'बोको हराम'च्या बीमोडाचे आव्हान

डॉ. अशोक मोडक
बुधवार, 22 जून 2016

‘बोको हराम‘चा अर्थ ‘पश्‍चिमी शिक्षण म्हणजे पाप‘ असा आहे. नायजेरियात फोफावलेल्या या दहशतवादी संघटनेचा निःपात करण्यासाठी तेथे आक्रमक मोहीम उघडण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही या बाबतीत मदतीचा हात दिल्याने नायजेरियाला मोठेच बळ मिळाले आहे. 

‘बोको हराम‘चा अर्थ ‘पश्‍चिमी शिक्षण म्हणजे पाप‘ असा आहे. नायजेरियात फोफावलेल्या या दहशतवादी संघटनेचा निःपात करण्यासाठी तेथे आक्रमक मोहीम उघडण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही या बाबतीत मदतीचा हात दिल्याने नायजेरियाला मोठेच बळ मिळाले आहे. 

पश्‍चिम आफ्रिकेतील नायजेरियात गेली तेरा वर्षे ‘बोको हराम‘ या दहशतवादी टोळीने दहशत निर्माण केली आहे. नायजेरियाच्या ईशान्येला इस्लामी खिलाफतीचे राज्य उभारायचे, हे आहे या टोळीचे उद्दिष्ट! इराक व सीरिया या देशांत हेच उद्दिष्ट साध्य केलेल्या ‘इस्लामिक स्टेट‘ संघटनेशी ‘बोको हराम‘ने आपले गोत्र जुळविले आहे. भीषण विध्वंस चालविलेल्या या टोळीच्या विरोधात नायजेरियात आता व्यूहरचना आखण्यात आली आहे. गेल्या वर्षी मेमध्ये महम्मदू बुखारी हे नायजेरियाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. चाळीस वर्षांपूर्वी यशस्वी लष्करी अधिकारी म्हणून ते विख्यात होते. ‘बोको हराम‘च्या बंदोबस्तासाठी गेल्या वर्षभरात त्यांनी ठोस पावले उचलली आहेत व जगानेही त्यांना भरघोस पाठिंबा दिला आहे. 

‘बोको हराम‘चा अर्थ ‘पश्‍चिमी शिक्षण म्हणजे पाप‘ असा आहे. साहजिकच हे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलामुलींना वेठीस धरायचे, त्यांच्या शैशवावरच कुऱ्हाड चालवायची. जो ‘बोको हराम‘पेक्षा वेगळ्या पंथाचा ‘पुजारी‘ आहे, त्याला हालहाल करून यमसदनी पाठवायचे, असे या टोळीचे धोरण आहे. याच धोरणाला अनुसरून एप्रिल 2014 मध्ये एका शाळेतील 276 विद्यार्थिनींना पळविण्यात आले. यांपैकी 57 मुलींची नंतर सुटका झाली. पण त्यांच्यावर बलात्कार झाले, काही जणी माता झाल्या आहेत. या मुली वगळता ज्या अभागी बालिका ‘बोको हराम‘च्या कैदेत आहेत, त्यांच्यावर भयानक अत्याचार होत आहेत. या व्यतिरिक्त लहान मुलांचा आत्मघाती म्हणून वापर केला जातो. त्यामुळे बेनिन, छाड, कॅमेरून आणि निगेर या शेजारी देशांतील नागरिक भयकंपित झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत ‘बोको हराम‘च्या हल्ल्यांत पंधरा हजार जण मारले गेले आहेत, तर पंचवीस लाख बेघर झाले आहेत. एकदा पाश्‍चात्त्य शिक्षण पापसदृश आहे, अशी समजूत बळावली, की हे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांवरही आभाळ कोसळले, तर त्यात नवल कसले? सहाशे

शिक्षकांना म्हणूनच मृत्युदंडाची सजा देण्यात आली आहे. हजारो शिक्षकांनी घाबरून शिक्षकी पेशा सोडून दिला आहे. लीबियात कर्नल मुअम्मर गडाफीची हत्या झाल्यावर, त्याच्या रक्षणासाठी तिथे गेलेल्या तकफिरी टोळ्या परतल्या व नायजेरियाच्या पश्‍चिमेकडील माली देशात स्थिरावल्या. आज या टोळ्यांचीही ‘बोको हराम‘ला साथ आहे. या टोळ्यांमुळे केवढी दहशत उत्पन्न झाली आहे याची कल्पना करणेही अवघड आहे. नायजेरियन मतदारांनी म्हणूनच बुखारींना अध्यक्ष म्हणून निवडून आणले. 

