अमूर्ताचा वास

अमूर्ताचा वास

गणपुले आला, तेव्हा माझ्या टीपॉयवर शंकर पळशीकरांवरचं सुंदर पुस्तक होतं. पळशीकर हे स्वातंत्र्योत्तर काळातले महान चित्रकार. प्रज्ञावंत, मुरब्बी शिक्षक नि तत्त्वज्ञ असलेल्या पळशीकरांनी भारतीय चित्रकलेला अपूर्व आयाम दिले. स्वतंत्र ओळख आणि उंचावरची दिशा दिली. गणपुलेनं ते पुस्तक उचललं नि चाळू लागला. तसा तो बऱ्यापैकी चित्रकलाप्रेमी. पुस्तकातली सहजास्वाद्य चित्रं पाहून तो आनंदून गेला. थोडी वरची पायरीही तो चढला; पण अमूर्त (abstract) चेहऱ्यावर मूर्त स्वरूपात दिसू लागला. काटकन्‌ झाडांची फांदी तोडल्यासारख्या स्वरात तो म्हणाला, ‘‘शंकर पळशीकर हे थोर चित्रकार, यात शंका नाही; पण त्यांची ॲब्स्ट्रॅक्‍ट शैलीतली चित्रं अजिबात समजत नाहीत. त्यांत काय बघायचं असतं? तुमचा तो ग्रेट पिकॅसो तसाच! काय दाखवायचं असतं त्याला चित्रांतून, तोच जाणे!...’’ 

खरंच काय असतं हे ‘ॲब्स्ट्रॅक्‍ट’ किंवा अमूर्त म्हणजे?विचार केला तर कळतं, की माणसाच्या जन्मापासूनच अमूर्ततेशी त्याचा परिचय असतो.  गर्भात असताना आधी तो कोण असतो? मांसाचा अमूर्त गोळा. नंतर कलेकलेनं त्याला हात, पाय, नाक, डोळे आदी अवयव फुटतात, तेव्हाच त्याची मूर्तता सिद्ध होते. पाण्याचा थेंब किंवा ओघळस ‘फिगर’ असलेलं काष्ठ, आकाश, डोंगररांगा अशा कितीतरी गोष्टींतून निसर्गतः अमूर्तता जन्मू शकते. माणसाच्या हातून निर्माण झालेली चित्रं, शिल्पं आणि कविता किंवा कथा-कादंबरी यांतली अमूर्तता आपल्याला ठाऊक आहे. समोरची प्रतिमा पाहताना तुमच्या जाणीव-नेणिवेत दुसरी एक काल्पनिक प्रतिमा निर्माण होते. आवश्‍यक नाही, की समोरच्या प्रतिमेशी ती सुसंगत असेल. त्या प्रतिमेत कवितेसारखे काही तुटक तुकडे ‘मोझॅक’सारखे तुमच्या मनात जुळत जातात आणि तिथं एक विसंगत आकृती उभी राहते. तुमची आत्मिक किंवा प्रतिभाशक्ती जितकी प्रगल्भ, एकाग्र आणि चिंतनशील असेल, त्यावर तुमचं अमूर्ताविषयीचं आकलन किंवा भान अवलंबून. ते मनात सतत भिरभिरत राहायला हवं. कवितेच्या आड एक कविता उभी असते. ती वाचता यायला हवी. त्या प्रतिबिंबित कवितेतला अर्थ शोधावा लागतो. केवळ बाहेरच्या शास्रीय ज्ञानातून किंवा सैद्धांतिक पुस्तकातून हे साध्य होत नाही. चित्रातली काय, कवितेतली काय किंवा इतर कलांतली काय-अमूर्तता हे एका अर्थी त्या त्या क्षणापुरतं अपूर्णत्वच असतं. पुढच्या वेळी ते वेगळ्या रूपात भेटतं. त्याच्या पुढच्या वेळी आणखी नव्या रूपात मनाला भिडतं आणि आपोआप तिथं स्वतःशीच संवाद सुरू होतो. त्याच्या पुढच्या वेळी त्याचा आकार, रूप, दर्शित्व, बोध आणखी बदललेला असतो आणि ही प्रक्रिया निरंतर घडत असते.  चित्रांमधल्या रंगांमधून साधलेली विरोधात्मकता किंवा रंगरेषांमधले अवकाश यांतूनही अमूर्तता साधली जाते. साहित्यात ‘between the lines`असा वाक्‌संप्रदाय आहे. त्यातही वाचनाची जाण असणं अभिप्रेत असतं. या वाचनतत्वालाही अमूर्त म्हणावं का? अखेर काय? अमूर्तता हे काही काँक्रीट सत्य नव्हे; पण तशा माणसाच्या जीवनातही पुष्कळशा गोष्टी सत्यापलापी असतातच की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com