Bharat Sasne write about social issue
Bharat Sasne write about social issue

सामान्य माणसाचा हरवलेला चेहरा! 

"काळ तर मोठा कठीण आला' असं समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि भविष्यवेत्तेसुद्धा आपल्याला सांगत आहेत. "बोलण्याचं स्वातंत्र्य' असलं तरी बोलू दिलं जातं आहे का, असा प्रश्‍नही विचारण्यात येतोय. सहिष्णुतेबद्दलही बोललं जातं आहे. परिस्थितीच्या रेट्यात, सर्वदूर पसरलेला हा जो सामान्य माणूस आहे तो नेमका कुठे आणि कशा परिस्थितीत आहे, हे इतरांप्रमाणे साहित्यानेसुद्धा तपासत राहावं, अशी आपली अपेक्षा असते. 

थोडा आधीचा काळ आठवायचा झाला, तर 1930 च्या आधीच उर्दू भाषेत पुरोगामी सुधारणावाद्यांची एक चळवळ अस्तित्वात आली होती. ग्रामीणजन, स्त्रिया, सामान्य माणसं, शोषितवर्ग या साऱ्यांचा दबलेला आणि दाबलेला आवाज "समाजाच्या कानां'पर्यंत पोचवण्याची त्या चळवळीची प्रतिज्ञाच होती. परिणामस्वरूप उर्दूमधील बहुतांश साहित्य त्यानंतर, सामान्य माणसाच्या जगण्याचं केंद्रीकरण करणारं आणि जीवनदर्शी असं होऊ लागलं होतं. मराठीत असा प्रयत्न होण्यासाठी आणि जीवनदर्शी साहित्याचा आग्रह धरण्यासाठी आपल्याला पुढची 40 वर्षं थांबावं लागलं आहे. मराठी साहित्यात सामान्य माणसाचा चेहरा कुठे आहे, हा सामान्य माणूस मराठी साहित्यात प्रतिबिंबित का होत नाही, असा सवालच आक्रोशाच्या रूपाने आपल्याला प्रकट करावा लागला. त्यानंतर मात्र काही काळ दलित-ग्रामीण जीवन मराठी साहित्यात दिसायला लागलं हे खरं. सामान्य माणसाचा हरवलेला चेहरा थोड्याफार प्रमाणात आपल्याला नारायण सुर्वेंच्या कवितेत दिसला. थोडा नाटकांतून दिसला. क्वचित कादंबरीतून दिसला. आणि नंतर पुन्हा हा चेहरा मराठी साहित्यातून हरवून गेला आहे. 

या हरवलेल्या चेहऱ्याचा शोध मराठी साहित्यात नव्याने आणि पुन्हा एकदा घेण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. महानगरीय गतिमान जीवनपद्धतीमध्ये धावता धावता स्वतःची मुळं (रुटस्‌) विसरून जाणारा आणि एका अवाढव्य यंत्रव्यवस्थेमध्ये छोटासा "नट किंवा बोल्ट' झालेला आणि स्वतःला विसरलेला सामान्य माणूस पुन्हा एकदा साहित्यात स्थिर करावा लागेल. सर्वदूर ग्रामीण क्षेत्रातील जगण्याचे संदर्भ आणि संघर्षसुद्धा पुन्हा शोधावे लागतील. शोषणाचे मार्ग आता सूक्ष्म झाले आहेत. त्यांचीही दखल घ्यावी लागेल. हे सगळं मराठी साहित्याने केलं पाहिजे. आमच्या कादंबऱ्यातून, कथा आणि नाटकांतून, कवितांमधून हा सामान्य माणूस प्रतिबिंबित होतो आहे का, या मुद्यावर चर्चा करावी लागेल. समाज पुन्हा निद्रिस्त होतो आहे, पुन्हा ग्लानीत जातो आहे, असा इशारा दिला जातोय. मराठी वाचलं जात नाही; नव्या पिढीला मराठी ललितगद्याबद्दल आणि ललितपद्यापद्दलसुद्धा आस्था राहिलेली नाही, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. वाचक मनोरंजनाच्या आणि क्वचित बुद्धीरंजनाच्या मोहजालात अडकून पडायला लागलेला आहे. एका बाजूने समाजातील रोजच्या जगण्याला प्रतिबिंबित करण्याची साहित्याची प्रतिज्ञा चिरंतन असताना प्रत्यक्षात मात्र, साहित्य प्रमादस्थित होते आहे, काय अशी शंकाही बोलून दाखवली जाते आहे; पण ही भयशंकासुद्धा क्षीण आणि दबल्या आवाजात व्यक्त केली जातेय. सामान्य माणूस कोणत्यातरी स्वप्नवादात आणि त्या कल्लोळात हरवून जातो आहे आणि साहित्य या घटनेची दखलच घेत नाही; अशी परिस्थिती आहे का हे साहित्याने आणि साहित्यिकांनी तपासलं पाहिजे. सर्वच साहित्यविषयक सोहळ्यात या मुद्यांची दखल घेणे येथून पुढे गरजेचे राहणार आहे. 

मराठी माणसाच्या आस्थेचे आणि प्रेमाचे विविध विषय असतात. भारतातील अन्य भाषांमधून सहसा आढळून न येणारी दिवाळी अंकांची मराठी भाषेतील परंपरा शंभरी पार करते आहे आणि तीबद्दल मराठी माणसाला मोठीच आत्मीयता आणि रास्त अभिमान वाटत असतो. संगीत नाटके, जुने दर्जेदार चित्रपट, जुनी गाणी याबरोबरच अखिल मराठी साहित्यसंमेलनसुद्धा मराठी माणसाच्या प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे साधन असते. साहित्यसंमेलनातून मराठी माणूस गर्दी करतो, प्रवास खर्च सोसतो, आस्था प्रकट करतो. पुस्तके खरेदी करतो. आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडावेत असे वाटून ही पुस्तके प्रेमाने घरी घेऊन जातो. चर्चा ऐकतो. समाधान व्यक्त करतो किंवा असमाधानही. मराठी माणसाच्या आस्थेचा विषय असलेले अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन डोंबिवली येथे होत आहे. या संमेलनात साहित्यविषयक आशयघन चर्चा होईल; तसेच सामान्य माणसाचा हरवलेला चेहरा पुन्हा शोधता येईल का, या मुद्याबाबतदेखील चिंतन मांडलं जाईल, अशी अपेक्षा करूया. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com