...आता तुझी टाळी! (ढिंग टांग)

british nandi's dhing-tang coloum
british nandi's dhing-tang coloum

‘‘प प्याऽऽऽ... पप्याजीऽऽऽ..!,’’ कृष्णकुंजगडाच्या अंत:पुरातून नेहमीची हाक ऐकून पप्याजी फर्जंद स्टुलावरून तटकन उठला आणि चहाचा वाफाळ कोप घेऊन आत शिरला. गडाच्या पायथ्याशी वसलेल्या शिवाजीपार्काला त्या हांकेने कळले की कुकर लावायची वेळ झाली!! श्रीमान चुलतराजांची पहाट झाली आहे. पार्कातील कबुतरे भर्रर्रदिशी अस्मानात उडाली आणि पुन्हा वळचणीला बसली.
‘‘कोण आलंय बाहेर आम्हाला भेटावयास?’’ राजियांनी नेहमीचा सवाल केला.
‘‘कोणीही नाही, साहेब!’’ फर्जंदाने नेहमीचा जबाब दिला.

‘‘अस्सं?’’ राजे स्वत:शीच पुटपुटले. विचारांचे जाळे इतके गुंतागुंतीचे झाले, की त्याचे आठ्यांमध्ये रूपांतर होऊन ते त्यांच्या कपाळी उमटले. कालच्या घोषणेनंतर वास्तविक रांगा लागायला हव्या होत्या. ‘सुलहनाम्याचा प्रस्ताव कोणी घेऊन आले तर नक्‍की विचार करू,’ असे राजियानी जाहीर सांगितले होते. ही खरी तर वर्तमानपत्रांची हेडलाइन! च्यानलवाल्यांनी दिवसभर चालवावी, अशी बातमी...छे, काय ही पत्रकारितेची दुर्दशा!!
‘‘काही कुणाचा निरोप?’’ राजियांनी घटकाभराने विचारले.
‘‘पापलेटे चांगली आली आहेत, घेऊन जावीत... नंतर महाग होतील, असा माहीमच्या मासळी बाजारातून सांगावा आला आहे,’’ फर्जंदाने प्रामाणिकपणे सकाळी आलेला एकमेव महत्त्वाचा सांगावा पोचता केला.

पापलेटे? पा-प-ले-टे? अहह! काय हे? कसे होणार ह्या महाराष्ट्राचे. अवघा महाराष्ट्र कोळणीच्या पाटावरील पापलेटासारखा बर्फगार पडला असताना आम्ही विचार करतो आहोत, अखिल महाराष्ट्राच्या अस्मितेचा. अखंडत्वाचा. ह्यांना पापलेटे सुचतात?
‘‘आमचा मोबाईल आण बरं... काही मेसेज आहेत का? पाहायला हवं!’’ चुलतराजांनी चुटकी वाजवत फर्मान सोडले.

‘‘ब्याटरी डाऊन आहे, साहेब! रिचार्ज पण मारलेला नाही, बऱ्याच दिवसात!’’ मेलेला मोबाइल पुढे करत फर्जंदाने परिस्थितीची जाणीव त्यांना करून दिली. हताशेने राजियांनी हात झटकला. आढ्याकडे तोंड करून ते नुसते बघत राहिले...

काय ही महाराष्ट्राची दारुण अवस्था! जिथं फुलं वेचली, तिथं गोवऱ्या वेचायची पाळी आली!
...हा खरा तर महाराष्ट्राच्या कुंडलीतला मणिकांचन योग! खुद्द राजे टाळी मागताहेत... टाळी!! जे हात इतके दिवस दोन्ही बगलेत दडपलेले होते, तेच मोकळे होऊन टाळीसाठी पुढे होत आहेत. ह्या संधीचा लाभ घेतला नाहीत, तर तुमच्यासारखे करंटे तुम्हीच... मुंबई, ठाणे-पुण्याचे भले करायचे आहे? नाशकासारख्या बागा उठवायच्या आहेत? मग या माझ्यासोबत. महाराष्ट्राच्या नवनिर्माणाला सिद्ध व्हा!! प्रस्तावाचा विनंतीअर्ज घेऊन या, महाराष्ट्रासाठी आम्ही नक्‍की नक्‍की विचार करू. तुम्ही पसरलेल्या हातावर आम्ही टाळी दिली की मग बघा... महाराष्ट्र नावाची विशाल बाग कशी फुलते ते!!
‘‘खरंच खाली कोणीही आलेलं नाही?’’ न राहवून राजांनी पप्याजी फर्जंदास पुन्हा विचारले.
‘‘आईच्यान नाही...होते, तेसुद्धा निघून गेलेत, साहेब!’’ फर्जंदाने मान खाली घालून सांगितले.
राजे पुन्हा विचारात पडले. हे आक्रीत कसे घडले? वास्तविक अर्ज मागवल्यानंतर गडाच्या पायथ्याशी झुंबड उडायला हवी होती. मारामाऱ्या, लाठीचार्ज, बराच हलकल्लोळ उडणे अपेक्षित होते. पण इथे तर कुणी चिटपाखरू दिसत नाही...

‘‘मागल्या खेपेला ते कमळवाले आम्हाला वरळीच्या हाटेलीत भेटले होते. तेव्हा आम्ही हात पुढे केला नाही..!’’ राजे स्वत:शीच म्हणाले. त्यावर फर्जंद गप्प राहिला.
‘‘त्या मर्दमावळ्यांनी भर वर्तमानपत्रातून टाळी मागितली होती, पण आम्ही दिली नाही!!’’ राजे पुन्हा स्वत:शीच म्हणाले. फर्जंद पुन्हा गप्प राहिला.
‘‘ह्यावेळी महाराष्ट्रासाठी... केवळ महाराष्ट्रासाठी हं... आम्ही टाळी देतोय, तर गर्दी नाही? मग हे हात काय कामाचे अं?’’ राजियांचे नेत्र आता अंगार ओकू लागले होते. ते म्हणाले, ‘‘म्हटलं ना, ह्यांना लाथांचीच भाषा समजते! बातांची नव्हे!! भर चौकात हात कलम करा ह्या चुकारांचे!! आम्ही मागूनही टाळी देत नाहीत म्हंजे काय?’’
मनाचा हिय्या करून फर्जंद म्हणाला-
‘‘हाताचा उपयोग झाला नाही..तर नाही, पाय तर मोकळे आहेत?..साहेब!’’
...आणि राजियांनी टाळीसाठी हात पुढे केला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com