चलो चले फडणवीस के साथ?

चलो चले फडणवीस के साथ?

देवेंद्र फडणवीस हे रुढार्थाने कोणतेही पाठबळ नसलेले तरुण नेते. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर विश्‍वास टाकल्याने. हा विश्‍वास सार्थ असल्याचा परिचय फडणवीस देत आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकांचा कठीण असणारा पट चित करून ते आता नवी बेरजेची समीकरणे मांडायला निघाले आहेत. संघाचे आशीर्वाद असलेल्या नितीन गडकरींनंतरचे ते महाराष्ट्राचे प्रमुख नेते झाले आहेत. अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ, त्याचे सहकारी पक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेले निमंत्रण आणि यानिमित्ताने मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना दिलेले अधिकार या घटना लक्षात घेतल्या, तर राज्यात फडणवीस पाय रोवून उभे राहणार आहेत हे स्पष्ट दिसते. पालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर लोकोपयोगी कामांचा धडाका लावत फडणवीसांनी जे शक्तिप्रदर्शन सुरू ठेवले आहे, ते लक्षणीय तर आहेच; पण लोकसभेच्या काळातील ‘चलो चले मोदी के साथ’चा नारा आता ‘चलो चले फडणवीस के साथ’ या टप्प्यावर नेणारा आहे.

शिवछत्रपती हे महाराष्ट्राचे दैवत. महाराजांच्या लौकिकाला साजेसे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय झाला. तो प्रत्यक्षात येणे कठीण आहे असे वाटत असतानाच फडणवीस सरकारने सर्व परवानग्या केंद्रातील सरकारच्या मदतीने मिळवल्या. राज्य सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवस्मारकाचे भूमिपूजन होते आहे हा निव्वळ योगायोग नव्हे. या स्मारकाच्या उभारणीचे प्रतिध्वनी प्रचाराच्या लाटा महाराष्ट्रभर पोचवणार हे निश्‍चित आहे. राजकीय नेत्याने काय साधणे आवश्‍यक आहे ते फडणवीस यांनी अचूकपणे हेरले आहे. ‘फडणवीस एकारलेला कारभार करतात, ते केवळ अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वागतात’ ही पक्षांतर्गत कुजबूज केवळ अपप्रचार असल्याचे दाखवण्यासाठी फडणवीस यांनी सहकाऱ्यांना पुढे केले आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा आशीर्वाद असलेले, पक्षसंघटनेत लोकप्रिय असणारे चंद्रकांतदादा पाटील स्मारकाच्या उभारणीच्या प्रत्येक कार्यक्रमात आघाडीवर आहेत. मुख्यमंत्र्यांचे विरोधक अशी ओळख असलेले प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उपस्थिती त्यांचे महत्त्व अधोरेखित करते आहे, तर त्याच वेळी मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात महत्त्वाची भूमिका निभावणे अपेक्षित असलेले पालकमंत्री विनोद तावडे यांना आग्रहपूर्वक समोर केले जाते आहे. फडणवीसांनी आपण संघभावनेला महत्त्व देतो हे दाखवायचे ठरवलेले दिसते.

मुंबईत मराठी माणसाच्या हक्‍कासाठी लढणाऱ्या शिवसेनेबद्दल येथील भूमिपुत्राला कमालीचा आदर. भाजपच्या झंझावाताला आव्हान देत विधानसभेत लक्षणीय जागा जिंकणाऱ्या शिवसेनेलाही या भूमिपूजन समारंभात फडणवीसांनी शेजारी बसण्याचे निमंत्रण दिले आहे. विधानसभा सामन्यात थेट मोदींना आव्हान दिल्यानंतर प्रथमच उद्धवजी त्यांच्यासमवेत एका मंचावर असतील. त्यातही गंमत म्हणजे या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी भाजपने मुंबईत वातावरणनिर्मितीच्या ज्या मिरवणुका शुक्रवारी काढल्या, त्यात शिवसेना उत्साहाने उतरली नाही. पक्षीय रागलोभ बाजूला ठेवून उद्धवजींना जलपूजनाच्या मुख्य कार्यक्रमाला हजर राहण्याची विनंती यशस्वी करून दाखवणे सोपे नव्हते, ते फडणवीसांनी करून दाखवले आहे. शनिवारी मुंबईकरांच्या सेवेत दाखल करावयाच्या मेट्रो; तसेच अन्य उद्‌घाटन समारंभांना उद्धवजींनी हजर राहू नये, अशी आग्रही भूमिका शिवसेनेतील काही नेत्यांनी घेतली आहे. तरीही ते दोन्ही कार्यक्रमांना हजर राहतील असे समजते. मुंबई महापालिकेसाठी हे केले जाणार आहे. गड-किल्ल्यांच्या दुरवस्थेचा विषय ते मांडतील. शिवसेनेने कालांतराने काही वेगळी भूमिका घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसला हाताशी ठेवण्याचा काही भाजप नेत्यांचा मानस आता लपून राहिलेला नाही. तो लक्षात घेत पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मंचावर मानाचे स्थान देण्यात आले असावे, असाही एक अंदाज आहे. विकासासाठी सर्वांनी एक यावे ही त्यामागची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री सांगणार. एकूण काय तर मोदींनी आपल्यावर टाकलेला विश्‍वास सार्थ असल्याचे फडणवीस सिद्ध करत आहेत. फडणवीस यांची खरी ओळख होती ती भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणाऱ्या नेत्याची. ती मागे टाकून केवळ दोन वर्षांत आपण सत्तेतही तेवढेच सहज आहोत, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

बेरजेचे राजकारण करताना एकीकडे ते ओबीसी समाजासाठी वेगळे खाते तयार करीत आहेत. मराठा समाजाच्या प्रश्‍नांबद्दल, आरक्षणाबद्दल आपण प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत हे दाखवून देत आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड या भाजपशासित राज्यांत विरोधी पक्ष हळूहळू अस्तंगत झाला. महाराष्ट्रातही तसेच घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात या कामगिरीतून फडणवीस यांनी आपण यशस्वी राजकारणी आहोत हे दाखवून दिले असले तरी काही आक्षेप आहेतच. थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत भ्रष्टाचाराची पाळेमुळे पोचल्याची चर्चा आहे. ‘नोकरशाही प्रतिसाद देत नाही’, अशी तक्रार ज्या मुख्याधिकाऱ्यांच्या काळात प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी जाहीररीत्या केली, त्यांच्याकडेच राजशकट कायम ठेवले जाणार असल्याचे बोलले जाते. निवडणुकीत यश खेचून आणले हे तर आकडेवारी सांगते आहेच, ती नाकारता येणार नाही; पण फडणवीसांच्या प्रतिमेला साजेसा संवदेनशील कारभार सर्वत्र सुरू आहे काय? संधीने उभी केलेली आव्हाने मोठी आहेत. अस्वस्थ तरुणांच्या फौजा रस्त्यावर उतरत आहेत, त्यांच्या रिकाम्या हातांना काम द्यावे लागणार आहे. ‘आम्हाला वेळ देत नाहीत’ ही आमदारांची मुख्यमंत्र्यांबद्दलची तक्रार आहे. भोवती जमा झालेले कोंडाळे या भेटी होऊ देत नाहीत काय, हे तपासण्याची गरज आहे. नव्या दमाचे आश्‍वासक फडणवीस लांबच्या पल्ल्याचे नेते असल्याने त्यांनी या छोट्या बाबींकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com