नमोंचे बोलणे कैसे असे! (बुकशेल्फ)

Modi Way
Modi Way

‘‘मी  आलो, मी पाहिले, मी जिंकलो’’... पॉन्टसच्या दुसऱ्या फ्रान्सिसच्या विरोधातले एक छोटेखानी युद्ध जिंकल्यानंतरचे ज्यूलियस सीझरचे हे शब्द गेली दोन सहस्र वर्षे जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांतील वाङ्‌मयात वेगवेगळ्या संदर्भात आणि स्वरूपात वापरले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या; चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या आणि विरोधकांना नामोहरम करणाऱ्या वक्तृत्वाचे विश्‍लेषण करताना व्यवस्थापन शिक्षणतज्ज्ञ आणि प्रेरक-लेखक विरेंदर कपूर यांनी ह्याच कल्पनेचा आधार घेतला आहे. ‘स्पीकिंग द मोदी वे’ या कपूर यांच्या ताज्या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या सुरवातीचेच शब्द आहेत- ‘‘ते आले, ते बोलले त्यांनी जिंकले.’’

देशाची अर्थव्यवस्था पोखरणाऱ्या, दहशतवादी संघटनांना पोसणाऱ्या आणि सामान्य भारतीयांच्या गळ्याला फास लावणाऱ्या काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनी नोटा बंद करण्याचा अनेकांना धक्कादायक वाटलेला निर्णय ऐकताना मोदींच्या वक्तृत्वाचा आणखी एक नमुना अवघ्या सत्तर-बहात्तर तासांपूर्वी देशभरातल्या असंख्य मोदी भक्तांनी आणि मोदी विरोधकांनीही अनुभवला आहे. काहीशा सानुनासिक आवाजातले, ‘‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी...’’ असो; ‘‘मित्रों...’’ किंवा ‘‘मेरे प्यारे देशवासियों...’’ असो किंवा न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअरमधले त्यांचे भाषण असो, दूरचित्रवाणी वाहिन्यांना सर्वाधिक टीआरपी देणारा दुसरा कोणताही राजकीय नेता सांप्रत स्थितीत आढळत नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या आणि त्या पाठोपाठ काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदा हा मुद्दा ठळकपणे देशासमोर आला. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेले भाषण आणि त्यानंतरच्या त्यांच्या भाषणांनी लक्ष वेधून घेतले. त्यांच्या भाषणांतील मुद्दे, शब्द, आकडेवारी यांच्या जोडीला त्यांची शैलीही अनेकांच्या कुतूहलाचा भाग बनली. अमेरिकेच्या (आता माजी) अध्यक्षांचा उल्लेख करताना क्वचित रूक्ष वाटणाऱ्या राजशिष्टाचारांच्या फाटा देत ‘बराक’ असा करणे किंवा अन्य जागतिक नेत्यांबरोबर संवाद साधताना किंवा अगदी त्यांना पत्र लिहून वैद्यकीय उपचारांसाठी मदत करण्याची विनंती करणाऱ्या चिमुरडीबरोबर संवाद साधताना दिसलेल्या मोदी यांच्या स्वतःच्या अशा देहबोलीचीही चर्चा होत राहिली.

‘स्पीकिंग द मोदी वे’ हे पुस्तक नरेंद्र मोदी यांच्या वक्तृत्वशैलीचे, त्यामागच्या अभ्यासाचे विश्‍लेषण मांडण्याचा प्रयत्न करते. हे करत असताना कपूर यांनी जगातल्या विविध राजकीय नेत्यांच्या भाषा आणि भाषणशैलीशी तुलना करत मुद्दे मांडले असल्याने नरेंद्र मोदी ही व्यक्ती, त्यांचे राजकारण या विषयी आपले काहीही मत असले, तरी एक राजकारणी म्हणून त्यांच्या शैलीचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांच्या दृष्टीने हे पुस्तक वेधक ठरू शकेल.
१३ सप्टेंबर २०१३ ह्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर सात महिन्यांनी एप्रिल २०१४मध्ये निवडणुका झाल्या आणि २६ मे २०१४ या दिवशी मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री झालेल्या मोदी यांच्याकडे गुजरातबाहेरच्या २८ राज्यांतल्या आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या लोकांपर्यंत फक्त सहा महिन्यांत पोचण्याचे आव्हान मोदी यांनी स्वीकारले आणि ते यशस्वी झाले. या मुद्द्यापासून कपूर सुरवात करतात. मोदी यांच्या भाषण तंत्रांविषयी भाष्य करताना, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पावलावर पाऊल टाकत मोदी यांनी गेम चेंजरची भूमिका बजावली असल्याचे ते नमूद करतात. महानगरांमध्ये, अगदी परदेशातही किंवा उद्योगपतींच्या बैठकांमध्येही हिंदीत प्रभावी भाषणे करता येतात, हे जसे मोदी यांनी दाखवून दिले तसे पंतप्रधानपदाच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून ते वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांशी बोलत राहिले, वेगळ्या कल्पना मांडत राहिले. ‘मैं प्रधानमंत्री नही, प्रधानसेवक हूं’, यांसारखे त्यांचे गाजलेले ‘वनलाइनर्स’, शब्दांचा वापर आणि अत्यंत प्रसन्नपणे आपल्या श्रोतृवृंदाला सामोरे जाण्याचे त्यांचे कौशल्य, हे मोदी यांचे एक वेगळेपणही कपूर दाखवून देतात. दहा वर्षांच्या मुलापासून ते ऐंशी वर्षांच्या व्यक्तीपर्यंत कोणाशीही संवाद साधण्याची त्यांची हातोटी यांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न केल्याचे कपूर यांनी म्हटले आहे.

हे पुस्तक दहा प्रकरणांमध्ये विभागले आहे. ‘सिन्सिरिटी ऑफ पर्पझ अँड फोकस्ड ॲप्रोच- फ्लोटिंग लाइक अ बटरफ्लाय, स्टिंगिंग लाइक अ बी’ हे या पुस्तकातले पहिले प्रकरण मोदी यांच्या वक्तृत्वाविषयीचे मुख्य मुद्दे आणि प्रवास वाचकांसमोर ठेवते. विन्स्टन चर्चिल, हॅरी ट्रूमन, अब्राहम लिंकन, ड्‌वाईट आयसेनहॉवर, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांची शैली आणि त्यांच्या भाषणांचे संदर्भ देत कपूर आपला अभ्यास मांडतात. मोदी यांच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या त्यांच्या वक्तृत्वाचा हा अभ्यास त्यामुळेच राजकारणाच्या अभ्यासकांनाच नव्हे तर वाचनवेड्या कोणालाही महत्त्वाचा वाटेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com