क्रीडासंस्कृतीच्या विकासाचे ‘लक्ष्य’ 

अंजली भागवत(आंतरराष्ट्रीय नेमबाज)
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

केंद्रीय मंत्रिमंडळात नुकत्याच झालेल्या फेरबदलात क्रीडाजगताच्या दृष्टीने एक अनोखी घटना घडली. नेमबाज आणि ऑलिंपिक रौप्यपदक विजेते मेजर राज्यवर्धनसिंह राठोड यांच्याकडे क्रीडा खात्याची सूत्रे सोपविण्यात आली. एखादा खेळाडू वा क्रीडा जाणकाराने क्रीडामंत्रिपद भूषवावे, हे इतकी वर्षे क्रीडा क्षेत्राने पाहिलेले स्वप्न यामुळे प्रत्यक्षात आले. शिस्त, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर राठोड यांनी पदार्पणातच ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. आता त्यांच्याकडे क्रीडा खाते आल्याने क्रीडाजगताच्या आशा उंचावल्या तर आहेतच, पण खेळाडूंना न्याय मिळेल असा विश्‍वासही वाटत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात नुकत्याच झालेल्या फेरबदलात क्रीडाजगताच्या दृष्टीने एक अनोखी घटना घडली. नेमबाज आणि ऑलिंपिक रौप्यपदक विजेते मेजर राज्यवर्धनसिंह राठोड यांच्याकडे क्रीडा खात्याची सूत्रे सोपविण्यात आली. एखादा खेळाडू वा क्रीडा जाणकाराने क्रीडामंत्रिपद भूषवावे, हे इतकी वर्षे क्रीडा क्षेत्राने पाहिलेले स्वप्न यामुळे प्रत्यक्षात आले. शिस्त, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर राठोड यांनी पदार्पणातच ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला. आता त्यांच्याकडे क्रीडा खाते आल्याने क्रीडाजगताच्या आशा उंचावल्या तर आहेतच, पण खेळाडूंना न्याय मिळेल असा विश्‍वासही वाटत आहे.  ऑलिंपिकपर्यंत पोहोचण्यासाठी खेळाडूला किती मेहनत घ्यावी लागते, ऑलिंपिकपर्यंतच्या प्रवासासाठी किंवा कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी काय आवश्‍यक आहे, याची कल्पना त्यांना स्वतःला असल्याने त्याचा या खात्याला निश्‍चितच लाभ होईल. ‘क्रीडा पदाधिकारी म्हणजे केवळ प्रशासक ही मानसिकता बदला आणि खेळाडूंना त्यांच्या नजरेतून पाहा,’ हा ‘साई’च्या पहिल्याच भेटीत त्यांनी दिलेला संदेश त्यांच्या धोरणाची दिशा काय असेल याची कल्पना येण्यास पुरेसा आहे.

आपल्या देशातील क्रीडा सुविधांची गरज, अर्थसाह्य, पूरक सुविधा, क्रीडा साहित्य यांचा तुटवडा हे सगळे प्रश्‍न आजही आ वासून उभे आहेत. खेळाला म्हणावे तेवढे प्राधान्य दिले जात नाही. काही खेळाडू अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. काहींचे यश अद्यापही उपेक्षित आहे. प्रत्येक राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारानंतर वाद होतच आहेत. कित्येक खेळांच्या दोन दोन संघटना आहेत आणि त्यांच्यातील हेवेदावे शिगेला पोचले आहेत. काही खेळात भरभरून पैसा आहे, तर काही खेळ देशी असूनही उपेक्षित आहेत. क्रीडा संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यात संवादाचा अभाव आहे. परिणामी यात खेळाडूच भरडला जातो. भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ऑलिंपिक संघटना अजूनही खेळाडूंचा विश्‍वास संपादन करू शकलेले नाहीत. हा समस्यांचा चक्रव्यूह भेदण्याची क्षमता राठोड यांच्याकडे आहे यात शंकाच नाही; पण त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देणे आवश्‍यक आहे. इतकी वर्षे मुरलेली यंत्रणा आणि निर्ढावलेली मानसिकता एका फटक्‍यात बदलणे अशक्‍य आहे. त्यामुळे ही यंत्रणा बदलण्यासाठी त्यांना सहकार्य केले, पुरेसा वेळ दिला, तर बदलाला चालना मिळू शकेल. त्यासाठी खेळाडूंनीही त्यांना साथ द्यायला हवी.  

सर्वप्रथम खेळाबाबतची ध्येय-धोरणे चांगल्या प्रकारे निश्‍चित करणे गरजेचे आहे आणि हेच नव्या क्रीडामंत्र्यांचे महत्त्वाचे काम असेल. त्यात पारदर्शकताही हवी. आतापर्यंत आपण ऑलिंपिकवर किंवा ऑलिंपिकच्या पूर्वतयारीवर खूप खर्च केला. पण तो कुठे, कधी आणि कोणावर हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. हे प्रश्‍न खेळाडू या नात्याने राठोड यांना नक्कीच सोडवता येतील. आतापर्यंत आपल्या समाजात ऑलिंपिक हेच अंतिम ध्येय असे समजले जाते. पण खऱ्या खेळाडूला माहिती असते, की ऑलिंपिकसारखीच राज्य स्पर्धाही महत्त्वाची असते आणि राष्ट्रीय स्पर्धेलाही तितकेच महत्त्व असते. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी जागतिक स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाही तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे या सगळ्यांकडे तशा दृष्टिकोनातून बघणे, त्यासाठी तेवढीच तयारी करणे गरजेचे आहे. याच पायऱ्या चढून नंतर ऑलिंपिकपर्यंत पोचता येते याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष केले आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिकच्या या मधल्या पायऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत. ऑलिंपिकपर्यंत पोचण्यासाठी कुठल्या-कुठल्या स्पर्धा खेळाव्या लागल्या, याची कल्पना राठोड यांना स्वतःलाही आहे. त्यामुळे आता फक्त ऑलिंपिकच नाही, तर प्रत्येक वर्षी होणाऱ्या सगळ्याच स्पर्धांकडे तेवढेच लक्ष पुरवले जाईल, प्रत्येकाला समान संधी मिळेल, प्रत्येकाला समान साह्य मिळेल. खेळ हा फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर नाही, तर तो पहिल्यांदा आपल्या रक्तात रुजायला हवा आणि आपली ती संस्कृती व्हायला हवी यासाठी ते प्रयत्न करतील. या सर्वांची जाणीव खेळाडू या नात्याने राठोड यांना नक्कीच असणार आणि त्यादृष्टीने त्यांनी आपल्या ‘खेळी’ची सुरवात करावी अशी अपेक्षा आहे.  

राठोड यांना क्रीडा क्षेत्रात मिळालेले यश, त्यांना लष्करात लाभलेले प्रशिक्षण, त्यामुळे अंगी बाणलेली शिस्त, नेतृत्वाचे गुण याच्या बळावर त्यांच्या क्रीडामंत्रिपदाच्या काळात भारतीय खेळांना ‘अच्छे दिन’ येतील अशी आशा आहे.