जास्वंदीच्या रंगांतील गूढरंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नजरेत भरणारा रंग आणि पाच पाकळ्यांनी मनोहारी बनलेल्या जास्वंदीच्या फुलाचं बाह्यरूप आकर्षक तर आहेच, पण या फुलाला वैद्यकशास्त्रातही बरंच महत्त्व आहे. प्रयोगशाळांमध्ये जास्वंदीचं फूल व तिच्या वनस्पतीविषयी सखोल आंतरविद्याशाखीय संशोधन सुरू आहे...

जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच आपल्याला हे फूल अनेक घरांच्या सभोवताली दिसून येईल. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानात उठून दिसतात. जास्वंदीच्या एक हजार सूक्ष्म रंगच्छटा आहेत!

नजरेत भरणारा रंग आणि पाच पाकळ्यांनी मनोहारी बनलेल्या या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक आहे. कुणाला ते ट्रम्पेट वाद्याप्रमाणे भासेल, तर कुणाला आवाज बहुगुणीत करणारा कर्णा वाटेल. मधमाश्‍या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते. सहा हजार वर्षांपूर्वी या वनस्पतीचे वास्तव्य फक्त आफ्रिकेत असे. पण आता ती उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील अनेक देशांमध्ये दिसून येते. चीन, थायलंड, भारत, इजिप्त, सेनेगल, जमैका, घाना, मेक्‍सिको आदी देशांमध्ये या वनस्पतीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या फुलाला जासुम, जवाकुसुम, रोझेला, जमेका सॉरेल अशी नावे आहेत. "शू-फ्लॉवर' असंही एक नाव आहे. कारण याची फुले काळ्या चामडीच्या बुटांवर घासली तर पॉलिश केल्याप्रमाणे बूट चकाकतात. जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात. उंच वाढणाऱ्यांत "हिबिस्कस कॅनाबिनस' असून, ते त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर सेल्युलोजयुक्त कर्बोदके असलेल्या या वनस्पतीला "केनाफ' म्हणतात आणि कागदनिर्मितीच्या उद्योगात तो एक महत्त्वपूर्ण कच्चा माल आहे. आपण सामान्यतः झुडूपवर्गीय प्रकार पाहतो. काही प्रकारांमधील फुलांना मंद सुगंध असतो. तागाच्या वनस्पतीचे जसे तंतू निघतात, त्याप्रमाणे "हिबिस्क्‍स सब्दारिफा' या वाणाचेही शोभिवंत धागे निघतात. काही देशांमध्ये त्याचा स्कर्ट बनवतात. तसेच धाग्यांचा उपयोग विग (टोप) बनविण्याकरितादेखील केला जातो.

इंग्रजीतील "हिबिस्कस' हे नाव मात्र त्या नाजूक फुलावर अन्याय करणारे आहे. अर्थात, नाव काहीही असले तरी जास्वंदीच्या फुलांचे किंवा एकूणच या वनस्पतीचे सखोल आंतरविद्याशाखीय संशोधन जगातील काही प्रयोगशाळांमध्ये चालू आहे. जास्वंदीला देशोदेशीच्या वैद्यकशास्त्रात बरेच महत्त्व प्राप्त झालंय. तथापि, अजूनही वैद्यकीय ज्ञान बहुतांशी अनुभवजन्य किंवा पारंपरिक आहे. फुलांचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. त्यामुळे शाम्पूमध्ये एक घटक म्हणून पाना-फुलांच्या अर्काचा समावेश होतो. इजिप्तमध्ये ते लघवी साफ होण्यासाठी डाययुरेटिक (मूत्रल) म्हणून वापरतात. इराणमधील वैद्य रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक घटक म्हणून त्याचा वापर करतात. ही वनस्पती एक सौम्य रेचक म्हणूनही उपयोगात येते. नायजेरियात पोट साफ करण्यासाठी, तर काही देशांमध्ये चक्क भाजी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अनेक महिला फुलांमधील नानाविध रंग सरबतांसाठी किंवा जाम-जेलीसारख्या खाद्यपदार्थांमध्येही वापरतात. काही फुलांचा रंग उकळत्या पाण्यात बाहेर पडतो. मेक्‍सिकोमध्ये तर जास्वंदीच्या वाळलेल्या फुलांपासून एक चविष्ट खाद्यपदार्थ तयार केला जातो.

