संगुली (परिमळ)

raskar
raskar

खेड्यापाड्यात सगळीकडेच लग्नानंतर नववधूसोबत तिच्या सासरी सोळावा होईपर्यंत जी स्त्री जात असते, तिला संगुली किंवा पाठराखीण म्हटले जाते. पूर्वी ती नववधूच्या नात्यातली, वयाने मोठी, अनुभवसंपन्न अशी असे. बहुधा तिची मावशी, काकू, आजी असे कोणीतरी असायचे. आजही संगुली असते, पण आज नववधूच्या मनाचा विचार करून तिला समवयस्क अशी मामी, वहिनी, मैत्रिण किंवा बहीण असे कोणीतरी सोबत जाते. यात तिच्या मनाचा, तिला करमण्याचा विचार असतो; पण यात तिचे हित, अहित असे पाहिले जात नाही, असे वाटते. खरे तर केवळ परंपरेचा भाग म्हणूनच ती नवरीच्या सोबत जाते. आपण २१ व्या शतकात वावरतो, पण अनेक गोष्टींच्या बाबतीत विचाराने उथळ झालो आहोत. वयाची ज्येष्ठता-अनुभवसंपन्नता, नव्या घराच्या रीतीभाती, सासू-सासरे, घरातील वातावरण, नवऱ्याची, दिराची, शेजाऱ्यांचीही वर्तणूक समजून घेताना उपयोगी पडत असते. लग्न ही साधी घटना नसते. तो पती-पत्नीने परस्परांवर टाकलेला विश्‍वास आणि परस्परांना जोडणारा अनुबंध असतो. तो जीवनयोग असतो. त्यासाठीच नववधूसोबत जाणारी स्त्री अधिक उन्हाळे, पावसाळे झेललेली अशीच; पण नात्यातली असावी.

संगुली म्हणजे मैत्रिण, सखी, पण जी नवरीचे हित पाहते, त्या कुटुंबाचे हित पाहते ती सखी, तीच मैत्रिण! जिच्या ठायी समंजसपणा असतो ती संगुली. पाठराखीण म्हणजे जी नवरीच्या पाठीशी राहून नव्या कुटुंबाशी जुळवून घ्यायला मदत करते ती. एकंदर तिच्या भूमिकेवरून ती वयाने मोठी, शहाणी असावी असेच म्हणता येईल. संगुली या शब्दाला अर्थाचे अनेक पदर आहेत. संगुली म्हणजे संस्कृती, संगुली म्हणजे शहाणपण, संगुली म्हणजे इतिहास, जिच्या अंगुलीला धरून नववधू संसारात पडत असते ती संगुली. इतिहास हा वर्तमानातून वाटचाल करणाऱ्या मानवी समाजाला शहाणपणाची दीक्षा देत असतो. संगुलीही नववधूच्या बाबतीत हेच करीत असते. म्हणूनच संगुलीरूपी इतिहासाच्या माध्यमातून नववधूरूपी वर्तमानाला संसाररूपी भविष्याकडे नीट वाटचाल करता येते. इतिहास का समजून घ्यायचा, तर इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. त्यात काही घटना वेदनादायी, तर काही घटना सुखदायी असतात. इतिहास घडत नाही, घडविला जातो म्हणून नवीन घटना घडण्यापूर्वी वर्तमानात सावध राहता येते. त्यासाठी त्याचा अभ्यास करायचा. आज आपण जसे आणि जे असतो, त्याला आपला इतिहास-जीवनवृत्तांत कारणीभूत असतो. मानसोपचारतज्ज्ञ मनोरुग्णाला समजून घेण्यासाठी वृत्तेतिहास पद्धतीचा अवलंब करतात. एखादा मनुष्य साधू झाला किंवा गुंड झाला, हे सहज घडत नाही. त्यामागे त्याचा इतिहास असतो. संगुलीस इतिहासाचे प्रतीक मानता येईल. ती नव्या नवरीला आणि तिच्या घराला दिशा देत असते. आज तिची भूमिका करणारी संगुली ही नावालाच उरली आहे. त्यामुळे त्या नवरीच्या संसाराची वाट बिकट होण्याची शक्‍यता असते. त्यामुळेच समुपदेशकाची भूमिका वठविणारी संगुली आजही मोलाची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com