समाजव्रताची दीडशे वर्षे

पुणे प्रार्थना समाजाची वास्तू.
पुणे प्रार्थना समाजाची वास्तू.

‘पुणे प्रार्थना समाज’ चार आणि पाच डिसेंबर रोजी शतकोत्तरी सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. त्यानिमित्ताने तरुण पिढीशी संवाद साधण्याचा संकल्प संस्थेने सोडला आहे. त्यासाठी काय करायला हवे, याचेच विचारमंथन त्यांच्या ऑनलाईन परिषदेत होणार आहे. त्यानिमित्त.

लहान मुलांच्या कार्यशाळेत गोष्ट सांगण्यासाठी मी प्रथम ‘हरिमंदिर’ येथे गेले, तेव्हा त्या सुंदर, शांत, साध्या; परंतु प्रशस्त सभागृहात प्रवेश केल्याकेल्याच त्याच्या वेगळेपणाची, ऐतिहासिकतेची जाणीव झाली. ‘हरिमंदिर’ म्हणजे पासोड्या विठोबाजवळ असलेली ‘पुणे प्रार्थना समाजा’ची दीडशे वर्षांचा वारसा असलेली वास्तू. नुसती वास्तू नाही, समाजमंदिर! न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाजाला दिलेल्या सुमारे सतराशे चौरस मीटर जमिनीवर ही वास्तू उभी आहे. हरिमंदिर उभारणीचे काम डॉ. रा. गो. भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले. त्यासाठी राजर्षी शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांनीही आर्थिक पाठबळ दिले होते.

इंग्रजी शिक्षणाचे वारे वाहू लागल्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जो सुशिक्षित वर्ग उदयाला आला, त्यांना आपल्या धर्मातील, समाजातील अनिष्ट रूढीपरंपरा, जातिभेद, स्त्रियांना मिळणारी वागणूक, कर्मकांडाचे स्तोम इत्यादी हिणकस भाग दूर करण्याची निकड वाटू लागली. त्यातूनच प्रार्थना समाजासारखी धर्मसुधारणेची चळवळ उभी राहिली. मुंबईत ३१ मार्च १८६७ रोजी प्रार्थना समाजाची स्थापना झाली. लगेचच १८७०मध्ये पुणे; तसेच नगर, सातारा येथे त्याच्या शाखा निघाल्या. पुढे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही प्रार्थना समाजाचा पुष्कळ प्रसार झाला, हा भाग इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून आपल्याला माहीत झालेला असतो. न्या. रानडे आणि डॉ. रा. गो. भांडारकर यांच्याशिवाय प्रार्थना समाजाशी निगडित दादोबा पांडुरंग आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, गुरुवर्य बाबुराव जगताप ही नावेही माहीत असतात; पण आजही निरलसपणाने, गाजावाजा न करता प्रार्थना समाजाचे कार्य चालू आहे, हे अनेकांना माहिती नसेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुद्धिप्रामाण्यवाद आणि आंतरिक श्रद्धा
एका बाजूला बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि दुसऱ्या बाजूला सर्व आचार-विचारांना सद्भावनेची, आंतरिक श्रद्धेची जोड हे प्रार्थना समाजाचे वैशिष्ट्य. ही बैठक प्रा. डॉ दिलीप जोग आणि डॉ. सुषमा जोग या आजच्या पदाधिकाऱ्यांनी अजूनही कायम ठेवली आहे. ते त्यांच्या उपासनेच्या वेळी केलेल्या निरूपणात दिसून येते; तसेच छोट्या मुलांसाठी घेतलेल्या कार्यक्रमांच्या बारीक-सारीक तपशीलातही दिसते. निराकार परमेश्वराचे स्वरूप समजावून सांगताना भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ.जोग विज्ञानाने सांगितलेल्या पाण्याच्या गुणधर्मांचा आणि अवस्थांचा दाखला देतात. मुलांच्या शिबिरात प्रार्थनेबरोबर गाणी, गोष्टी, खेळ, वैज्ञानिक प्रकल्प आणि प्रयोगांचाही समावेश असतो.