बुखारींना पक्के ठाऊक आहे, की ‘बोको हराम‘चे आव्हान मोडून काढायचे असेल तर समर्थ लष्कर तैनात करावे लागेल, लष्कराच्या मदतीसाठी कुशल गुप्तहेरही उभे करावे लागतील, लष्कर भ्रष्टाचारमुक्त करावे लागेल. कारण आतापर्यंत सैनिकांना दिलेली शस्त्रास्त्रे ‘बोको हराम‘, ‘तकफिरी‘ व ‘अल्‌ शबाब‘ या टोळ्यांच्या शस्त्रागारात पोचली आहेत. नायजेरियात सैन्यात भ्रष्टाचार आहे, तसाच समाजजीवनातही आहे. त्यामुळे आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्येचा आणि विपुल खनिजसंपत्तीने युक्त असलेला हा देश अंतर्बाह्य पोखरला गेला आहे. तेथे औद्योगिक उत्पादनात कमतरता आहे. कारण रस्ते, पूल, वीज वगैरे पायाभूत सोयींचा दुष्काळ आहे. याचा लाभ उठविण्यासाठी तिथले धनदांडगे सज्ज आहेतच. बुखारी गेल्या वर्षी अध्यक्ष म्हणून निवडून आले. तत्पूर्वी, जोनाथन आणि ओबासन्जो हे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व मंत्री एका बाजूला, तर धनदांडगे दुसऱ्या बाजूला. त्यांनी एकमेकांशी हातमिळवणी करून आपापल्या तिजोऱ्या भरल्या आणि सर्वसामान्यांना अन्न - वस्त्र - निवाऱ्यापासून वंचित ठेवले. 

या पार्श्‍वभूमीवर बुखारींनी निर्णय घेतला, की भ्रष्टाचार खणून काढायचा. सैनिकांसाठी परदेशातून आणलेली शस्त्रास्त्रे सैनिकांच्याच शस्त्रागारात पोचतील आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आयात केलेला कच्चा माल सार्वजनिक गोदामांमध्येच साठविला जाईल या दृष्टीने कठोर पावले उचलण्यात आली आहेत. जे शासक, स्वार्थी धनदांडगे व भ्रष्टाचारी नोकरशहांचे कर्दनकाळ ठरतात, लुटारू मस्तवालांना जेरबंद करतात, त्यांनाच लोक दुवा देतात. अर्थात, अशा शासकांनी लोकांच्या अन्न - वस्त्र - निवारा वगैरे गरजा पूर्ण केल्या पाहिजेतच. नोकऱ्या - व्यवसायांची शाश्‍वती दिली पाहिजे हेही महत्त्वाचे आहे. बुखारी यांनी गेल्या वर्षभरात या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून खबरदारी घेतली आहे. बुखारी यांनी प्रामाणिक, विश्‍वसनीय आणि कर्तबगार सहकाऱ्यांना नियुक्त केले आहे. नायजेरिया म्हणजे 36 राज्यांचा संघ आहे. ‘बोको हराम‘ या टोळीने यांपैकी 20 राज्यांत आपला जम बसविला आहे. स्थानिक सत्ताधीशांबरोबर दोस्ती करून शस्त्रास्त्रे व इतर सामग्री खिशात घातली आहे. बुखारी यांनी म्हणूनच 36 राज्यांमधून भरवशाचे सहकारी कार्यरत राहतील याची  दक्षता घेतली आहे. 

नायजेरियातील जनसामान्यांना भयमुक्त करण्यासाठी आता इतर देशही पुढे आले आहेत. मेच्या अखेरीस नायजेरियाच्या राजधानीत दहशतवादविरोधी आंतरराष्ट्रीय परिषद झाली. नायजेरियन नागरिकांना, तसेच त्याच्या शेजारी देशातील नागरिकांनाही भयमुक्त केले पाहिजे, त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्ती केली पाहिजे, त्यांच्या शिक्षण, तसेच आरोग्यविषयक अपेक्षांनाही न्याय दिला पाहिजे हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाकडून Office for The Co-ordination of Humanitarian Affairs या संस्थेची स्थापना झाली आहे. ही संस्था इतर देशांकडून उपलब्ध होणाऱ्या मदतकार्यांमध्ये सुसूत्रता आणत आहे. तसेच फ्रान्स, ब्रिटन व अमेरिका यांनी शस्त्रपुरवठा केल्याने ‘बोको हराम‘च्या पराभवासाठी बुखारी यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. सारांश, नागरी आणि लष्करी साह्य तत्काळ नायजेरियाला पोचावे या दृष्टिकोनातून आखण्यात आणलेली व्यूहरचना फलद्रूप होईल अशी चिन्हे दिसत आहेत. ‘बोको हराम‘चे संकट नजीकच्या भविष्यात एकदम नष्ट होईल, असे म्हणणे धारिष्ट्याचे आहे. पण बुखारी आणि त्यांचे सहकारी नायजेरियाला या संकटापासून मुक्त करण्यासाठी योग्य कार्यवाही करीत आहेत हे नक्की!