येईलच बघ आता घरी.'' 
आणि खरंच ती माझ्या मागोमाग घरी आली. आता पाच वर्षांपूर्वी वयाच्या ब्याण्णव्या वर्षी माझी आई पुन्हा एकदा हरवली. अगदी कायमची. आता जगातल्या कुठल्या "सिटी स्टोअर्स'मध्ये ती मला सापडेल?  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com