संस्थेचे महत्त्व आजही
दीडशे वर्षांच्या कालावधीत प्रार्थना समाजाने हाती घेतलेल्या काही सुधारणा प्रत्यक्षात उतरल्या, काही उद्दिष्टे अजूनही साध्य व्हायची आहेत. बदलत्या  काळानुसार काही नवी आव्हाने समोर उभी राहत आहेत. या काळात कितीतरी राजकीय, सामाजिक स्थित्यंतरे झाली. जातिभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री- पुरुष समानता, शिक्षण, समाजकल्याण यासाठी काम करणाऱ्या इतर अनेक संस्था स्थापन झाल्या, पुढे आल्या. मग आता या बदललेल्या परिस्थितीत प्रार्थना समाजाची आवश्‍यकता काय आहे, असा प्रश्‍न पडू शकतो. त्याला न्यायमूर्ती रानडे यांनी फार सुंदर उत्तर पूर्वीच देऊन ठेवले आहे. त्याचा कालानुरूप संदर्भ थोडा वेगळा असला तरी आजही ते तितकेच चपखल वाटते. त्याचा थोडक्‍यात गोषवारा असा: ‘हिंदू धर्मसुधारणेसाठी इतके पंथ अस्तित्वात असताना प्रार्थना समाजाची गरज काय?‘ याचे उत्तर देताना न्यायमूर्तींनी तीन दृष्टांत दिले.

गंगेला अनेक प्रवाह मिळाल्यानंतर जसे तिचे एक विस्तीर्ण वाहते पात्र बनते, केळीच्या झाडाला जशी एका मागोमाग एक मोठी पाने आल्याने ते सतेज, जोमदार राहते, वडाच्या पारंब्या जमिनीत रुजून मग जसा विस्तीर्ण वटवृक्ष होतो, त्याचप्रमाणे धर्मविचारातही सतत नवीन प्रवाहांची, नव्या धुमाऱ्यांची आवश्‍यकता असते... नव्या सुधारणा, नव्या व्यवस्था आणण्याची गरज ओळखणे, त्या विचारांचे स्फुल्लिंग जागवणे हेच प्रार्थना समाजाचे कार्य. ते सर्व काम एकाच वेळी सिद्धीस जाईल न जाईल, पण पुढच्या पिढ्यांसाठी त्या विचारांची ठिणगी जागृत ठेवणे महत्त्वाचे. ’ ( न्या. रानडे यांची धर्मपर व्याख्याने. संकलनः रमाबाई रानडे, रिया पब्लिकेशन्स) विविध विचारप्रवाहांचा स्वीकार, नावीन्याचे स्वागत, सर्वांच्या कल्याणाची इच्छा आणि प्रतिकूल परिस्थितीतही टिकवलेला आशावाद अशा कितीतरी गोष्टी या उत्तरात सामावल्या आहेत. त्यांची गरज तर आज कधी नव्हे इतकी भासते आहे. 

सध्याच्या सामाजिक आणि राजकीय रणधुमाळीत विज्ञान आणि मूल्यसंस्कार या दोन्हींचा आधार घेणारे प्रार्थना समाजाचे विचार किती प्रभावी ठरतील, त्यासाठी काय करायला हवे, अशा प्रश्नांची उत्तरे आत्तातरी अंधुकच आहेत. पुणे प्रार्थना समाज चार आणि पाच डिसेंबर रोजी शतकोत्तरी सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. त्यानिमित्ताने तरुण पिढीशी संवाद साधण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. त्यासाठी काय करायला हवे, याचेच विचारमंथन त्यांच्या आॅनलाईन परिषदेत होणार आहे, ही बाब त्यादृष्टीने खूपच स्वागतार्ह वाटते.

प्रार्थना समाजाची प्रमुख वैशिष्ट्ये 

  • विविध विचारप्रवाहांचा  स्वीकार
  • धर्मविचारांचे प्रवाहीपण
  • नावीन्याचे मनापासून स्वागत 
  • सर्वांच्या कल्याणाची इच्छा 
  • प्रतिकूल परिस्थितीतही टिकविलेला आशावाद

(लेखिका शिक्षणक्रमाच्या अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com