जास्वंदाचा समावेश असलेल्या चहाच्या डिप-डिप पुड्या हा एक फार मोठी जागतिक बाजारपेठ लाभलेला व्यवसाय आहे. चहाला लालसर किंवा पिवळसर रंग प्राप्त व्हावा म्हणून वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो. याचे रंगीत पेय हे शीत किंवा गरम पेय म्हणून वापरता येतं. या गरम पेयामार्फत सूक्ष्म प्रमाणात लोह, ताम्र, जस्त (झिंक), जीवनसत्त्व ब-1, ब-2 आणि क शरीराला मिळू शकते. या पेयाच्या सेवनामुळे अपायकारक लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल कमी होते आणि हितकारक हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल वाढते. तसेच रक्तशर्करा, रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. हे पेय पाचक आहे. ज्याला तीव्र उदासीनतेची बाधा झाली आहे, त्यांच्यासाठी जास्वंदयुक्त चहा गुणकारी असल्याचे निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत. जास्वंदीच्या फुलांचे असे काही गुणधर्म आधीपासूनच माहिती झालेले असले, तरी त्यासंबंधीचे सखोल संशोधन चालूच असते. चहाला लाल किंवा पिवळसर रंग येण्याचे कारण म्हणजे त्यात फ्ल्याओनाईड, डेल्फिनिडिन, सायनिडिन, अन्थोसायनिंस ही सेंद्रिय द्रव्ये आहेत. शरीरातच तयार होणारी फ्री-राडिकलवर्गीय रसायने निष्प्रभ करणे गरजेचे असते. त्याकरिता हिबिस्कसच्या चहात जे प्रोटोकॅटेचुइक आम्ल असते, ते एन्टी-ऑक्‍सिडन्ट म्हणून उत्तम कार्य करते.
दुर्गापूरला "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी' आहे. तेथील संशोधकांनी "स्पेक्‍ट्रोकेमिका एक्‍टा' नियतकालिकात एक शोधनिबंध प्रकाशित केलाय. त्यावरून जास्वंदीच्या पानांचं महत्त्व जगाच्या लक्षात येईल.

भौतिकीशास्त्रामध्ये फोटॉनिक्‍स, ऑप्टो-इलेक्‍टॉनिक्‍स किंवा ऑप्टिक्‍स (प्रकाशकी) या शाखांचं महत्त्व वाढत आहे. ऑप्टिकल फायबरमार्फत टेलिकम्युनिकेशन, माहिती-तंत्रज्ञान संकलन, होलोग्राफी, रोबोटिक्‍स, शस्त्रक्रिया (उदाहरणार्थ डोळ्यांचा नंबर कमी करणे) अशा अनेक उपयोगांसाठी त्याचा थेट संबंध आहे. त्यासाठी लागणाऱ्या अनेक उपकरणांमध्ये प्रकाशाचा विशिष्ट वक्रीभवनांक (नॉन-लिनिअर रिफ्रॅक्‍टिव्ह इंडेक्‍स) असलेले रंगद्रव्य आवश्‍यक असते. सध्या त्यासाठी कृत्रिम असेंद्रिय रसायनं वापरली जात आहेत. पण ती यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी उच्च क्षमतेच्या महागड्या लेसर किरणांची आवश्‍यकता असते. हा अडथळा दूर करण्यासाठी योग्य अशाच वक्रीभवनांकाचं स्वस्त, पण मस्त असे "मटेरियल' जास्वंदीच्या पानांनी आपल्याला क्‍लोरोफिल आणि कॅरोटेनॉईडच्या स्वरूपात रंगद्रव्ये प्राप्त करून दिली आहेत. थोडक्‍यात, म्हणजे जास्वंदीच्या रंगात अनंतरंगांचं भांडार आहे!