डिजिटल समाजातील शैक्षणिक आव्हान

राम ताकवले
मंगळवार, 12 जुलै 2016

शिक्षण क्षेत्रातील समाजकार्याची पुणे विद्यापीठातून सुरवात केलेल्या प्रकाश जावडेकर यांना केंद्रात मनुष्यबळ खात्याचे कॅबिनेट दर्जाचे पद मिळाले. या निमित्ताने शिक्षण क्षेत्रांतील सुधारणांविषयीच्या आशा-अपेक्षा उंचावल्या आहेत. 

शिक्षण क्षेत्रातील समाजकार्याची पुणे विद्यापीठातून सुरवात केलेल्या प्रकाश जावडेकर यांना केंद्रात मनुष्यबळ खात्याचे कॅबिनेट दर्जाचे पद मिळाले. या निमित्ताने शिक्षण क्षेत्रांतील सुधारणांविषयीच्या आशा-अपेक्षा उंचावल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची कारकीर्द नवा "डिजिटल भारत‘ घडवणे आणि "मेक-इन-इंडिया‘ हे दोन कार्यक्रम देऊन सुरू केली. यातील कामाच्या व व्यवसायाच्या संधींमुळे युवक आकर्षित झाले. यास पूरक म्हणून "स्किल इंडिया‘, "स्टार्ट अप इंडिया‘ या उद्योग क्षेत्रासाठी, तर "स्वच्छ भारत‘ आणि "स्मार्ट शहरे व गावे‘ निर्माण करण्याचा समाज परिवर्तनासाठीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या सर्व कार्यक्रमातून भारतीय समाज 19-20 व्या शतकाच्या औद्योगिक समाजापासून डिजिटल समाजाकडे परिवर्तित होत आहे. तसेच डिजिटल युगाचे तंत्रज्ञान वापरून स्मार्ट वस्तू व सेवा निर्माण करण्याचा नवा उद्योगधंद्यांचा मार्ग उपलब्ध होत आहे. ही पुरोगामीत्वाची दिशा व प्रगती आहे. त्यांतूनच समर्थ आणि विकसित भारत निर्माण व्हावा, हे कल्पनाचित्र आहे.
शिक्षणाचे धोरण व कार्यक्रम डिजिटल समाजनिर्मितीच्या कार्यक्रमास पूरक हवेत. डिजिटल युगातील समाज व वैश्विक मानव घडवण्याचे शिक्षणाचे ध्येय असावयाला हवे. इथेच पंतप्रधानांची समाज व उद्योग परिवर्तनाची दिशा व आताची शैक्षणिक धोरणे व कार्यक्रम यात दरी जाणवते. पहिली दिशा जागतिकीकरणाची, तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या उदारीकरणाची; तर दुसरी दिशा जुनी प्रारूपे व कर्मकांडाच्या परंपरामध्ये अडकत तर नाही ना अशी शंका निर्माण करणारी आहे.
प्रत्येक युग आपली समाजव्यवस्था, उद्योगव्यवस्था व मूल्यव्यवस्था निर्माण करते. हा नवा माणूस व नवा समाज उदयास येत आहे. अशावेळी भारतीय संस्कृतीतील वैश्विकतेचा व मानवतेचा जो शाश्वत आधार आहे, जो पुरोगामी आहे, त्यातूनच डिजिटल युगाची नवी मूल्यव्यवस्था निर्माण करावयाची आहे. या युगातील समाज हा सतत जोडलेला, स्मार्ट तंत्रज्ञान वापरणारा, सायबर अवकाशातून जागतिक व्याप्ती लाभलेला आहे. जगभरातील ज्ञान शिकायचे व ते वापरून स्थानिक आणि राष्ट्रीय विकास साधावयाचा. यातून नवा शिक्षणाचा मार्ग निर्माण होत आहे.
डिजिटल वस्तूनिर्मिती वैशिष्ट्यपूर्ण आहे. वस्तू उत्पादनाची साधने-संगणक व चरज्ञशीी ङरल- उद्या घरगुती उद्योगधंद्यात परिवर्तित झाली तर आश्‍चर्य वाटू नये. डिजिटल वस्तूच्या पहिल्या कॉपीचा निर्मितीखर्च दिल्यास, पुढील सर्व कॉपी मोफत देता येतात. त्या डाउनलोड करून वापरता येतात. यामुळेच मुक्तस्रोतांची जागतिक चळवळ सुरू झाली व मुक्त ज्ञानस्रोतांच्या आधारे कोणासही, कोठूनही व कधीही शिकता येते. नव्या समाजाने सहकाराने व सहभागाने निर्माण केलेली बौद्धिकसंपत्ती अनेक जण मुक्त हस्ते देत आहेत. यातूनच विकिपीडिया, यूट्यूब, ढएऊ व्याख्याने इ. दर्जेदार ज्ञानस्रोत निर्माण झाले आहेत. सर्वसामान्य नागरिक, विशेषतः ग्रामीण नागरिक व युवक संधीच्या अभावामुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. याचे कारण आर्थिक अडचण हे असून, त्यामुळे एक प्रकारची विषमता निर्माण झालेली आहे. ती दूर करण्याची संधी डिजिटल युगाने उपलब्ध करून दिली आहे.
या तंत्रज्ञानाने सायबर अवकाश निर्माण करून प्रत्येक व्यक्ती, संस्था, संघटना जागतिक बनवल्या आहेत. अनेकांनी सहकाराने व सहभागाने काम करून "सहभागी समत्व‘ तयार केले आहे. ही लोक-संपत्ती आहे. ती बौद्धिक असल्याने ती सर्वांना मुक्तपणे वापरता येते. यातूनच "शून्य सीमांती किमतीत शिक्षण‘ ही पद्धती निर्माण करणे शक्‍य झाले. आज जगातील 500 हून अधिक ज्येष्ठ विद्यापीठे सुमारे दोन हजार पाठ्यक्रम निरनिराळ्या ई-प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देत आहेत. त्यातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3.5 कोटींच्या वर आहे. त्यातील 8-9 टक्के भारतीय आहेत. ज्ञानार्जनासाठी जागतिक दर्जाचे स्रोत उपलब्ध झाले आहेत. भारतातही हे मुक्तस्रोत उपलब्ध झाले आहेत; परंतु त्यांचा स्थानिक व राष्ट्रीय विकासाशी संबंध जोडणे व निर्मितीच्या मार्गाने जाऊन व्यक्तिगत, परिवाराची आणि समाजाची संपत्ती निर्माण करणे, हा डिजिटल समाजातील मार्ग दूरच आहे. तो शिक्षणाचा राजमार्ग, समाजमार्ग व्हायला हवा.
राष्ट्रीय शिक्षणपद्धती समाजविकासाशी जोडणे व लोकसंपत्तीतून समृद्धी साधणे हा शिक्षणाचा उद्देश हवा. शिक्षणाद्वारे जीवनाचा व उद्योग-व्यवसायाचा मार्ग शोधण्यात मदत करणे, हा प्रमुख उद्देश हवा. अशा प्रकारचा शिक्षण-विकास-निर्मिती मार्गच डिजिटल समाजाच्या भावी व्यवस्थेचे चित्र निर्माण करण्यात पूरक राहू शकेल. अशा प्रकारची समाज-समृद्धी व परिवर्तन घडवणारी शिक्षणपद्धती निर्माण करणे, हे राष्ट्रीय धोरण हवे. नव्या शिक्षणमंत्र्यांसमोरचे हे आव्हान आहे. त्यात ते यशस्वी व्हावेत ही सदिच्छा. 

Web Title: The challenge of digital educational community