आठवणींचे स्थलांतरित पक्षी

अरुण मांडे
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

माझं गाव सावखेड. नगर-औरंगाबाद रोडवर ढोरेगाव फाट्यापासून आतमध्ये पंचवीस-तीस मैलांवर गोदावरीच्या काठावर आहे. आहे म्हणण्यापेक्षा होतं. पावसाळ्यात आमच्या गावावर चाळीस फूट पाणी असतं. दोन वर्षं पाऊस नव्हता, तेव्हा जुनं गाव उघडं पडलं. चुलत भाऊ म्हणाला, "चल, येतोस का बघायला.' पण मी गेलो नाही. बघायला तिथं आहे काय! आमचा चाळीस बळदांचा वाडा नाही. गंगेच्या पात्रात (आम्ही गोदावरीला गंगा म्हणतो) आमच्या कुलदैवत नृसिंहाचं स्वयंभू मूर्ती असलेलं मंदिर नाही. मंदिराला लागून पात्रात उड्या मारायचा बुरुज नाही. नृसिंहजयंतीचा उत्सव नाही. गंगेच्या पात्रामध्ये सुसर नाही.

माझं गाव सावखेड. नगर-औरंगाबाद रोडवर ढोरेगाव फाट्यापासून आतमध्ये पंचवीस-तीस मैलांवर गोदावरीच्या काठावर आहे. आहे म्हणण्यापेक्षा होतं. पावसाळ्यात आमच्या गावावर चाळीस फूट पाणी असतं. दोन वर्षं पाऊस नव्हता, तेव्हा जुनं गाव उघडं पडलं. चुलत भाऊ म्हणाला, "चल, येतोस का बघायला.' पण मी गेलो नाही. बघायला तिथं आहे काय! आमचा चाळीस बळदांचा वाडा नाही. गंगेच्या पात्रात (आम्ही गोदावरीला गंगा म्हणतो) आमच्या कुलदैवत नृसिंहाचं स्वयंभू मूर्ती असलेलं मंदिर नाही. मंदिराला लागून पात्रात उड्या मारायचा बुरुज नाही. नृसिंहजयंतीचा उत्सव नाही. गंगेच्या पात्रामध्ये सुसर नाही. घाटापासून मंदिरापर्यंत नेण्यासाठी लाकडी घोड्याचं तोंड असलेली नाव नाही. बेटावरच्या जंगलात नीलगायी नाहीत. मोर नाहीत. उन्हाळ्यात पात्र उघडं पडलं, की शेतकऱ्यांनी लावलेल्या टरबुजाच्या वाड्या नाहीत. मग जायचं तरी कशाला?

नवीन सावखेड गंगेच्या काठीच आहे. पण गावाला गावपण नाही. नृसिंहाचं मंदिर आहे; पण स्वयंभू मूर्ती नाही. नुसतेच पितळी मुखवटे. मी तर आता नृसिंहजयंतीलासुद्धा जात नाही; पण एकेवर्षी उन्हाळ्यात भावानं आग्रह केला. गेलो. त्याला म्हणालो, ""चल, आलोय तर गंगेच्या काठापर्यंत जाऊ.'' पात्रापर्यंत जायला कच्च्या रस्त्यानं कारनं निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला टरबूज-खरबुजाच्या वाड्या दिसल्या. बरं वाटलं.

काठावरच चक्रधरस्वामीचं मंदिर आहे. उन्हाळा असूनही गंगेचं पात्र बऱ्यापैकी रुंद होतं. पात्राच्या ऐन मध्ये आणखी एक मंदिर होतं; पण त्याची नुसती गच्ची दिसत होती. पलीकडच्या काठावरचे पक्षी हालचाल करताना दिसत होते. आकारानं मोठे होते. फ्लेमिंगो तर नाहीत?
काठावर होडी नांगरून पडली होती. भावानं नावाडी शोधला. आम्ही त्यात बसलो. नावाड्यानं होडी वल्हवायला सुरवात केली. मावळतीचा लालभडक सूर्य पाण्यावर तरंगत होता आणि क्षितिजापासून पक्ष्यांचा एक थवा संथपणे उडत आमच्या दिशेने येत होता. इतक्‍या दुरूनही त्यांच्या लांब मानेमुळे, चोचीमुळे आणि काळ्या रंगामुळे ते लिटिल कार्मोरंट आहेत हे लक्षात आलं. मोजले तर साठ भरले. आमच्या डोक्‍यावरून ते जायकवाडीच्या धरणाच्या दिशेनं गेले. ते दिसेनासे होत नाहीत, तोच पश्‍चिमेकडून आणखी एक थवा आला. मग आणखी एक. आकाशात काळ्या रंगाच्या लाटामागून लाटा येत होत्या. मी अवाक्‌ होऊन बघत होतो.

पाण्यातल्या मंदिरापाशी आलो. थेट त्याच्या गच्चीवर उतरलो. समोर रामडोहच्या काठावर बघितलं तर गुलाबी पायाचे, गुलाबी पंखाचे फ्लेमिंगो. तीस-चाळीस तरी असतील. काही चमच्याच्या आकाराच्या चोचीचे स्पूनबिल होते. चार-पाच पेंटेड स्टॉर्क, चित्रबलाक, पिनटेल, डॅबचिक, शेकाट्या, पांढऱ्या मानेचे काळ्या पंखाचे करकोचे. बहुधा चार-सहा चक्रवाकही होते. पक्ष्यांची रेलचेल दिसत होती. पाण्यातलं हे मंदिर म्हणजे पूर्वीच्या नृसिंहाच्या मंदिराजवळच्या चिंचकपाट नावाचं चिंचबन होतं. इथंच चक्रधरस्वामींनी पहिल्यावहिल्या शिष्याला दीक्षा दिली.

पाण्याखाली असलं म्हणून काय झालं, मला माझं बालपणीतलं सावखेड भेटलं. माझ्या आठवणींच्या स्थलांतरित पक्ष्यांना जुनं घरटं सापडलं होतं.