महाराजांची आण! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

गनिमाने कडवा वेढा मांडलेला. मुंगीयेने पंख झटकला तरी चाहूल लागेल, ऐसा बंदोबस्त. मातोश्रीगडाच्या बालेकिल्ल्यात राजे चिंतीत जाहलेले. गनिमाचा वेढा कैसा तोडावा? कैसा? कैसा? कालपरेंत आप्तेष्ट म्हणविणारे आज चाल करोन येताती. ज्यांच्यासमवेत पंगती झोडिल्या. आग्रह करकरोन जिलेब्या उडविल्या, त्यांच्याशी दोन हात करणें आले...जगदंब जगदंब!

गनिमाने कडवा वेढा मांडलेला. मुंगीयेने पंख झटकला तरी चाहूल लागेल, ऐसा बंदोबस्त. मातोश्रीगडाच्या बालेकिल्ल्यात राजे चिंतीत जाहलेले. गनिमाचा वेढा कैसा तोडावा? कैसा? कैसा? कालपरेंत आप्तेष्ट म्हणविणारे आज चाल करोन येताती. ज्यांच्यासमवेत पंगती झोडिल्या. आग्रह करकरोन जिलेब्या उडविल्या, त्यांच्याशी दोन हात करणें आले...जगदंब जगदंब!

बालेकिल्ल्याच्या गवाक्षातून राजे दूरवरील गनिमाच्या फौजा निरखत होते. दुश्‍मनाच्या जेजाळा, तोफा गडाच्या दिशेने रोखलेल्या. पाहावें तेथवर गनिमाच्या राहुट्यांचा वेढा.
‘‘मिलिंदोजी, गडावर दाणागोटा किती आहे?,’’ काहीयेक विचाराने राजांनी आपल्या फर्जंदास विचारिले.
‘‘मोप हाय की...पुरुन उरंल! आपन म्हनत असाल तर आत्ताच्या आत्ता जिलेबी-बुंदीची रास घालितो!,’’ मिलिंदोजी निरागसपणाने म्हणाला. येथे हातघाईवर युद्ध पेटले आहे आणि ह्या फर्जंदास जिलेबी आणि बुंदीचे वेध लागलेले. काय म्हणावे ह्यास?
‘‘खामोश!! गनिमाचें गोटातील काय खबर?,’’ राजांनी विचारले.
‘‘ते म्हंतात का महाराजांची आन घ्या आनि म्हना का, व्हय, आम्ही पार्दर्शक कार्भार क्‍येहेला!!,’’ फर्जंदाने अचूक माहिती दिली.
‘‘अर्थात आम्ही पारदर्शक कारभार केला! किंबहुना आमच्या इतका पारदर्शक कारभार कुणीही कधीही केला नाही. तसे प्रमाणपत्र आहे आमच्यापास!! आणि त्यांना म्हणावं, तुमच्या फुटक्‍या डोळ्यांनी पाहा जरा ह्यात. शिवद्वेषाचा वडस पडलाय तुमच्या डोळ्यांत, म्हणोन तुम्हास तो दिसत नाही, नतद्रष्टांनो!!,’’ हातातील इकॉनॉमिक सर्व्हेचे चोंपडे नाचवत राजे उद्‌गारले.

‘‘कसलं त्ये चोपडं म्हाराज! निस्त्या थापा!!,’’ फर्जंदाने दातकोरणे दाढेत शिरवून आपले लाडके मत नोंदवले. त्याच्या निरागसपणाला अखिल तारांगणात तोड नाही. नको तेथे काहीही बरळतो. असो.
 ‘‘ऐसे असेल तर कान खोलून ऐका, म्हणावं!..उतरू दे आमचा हरेक बोल त्यांच्या दगडासारख्या काळजात. होय, आम्ही पारदर्शक कारभार केला! केला!! केला!! काय म्हणणे आहे? आम्ही जे बोलितो, ते करून दावितो...,’’ गर्रकन मान वळवत सर्रकन तल्वार उपसत भर्रकन उधोजीराजे म्हणाले.
‘‘पन ते ‘म्हाराज्यांची आन’ म्हनायचं ऱ्हायलं जनू!,’’ फर्जंदाने चुकीची दुरुस्ती केली. अत्यंत आगाऊ मनुष्य आहे हा! युद्ध संपले की ह्यास टकमक टोंकावरून...
‘‘असल्या फुटकळ गोष्टींसाठी आम्ही महाराजांची आण घेत नसतो...,’’ राजे घुश्‍शात म्हणाले.
‘‘म्हाराजांची आन घेतली तर बऱ्या बोलानं शरन एन्याची त्यांची तयारी हाहे म्हाराज!,’’ फर्जंदाने तिढा टाकला. राजे पुन्हा विचारात पडले. मातोश्रीगडाच्या बालेकिल्ल्यातील फरश्‍यांना भेगा पडतील, इतकी शतपावली केल्यानंतर ते अखेर उद्‌गारले-
‘‘ओके, ठीकंय...म...म...महाराजांची आण घेऊन सांगतो, की आम्ही पारदर्शक कारभार केला!’’

अखेर राजांनी महाराजांची आण घेतली तर!! इतिहासाने कान टवकार्ले! काळाची पावले थबकली! वळचणीच्या शंकेखोर पालींची दातखीळ बसल्याने त्या चुकचुकायच्या थांबल्या!! राजियांनी अखेर शत्रूचे ऐकिले आणि महाराजांची आण घेतली तर!!
‘‘लई भारी काम झालं बघा!,’’ फर्जंद चेकाळला.
‘‘गाढवा...कुठल्या महाराजांची आण घ्यायची, हे कुठं त्यांनी सांगितलंय? आपल्या इंडियात बापू, बुवा, महाराज पैशाला पासरी! कुठलाही महाराज पकडा आणि घ्या आण! काय? दे टाळी,’’ राजे गालातल्या गालात हसत फर्जंदाला हुशारीने म्हणाले. फर्जंद च्याट पडला. राजांनी स्वत:च स्वत:ला टाळी देऊन टाकली!
जगदंब जगदंब!