यश हेच ‘लक्ष्य’

यश हेच ‘लक्ष्य’

आशियाई कुमार बॅडमिंटन स्पर्धेतील लक्ष्य सेनचे विजेतेपद अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. तब्बल पन्नास वर्षांनी हे विजेतेपद भारतीय मुलाने जिंकले; पण त्यापेक्षाही एखाद्या खेळाडूची गुणवत्ता लवकर जोखली, त्याच्या शारीरिक वाढीचा खेळाच्या मार्गदर्शनाच्या वेळी विचार केला, त्याला त्याच्यापेक्षा वरिष्ठ वयोगटात खेळण्याची संधी दिली, तर आंतरराष्ट्रीय यश अशक्‍य नसते, हेच लक्ष्यच्या यशातून दिसते. त्याला गेल्या काही वर्षांत जबरदस्त आंतरराष्ट्रीय अनुभव मिळाला होता. त्याचा पुरेपूर फायदा आताच्या आशियाई स्पर्धेत झाला. ‘लक्ष्य कधीही डगमगत नाही. सामन्यातील मोक्‍याच्या वेळी तो वेगळा विचार करतो आणि तो अमलातही आणतो. अनेक गोष्टी तो चटकन आत्मसात करतो. बॅडमिंटनमध्ये हे महत्त्वाचे असते,’ लक्ष्यच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या सायली गोखलेंचे हे मत त्याच्याकडून अपेक्षा उंचावते. वडील क्रीडा प्राधिकरणात बॅडमिंटन मार्गदर्शक, त्यामुळे सहाव्या वर्षी लक्ष्यच्या हाती बॅडमिंटनची रॅकेट आली, त्यात नवल काहीच नव्हते. नऊ वर्षांचा असताना त्याने गुंटूरमधील दहा वर्षांखालील मुलांची स्पर्धा जिंकली आणि मग बॅडमिंटन केवळ छंद न राहता त्याचे पॅशन झाले. दहा वर्षांचा असताना तो बंगळूरच्या पंधरा वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेत सहभागी झाला. कामगिरी प्रभावी झाली नाही; पण त्याला विमलकुमार यांच्या पारखी नजरेने हेरले. तीन वर्षांतच विम्बल्डनमध्ये त्याने १९ वर्षांखालील स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय यश हे नावीन्य राहिले नाही. देशांतर्गत स्पर्धेत वयोगटातील आव्हान काहीसे सोपे झाल्याने त्याने वरिष्ठ स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरवात केली. राष्ट्रीय स्पर्धा इतिहासातील सर्वात लहान उपविजेता होण्याचा मान त्याने मिळविला. आपल्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठ्या असलेल्या सौरभ वर्माकडून त्या वेळी तो हरला. पण, हा अनुभव त्याला खूप काही शिकविणारा ठरला. आशियाई, थॉमस उबेर बॅडमिंटन स्पर्धांच्या निमित्ताने मिळालेल्या अनुभवातून त्याने एक पाऊल पुढे टाकले. सतत शटलवर झेपावणे, त्यासाठी स्लाइड करणे ही लक्ष्यची खासीयत; पण त्यामुळेच त्याच्या दुखापतीचे प्रमाण वाढत आहे. तेव्हा त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेवटी खेळ म्हटले, की तंदुरुस्ती महत्त्वाची. त्यात तो कनिष्ठ गटातून वरिष्ठ गटात खेळत आहे. झटपट शिकण्याच्या सवयीने तो अनुभवाने प्रगल्भ झाला असे म्हणता येईल, त्यामुळेच भविष्यात त्याच्याकडून नक्कीच उज्ज्वल यशाची आशा बाळगता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com