ही तर झुंडशाही

arvind kejriwal
arvind kejriwal

राजधानी दिल्लीतील "आप'चे सरकार गेल्या तीन वर्षांत दिल्ली सरकारच्या कामगिरीऐवजी या ना त्या कारणाने उद्‌भवलेल्या वादांमुळेच जास्त चर्चेत राहिले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत "आप'च्या आमदाराने मुख्य सचिवांनाच मारहाण केल्याची तक्रार हा या वादमालिकेतील ताजा प्रसंग.

मुख्य सचिव अंशू प्रकाश यांनी नायब राज्यपालांकडे तशी तक्रार केल्याने या वादाचे गांभीर्य वाढले आहे. आता "आप'चे आमदार अमानतुल्ला खान आणि "अन्य' यांच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल झाले आहेत आणि आरोप-प्रत्यारोपांची राजकीय चिखलफेक रंगात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री एवढ्या दीर्घकाळ चर्चा सुरू होती म्हणजे लोकहिताच्या कोणत्या तरी जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर चर्चा असणार, असेच "आप'चा एकूण आविर्भाव पाहता कोणालाही वाटेल; परंतु या बैठकीचा मुख्य "अजेंडा' सरकारचे रखडलेले प्रसिद्धी अभियान हा होता, असे कळते. बैठकीत कोणत्या मुद्द्यावर "आप'चे आमदार भडकले, याचा नेमका तपशील उघड झालेला नाही, याचे कारण याविषयी वेगवेगळी माहिती दिली जात आहे. या बैठकीत प्रकाश यांनी जातीय टिप्पणी केल्याचा आणि त्यांना भाजपची फूस असल्याचा "आप'चे पदाधिकारी आणि आमदारांचा आरोप आहे.

"आप'च्या काही कार्यकर्त्यांचे म्हणणे असे, की स्वस्त धान्य वितरणाच्या प्रक्रियेत "आधार'च्या अटीमुळे विलंब होत असल्याबद्दल ही बैठक होती. हा दावा खरा मानला तरी तेथे झालेल्या हाणामारीचे समर्थन होऊ शकत नाही. या वादाचे पडसाद दुसऱ्या दिवशी सचिवालयातही उमटले. तिथे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हात उगारल्याची तक्रार मंत्री इम्रान हुसेन; तसेच "दिल्ली डायलॉग कमिशन'चे उपाध्यक्ष आशिष खेतान यांनी केली आहे. या कथित हल्ल्याची चित्रफीतही "सोशल मीडिया'वर फिरत आहे. एकूण हा सगळाच प्रकार आपल्या लोकशाहीविषयी चिंता वाढविणारा आहे. सनदी नोकरशाही आणि राजकीय नेतृत्व यांच्यात तणावाचे प्रसंग नवे नाहीत; पण थेट अंगावर धावून जाण्यापर्यंत मजल गाठणे हे लोकशाहीचे अधःपतन म्हणावे लागेल. त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा होईल.

राजकारणात काही नवी संस्कृती आणण्याचा दावा करणाऱ्या पक्षाकडून तर हे अजिबातच अपेक्षित नाही. मारहाण झालीच नसल्याचा कांगावा आता सुरू आहे; परंतु वैद्यकीय अहवालात प्रकाश यांच्या अंगावर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. ही कसली नवी राजकीय संस्कृती?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com